प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.        
 
पणिनीय संप्रदायाच्या इतिहासाचें सिंहावलोकन- वरील माहितीवरून असें दिसून येतें कीं,व्याकरणाचा शास्त्र या द्दष्टीनें अभ्यास होण्यास ब्राह्मणकालांत सुरूवात झाली. ॠग्वेदाचा पदपाठ ज्या वेळीं रचला गेला त्या वेळीं या बाबतींत आणखी एक पाऊल पुढें पडलें. यास्काच्या निरूक्तांत शब्दार्थांविषयीं अधिक विचार होऊन, शब्दांच्या चार जाती झाल्या, नामें हीं आख्यातज आहेत या व्युत्पत्तिशास्त्राच्या मूलभूत सिद्धांताचा पाया घालण्यांत आला. पुढें पाणिनीनें लौकिक व छांदस या दोन्ही भाषांचें व्याकरण लिहून, लौकिक भाषेला ठावठिकीचें स्वरूप आणलें पाणिनीच्या अष्टाध्यायीनें जो व्याकरण संप्रदाय काढला त्याचे साधारणत: तीन विभाग पडतात. पैकीं पहिला पतंजलीच्या महाभाष्याबरोबर संपतो व दुसरा कैयटाच्या प्रदीपाबरोबर संपतो. याच्या पुढचा काल व्याकरणशास्त्राची प्रगति होण्यांत गेलेला नसून टीका,उपटीका व त्यांजवर पुन्हां टीका असें टीकांचें जाळें विणण्यांत गेलेला आहे.विचारविकासाच्या द्दष्टीनें पहातां ही प्रगति नसून परागतीच म्हटली पाहिजे. टीकोपटीकांच्या गोंधळांत मूळ ग्रंथ एका बाजूस राहतो व टीका समजूस घेणें हेंच मुख्य कार्य होतें. सारांश, या टीकांमुळेंअशी परिस्थिति आली कीं, तेथें विचार खुंटला, असेंच म्हणणें प्राप्त आहे. व्याकरण् शास्त्राचे बाकीचे संप्रदाय कमी जास्त प्रमाणांत या संप्रदायांतूनच निघालेले आहेत.