प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
दुर्गसिंह व त्याची वृत्ति- दुर्गसिंहाच्या पूर्वी कातंत्र व्याकरणावर कोणी टीकाकार झाले कीं नाहीं हें निश्चित सांगतां येत नाहीं बहुतकरून त्याची वृत्ति हाच टीकेचा प्रथम प्रयत्न असावा.सुबोधता व सरळपणा या मुख्य हेतूस बाध येऊं न देतां, मूळ कातंत्र व्याकरणाला जेवढी पूर्णता आणतां येणें शक्य होतें तेवढी या वृत्तींत आणिली आहे. दुर्गसिंहाचा उल्लेख हेमचंद्रानें केला आहे. त्याला चंद्रव्याकरणाचा धातुपाठ माहित होतासें दिसतें; कारण्, त्याच्याच आधारावर त्यानें कातंत्र धातुपाठाची रचना केलेली आहे.तेव्हां त्याचा काळ इसवी सनाचें आठवें शतक हा ठरविण्यास हरकत नाहीं. दुर्गसिंह, आणि दुर्ग, दुर्गात्मा, दुर्गाचार्य इत्यादि ग्रंथकार हें एक नव्हेत. यांपैकीं शेवटचा दुर्गाचार्य हा यास्काच्या निरूक्तावरील प्रसिद्ध टीकाकार होय. दुर्गसिंह हा बौद्धपंथी नसावा आणि जर आपण तसें मानलें तर हा दुर्गसिंह व या दुर्गसिंहाच्या टीकेवरचा टीकाकार दुर्गसिंह हे दोन इसम मानले पाहिजेत;कारण दुसऱ्या दुर्गसिंहाच्या ग्रंथांत त्याच्या उपसानेचा स्पष्ट उल्लेख आहे.