प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
जौमरग्रंथावरच्या टीका.– जुमरनंदीची टीका ही या ग्रंथावरील सर्वांत जुनी टीका होय. जुमरनंदी या नांवाची या शाखेंतील टीकाकारांनी बरीच मौज केली आहे. हें कोळी जातीच्या माणसाचे नांव असावे असें कित्येक म्हणतात. रसवती हें याच्या टीकेचे नांव असल्यामुळे त्या नांवावरुन या संप्रदायाला रासवत असेंहि म्हणतात.
गोयीचंद्राची टीका ही या शाखेंतील दुसरी टीका होय. हिचा उत्कृष्ट भाग म्हणजे कारक-प्रकरणावरची टीका. हां भाग व याची अभिराम विद्यालंकाराने लिहिलेली उपटीका यांचे वाक्यमीमांसेसाठीं म्हणून अजून सुद्धां अध्ययन करतात. या टीकेवर न्यायपंचातन, केशवदेव, चंद्रशेखर, विद्यालंकार, वंशीवादन, हरिराम वगैरेंनी टीका लिहिलेल्या आहेत. हा संप्रदाय कातंत्राच्या खालोखाल पश्चिम बंगाल्यात अद्याप रुढ आहे.