प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                

अर्वाचीन व्याकरणसंप्रदाय:- विशिष्ट धर्मसंप्रदायाची व्याकरणाची पद्धत बोपदेवाच्या व्याकरणांत फक्त उदाहरणें घेण्यापुरतीच होती.तिचा इतर लोकांनीं कळस करून संप्रदायाचदेवतेचीं निरनिराळीं नांवें पारिभाषिक संज्ञांच्या ऐवजीं उपयोगांत आणलेलीं आहेत.हरिनामामृत व प्रबोधप्रकाश या नांवाचे दोन ग्रंथ या मासल्याचे आहेत.पहिला वैष्णव संप्रदायी असून दुसरा शैव संप्रदायी आहे.पहिल्यांत विष्णूचीं नांवें पारिभाषिक संज्ञा म्हणून घेतलीं आहेत. तर दुसऱ्यांत शंकराचीं नावें पारिभाषीक संज्ञा म्हणून घेतलीं आहेत. असो.

आरंभींचा काळ स्वतंत्र बुध्दीचे वैयाकरण निपजण्याचा होता.त्यानंतर एखादा महावैयाकरण घेऊन त्याच्या ग्रंथावर टीकोपटीकांचें जाळें विणणारांचा काळ आला. पण, हेंहि जेव्हां साधेनासें झालें तेव्हां, 'बालानां सुखबोधाय' निरनिराळीं चोपडीं लिहिण्याची वेळ आली. पण ऐवढयानेंच झालें नाहीं. पुढें तर संप्रदाय सोडून देऊन सर्व तऱ्हेच्या नवशिक्या लोकांकरितां नवीन चोपडीं निर्माण होऊं लागलीं. या विषयावरील विवेचन संपविण्यापूर्वी असल्या कांहीं ग्रंथांचें वर्णन दिल्यास अप्रासंगिक होणार नाहीं.

प्र बो ध चं द्रि का- हा ग्रंथ १५० च वर्षांचा जुना आहे. यांतील उदाहरणें रामाच्या नांवावरचीं आहेत. याचा कर्ता विज्जलभूति असावा असें म्हणतात.

भो ज व्या क र ण- याचा कर्ता विनयसुंदर. हें व्याकरण भोजराजाकरितां लिहिलें.

भा वि सिं ह प्र का श- याचा कर्ता भट्ट विनायक. हा ग्रंथ भाविसिंह नांवाच्या राजपुत्रासाठीं लिहिला होता.

दी प व्या क र ण- याचा कर्ता चिद्रुपाश्रम. हा मुख्यत: नवशिक्या लोकांकरितां आहे.

का रि का व लि- भट्टाचार्यचक्रवर्ति उपनामक नारायण नांवाच्या एका गृहस्थानें हा ग्रंथ लिहिला. यानें हा ग्रंथ आपल्या मुलाकरितां लिहिला. या मुलानेंहि त्यावर एक टीका लिहिली आहे.

बा ला व बो ध- याचा कर्ता नरहरि. असल्या तऱ्हेंच्या ग्रंथांपैकीं हा शेवटचा ग्रंथ होय. पंचमहाकाव्यांशीं परिचय करून देण्याइतकी व्युत्पत्ति शिकविणें हा याचा उद्देश आहे. दहा दिवसांत वैयाकरण तयार करण्याची ग्रंथकाराची प्रतिज्ञा आहे.

या ग्रंथकारांची यादी आणखी लांबवून ती आजतागायत पर्यंत आणतां येईल. परंतु, तसें करण्याचीं येथें अवश्यकता दिसत नाहीं.