प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
चंद्रसंप्रदायाच्या उपग्रंथांचा इतिहास- उपर्युक्त अष्टाध्यायी सूत्रांखेरीज चंद्रानें उणादिसूत्रें, धातुपाठ, लिंगानुशासन, गणपाठ, उपसर्गवृत्ति आणि वर्णसूत्रें हींहि बनविलीं होतीं. यांपैकी धातुपाठाचा उल्लेख क्षीरस्वामीनें केलेला आहे.वामनाचार्य उज्जलदत्त रायमुगुट यांनीं लिंगानुशासनाचा उल्लेख केला आहे. गणपाठ या नावांचा स्वतंत्र ग्रंथ जरी उपलब्ध नाहीं तरी त्याचा सूत्रवृत्तींत समावेश केला असल्यानें त्याचें अस्तित्व गृहीत धरून चालणे भाग आहे. वर्णसूत्रें हा ग्रंथ पाणिनीच्या शिक्षाग्रंथासारखा अगदीं लहान ग्रंथ असून त्यांत वर्णाचीं स्थानें व प्रयत्न याबद्दलची माहिती ४० सूत्रांत दिली आहे. परिभाषेसंबंधाचे चंद्रसंप्रदायाचें असें एकहि पुस्तक आपणांस उपलब्ध नाहीं. याखेरीज शिष्यलेखा नांवांचे एक काव्य व लोकानंद नांवाचें एक नाटक चंद्राचें म्हणून आहे, पण त्यांत कांहीं अर्थ नसून तीं बहुधा विशेष महत्वाची नसावींत.