प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             
 
बोपदेवाच्या मुग्धबोधाचा हेतु- प्रसाद व संक्षेप हीं दोन्ही आपल्या ग्रंथांत आणून तो संक्षिप्त व सुलभ करावा हा बोपदेवाचा मुख्य हेतु होता. वार्त्तिकें वगैरे ग्रंथ सुलभ न होतां उलट त्यांचें काठिन्य वाढतच जातें. अशा स्थितींत नव्या ग्रंथाची जरूर भासणें केव्हांहि स्वाभाविक आहे. सौलभ्याच्या बाबतींत बोपदेवानें कांतत्र शाखेचें धोरण स्वीकारले आहे व संक्षेपासाठीं त्यानें पाणिनीचे प्रत्याहार योग्य ते फरक करून घेतले आहेत. वैदिक वाङमयासंबंधाच्या सर्व गोष्टी त्यानें अजाबात गाळून टाकून'बहुलं ब्रह्माणि'या एकाच सूत्रानें त्यांची वाट लाविली आहे. याच्या ग्रंथांतील विशेष म्हणजे त्यांत धार्मिक गोष्टींकडे ग्रंथकाराचा ओढा आहेसें दिसतें. शक्य त्या त्या ठिकाणी बोपदेवानें हरि, हर हीं नांवें उपयोगांत आणण्याची खबरदारी घेतलेली आहे. पुढें पुढें तर या: संप्रदायाच्या लोकांनीं या बाबतींत अगदीं कळसच करून राधा, कृष्ण, शिव, दुर्गा, असल्या शब्दांनी आपली परिभाषा बनविली. पाणिनीय 'इत्' यानें काढून टाकल्यामुळें व पाणिनीहून निराळी पद्धत स्वीकारल्यामुळें याचें व्याकरण समजण्यास जरासें कठिण जातें. यामुळें योग्यता असूनहि याच्या व्याकरणाचा व्हावा तितका प्रसार झालेला नाहीं.