प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             
 
दुर्गसिंहाच्या वृत्तीवरील उपटीका- दुर्गसिंहानंतरच्या टीकाकारांनीं दुर्गसिंहवृत्तीवरच टीका लिहिलेली आहे, स्वतंत्र रीत्या कोणतीच रचना केली नाहीं. वर्धमानाची कातंत्र ही त्यावरील सर्वोत जुनी टीका होय. बोपदेवानें आपल्या काव्यकामधेनु ग्रंथांत वर्धमानाचा उल्लेख अनेकवेळां केलेला आहे. त्रिलोचनदासानें लिहिलेली टीका ही दुर्गसिंहाच्या वृत्तीवरील दुसरी टीका होय. त्रिलोचनदासाचा उल्लेख बोपदेवाने व सारस्वतावरचा टीकाकार विठ्ठल यानें केला आहे. याच्या टीकेचें नांव कातंत्रवृत्तिपंजिका. तिजवरून असें दिसतें कीं हा ग्रंथकार कायस्थ असून त्याच्या बापाचें नांव मेघ व मुलाचें नांव गदाधर होतें. महादेव नांवाचा आणखी एक टीकाकार या वृत्तीवर आहे. पण त्याच्या बद्दलची विशेष माहिती आज उपलब्ध नाहीं. दुर्गात्मा किंवा दुर्ग याचा उल्लेख पूर्वीच येऊन गेलेला आहे. खेरीज एका अज्ञात लेखकानें ढुंढिका किंवा कातंत्रवृत्ति नांवाची एक टीका लिहिलेली आहे.