प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
जैनेंद्र व्याकरणाचा काल- या संप्रदायाची सुरूवात चांद्रसंप्रदायाबरोबरच झाली. 'इंडियन ॲटिक्करी' आक्टोबर १९१४ च्या अंकामधील प्रो.पाठकांच्या जैन शाकटायनावरील निबंधांत त्यांनी जैनेंद्रव्याकरण इसवी सनाच्या पांचव्या शतकाच्या उत्तर्धांत घालण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनीं जी प्रमाणें दिलीं आहेत तीं हीं:- (१)जैनेंद्रव्याकरण काशिकाकारांनी माहीत होतें असें दिसतें (काशिका ३.३.४०) 'हस्तादेयेऽनुद्यस्तेवे चे:' हें जैनेंद्राचें सूत्र गृहीत धरुन नंतर काशिकारांनी ‘उच्चस्य’ प्रतिषेधोवक्तव्य हे सूत्र लिहिलें आहे. (२) या व्याकरणसूत्रांत ईश्वरकृष्णाचा उल्लेख व सौरमानाप्रमाणें गुरूची प्रदक्षिणा बारा वर्षांत पुरी होते या गोष्टींचा उल्लेख येतो. सूत्र ३.३.१३४ यांत 'भृगुवत्साग्रायण वृषगण ब्राह्मण् वसिष्ठं' येथें वृषगण या शब्दानें ईश्वरकृष्ण उदिष्ट आहे. कारण, वार्षगण्य हे ईश्वरकृष्णाचेंच नांव होय. सौरमानाची पद्धत पूर्वींचे जे कदम्ब राजे, त्यांच्या, म्हणजे त्यांशी समकालीन जे 'गुप्त'राजे त्यांच्या वेळीं अमलांत होती. (३) जैनेंद्राचे उल्लेख नवव्या शतकाच्या पुढीलग्रंथांतून आढळतात, त्यांवरून गोळा होणारा पुरावा: शाकटयनाच्या शब्दानुशासनांत (इ.स.१०२५)
जैनेंद्रापासून घेतलेल्या गोष्टी बऱ्याच आहेत. डॉ.पीर्टर्सनच्या माहितीप्रमाणें इ.स. ८५३ मधल्या दिगंबरदर्शनशास्त्रामध्यें द्रविड संघाचा स्थापक पूज्यपादाचा एक शिष्य होता असा उल्लेख आहे. (४) शेवटी लक्ष्मेश्वर येथील शंखबस्ति देवालयांतील एका शिलालेखांत शके ६५२ त म्हणजे इ.स. ७३० त श्रीपूज्यपादांनी आपल्या एका शिष्यास देणगी दिल्याचा उल्लेख आहे. पण पूज्यपाद अनेक असण्याचा संभव असल्यानें या शेवटच्या गोष्टींवर तितका भरंवसा ठेवितां येत नाहीं.