प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.     

कात्यायन-त्याची पाणिनीच्या सूत्रांवरील टीका.- आजच्या आपल्या माहितीप्रमाणें कात्यायनाचा काल ख्रि.पू. ५००-३५० असाच कांहीं तरी ठरविला पाहिजे. यापेक्षां जास्त निश्चितपणांने या गोष्टी ठरवितां येत नाहींत ही दुदैंवाची गोष्ट होय. कात्यायनाच्या र्वात्तिकांनी केलेलें कार्यं म्हणजे भाषेच्या वाढीमुळें ज्या ज्या ठिकाणीं पाणिनीच्या व्याकरणांतील नियम लागू पडत नव्हते त्या त्या ठिकाणीं ते सुधारणें, वाढविणें, किंवा त्यांनां पुरवण्या जोडणें हें होय. यवनानी याचा यवनाची बायको असा अर्थ पाणिनी करतो तर कात्यायन यवनलिपि असा करतो आणि यवनपत्नी हा अर्थ व्यक्त करण्याकरितां यवनी असा शब्द देतो. यांवरून रा.राजवाडे दोन कालांतील अंतर मोठें होतें आणि दोन काल यवनांच्या संस्कृतींत स्थित्यंतर होण्याइतके दूर आहेत असें सुचवितात.

या विषयावरचे त्याचे दोन ग्रंथ आहेत. या दोहोंपैकीं एक वाजसनेयिप्रातिशाख्य म्हणून आहे.हा ग्रंथ वाजसनेयि यंहितेचें व्याकरण म्हटलें तरी चालेल. पाणिनीची जीं जीं सूत्रें येथें त्याच्या कक्षेंत येऊं शकलीं तेवढयांचीच कात्यायनानें यांत चर्चा केलेली आहे. कारण, या ग्रंथाचा संबंध वैदिक भाषेपुरताच आहे. यानंतर दुसऱ्या ग्रंथात (र्वात्तिकांत)कात्यायनानें पाणिनीच्या अष्टाध्यायीचीच चर्चा आरंभिली आहे. दोष दाखविण्याकडेच पहिल्यापासून द्दष्टि ठेविल्यामुळें पाणिनीचीं जीं सूत्रें कात्यायनाला बरोबर वाटलीं त्यांवर कात्यायनाची टीका नाहीं. पाणिनीच्या ४००० सूत्रांपैकीं कात्यायनानें सुमारें १५०० घेऊन त्यांवर ४००० वार्त्तिकांत चर्चा केली आहे. सूत्रांसंबंधानें आपणांस आलेल्या शंका ग्राथित करूनच कात्यायन थांबला नाहीं, तर त्यांचें निरसनहि त्यानें आपल्यापरींने केलें आहे.

कात्यायनाला पाणिनीच्या ग्रंथावर टीका करावयाची होती तेव्हां प्रतिपादनाच्या सुलभतेसाठीं त्यानें पाणिनीचीच परिभाषा योजिली असल्यास नवल नाहीं. पण, तरी देखील त्यानें 'हल्' बद्दल व्यंजन, 'अच्' बद्दल स्वर, 'अक्' बद्दल समानअक्षर 'लट्'बद्दल भवन्ती, 'लुडू' बद्दल अद्यतनी असला फेरबदल परिभाषेंत केलेला आहे. ही गोष्ट जमेस धरून कथासरित्सागराच्या चौथ्या तरंगांतील 'प्रणष्टमैंद्रं तदरमव्याकरणं भुवि' हा उल्लेख पाहिला तर, कात्यायन हा पाणिनीहून भिन्न संप्रदायांतील वैयाकरण असावा असें म्हणावेंसें वाटतें. पतंजलीनें तर याला दाक्षिणात्य असें स्पष्टच म्हटलें आहे. [प्रियतद्विता दाक्षिणात्या :- महाभाष्य भाग १,पृ.८,ओळ२] कात्यायनाच्या पूर्वी अनेक र्वात्तिककार होऊन गेले असें कात्यायनाच्याच उल्लेखांवरून दिसतें.शाकटायन व शाकल्य ह्मांचा उल्लेख कात्यायनानें केलेला आहे.[प्रत्ययसवर्णं मुदि शाकटायन:। (.८) अविकारं शाकल्य:शषसेषु (.९)] कात्यायनाचा संप्रदाय पुढें पुष्कळ लेखकांनी चालविला.