प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                     
 
नत्राचा अन्वय अव्यवहित धातूवर करावयाचा कीं प्रत्ययाच्या भावनेवर.- ‘न भक्षयेत्’ ‘न हन्तव्य: इत्यादि वाक्यांमध्यें नत्राचा अन्वय अव्यवहित धातूवर करावयाचा कीं, प्रत्ययवाच्य भावनेवर करावयाचा या प्रश्नासंबंधीं विचार करतां असें दिसतें कीं, अव्यवहित धातूवरच नत्राचा अन्वय करणें बरें. तसा अन्वय केला असतां ‘यजेत’ याचा अर्थ ‘त्याग करा’ हा ज्याप्रमाणें होतो, त्याप्रमाणें ‘न यजते’ याचा अर्थ ‘यागाभाव करावा’ असा होऊन हें निषेधवाक्य न होतां विधिवाक्यच होईल. परंतु हें करणें कोणत्याहि द्दष्टिनें अयोग्य होय. ‘एकाचें विशेषण तदन्य पदार्थाचें विशेषण होऊं शकत नाहीं.’ याच न्यायानें प्रत्ययार्थभावनेचा धातु हा विशेषण बनलेला असल्यामुळें त्यावर दुसऱ्या विशेषणीभूत पदाचा अन्वय करतां येत नाहीं. म्हणून ‘न’ या अव्ययाचा अन्वय भावनावाचक प्रत्ययावरच करावयाचा. त्याप्रमाणें लिंगाचा अर्थ प्रवर्तना, तीवर नत्राचा अन्वय केल्यास प्रवर्तनेच्या उलट निवर्तना असा अर्थ उघड होतो. हा अर्थ अत्यन्त परस्पर विरूद्ध आहे हेंच खालील श्लोकानें दाखविलें आहे.    

अन्तरं याद्दशं लोके ब्रह्महत्याश्वमेधयो:।
द्दश्यते ताद्दगेवेदं विधानप्रतिषेधयो: ॥

अर्थ:- ब्रह्महत्या आणि अश्वमेध यांच्यामध्यें जितकें अंतर आहे तितकेंच विधि आणि निषेध यांमध्यें आहे.

आतां नत्राचा प्रत्ययाशीं अन्वय करण्यास जर कांहीं बाधक असेल तर त्या नत्राचा धातूवरहि अन्वय होतो.