प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
      
उरलेलीं वेदांगें- वेदविद्येपैकी सामांचा, म्हणजेच पुढें गांधर्ववेद या नांवाने आलेल्या शास्त्राचा आणि छंद:शास्त्राचा विचार आतांपर्यत झाला. आतां उरलेलीं वेदांगें म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, आणि ज्योतिष हीं होत. शिक्षेसंबंधानें प्रास्तविक माहीती येथें आलीच आहे. तिच्या पेक्षां अधिक माहिती मागें देण्याचें कारण नाहीं. कल्पशास्त्र म्हणजे यज्ञ करण्याचें शास्त्र. त्याचें सविस्तर विवेचन करण्याकडेच दुसरा भाग खर्ची पडला आहे असें म्हणतां येईल. निरूक्त आणि व्याकरण मिळून प्राचीन भाषाशास्त्र होतें असें म्हणावयास हरकत नाहीं. दर्शनांपैकी मीमांसा कांही अंशी भाषाशास्त्रांतच मोडेल. मीमांसा ही वाक्यांतील शब्दांची परस्परांशी संगति लावून शुद्ध अर्थ कसा काढावा हें शिकविते. आज इंग्रज लोक याप्रकारच्या विवेचनाचा व्याकरणांतच अंतर्भाव करतात. मीमांसा ही जितक्या मानाने तर्कशास्त्र आहे, तितक्याच किंबहूना त्याहुनहि अधिक मानानें ती भाषाशास्त्र आहे, ही गोष्ट अधिक पटावी म्हणून तिचा अतंर्भाव प्रस्तुत प्रकरणातं केला आहे.

भारतीयांकडून भाषेच्या व वाङमयाच्या शास्त्रीय अभ्यासासाठी जे प्रयत्न झाले त्यामुळें व्याकरण, मीमांसा, शिक्षा, प्रतिशाख्यें, छंद:शास्त्र, व्युत्पत्ति अथवा निरूक्त, शब्दकोशकरण, साहित्यशास्त्र इत्यादी शास्त्रें जन्मास आलीं.

संस्कृत व्याकरणशास्त्राची घटना देणें म्हणजे सर्वच व्याकरण देणें होय. तसें करण्यास अवकाश नसल्यानें तत्संबंधी वाङमयाच्या ऐतिहासिक वृध्दीविषयीं थोडया टीपा मात्र येथें देतों.