प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                     
 
निषेध:- आतां क्रमप्राप्त निषेधाबद्दल विचार करूं.

येथें पहिला प्रश्न असा उत्पन्न होतो कीं, निषेधाचा आणि पुरूषार्थाचा संबंध काय ? त्याविषयी असे सांगतां येतें कीं, अनर्थकारक कर्मापासून मनुष्याची निवृत्ति करून इष्टप्राप्तीला येणारीं विघ्नें नाहींशीं करणें हा निषेधवाक्यांचा उपयोग आहे.

वेदवाक्यानें कथन केलेलें कर्म ऐकल्याबरोबर हें श्रेयस्कर कर्म आहे म्हणून तिकडे मनुष्याची प्रवृत्ति होते. त्याचप्रमाणें निषेधक वाक्य ऐकल्याबरोबर हें कर्म अनर्थकारक असें वाटून मनुष्याची त्या कर्मापासून निवृत्ति होते.