प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
नामधेयत्व येण्याचीं चार कारणें- हें नामधेयत्व चार कारणांनीं येतें. (१) मत्वर्थ लक्षणेचें भय, (२) वाक्यभेदाचें भय, (३) तत्प्रख्यशास्त्र व (४) तद्वयपदेश हीं तीं चार कारणें होत.
म त्व र्थ ल क्ष णे चें भ य.- मत्वर्थलक्षणेच्या भीतीनें यज्ञाचें नांव मानणें भाग पडतें. याचें उदाहरण ‘उद्भिदा यजेत पशुकाम:’ हें होय. या ठिकाणीं ‘उद्भिद्’ हें यज्ञाचें नांव न स्वीकारल्यास ‘उभ्दिद्मता यागेन’ अशी मत्वर्थलक्षणा करावी लागेल. ती करणें हें अर्थद्दष्टया गौरवयुक्त आहे. गौरव स्वीकारण्यापेक्षां गौरव न घेतां अन्य जो अर्थ जुळत असेल तो घेणें हे बरें. म्हणून या ठिकाणीं ‘उद्भिद्’ हें यागनाम आहे असें सिद्ध होतें. ही गोष्ट ‘अपिवा नामधेयं स्यात् यदुत्पत्तावपूर्वविधायकत्वात्’ (जै. सू. १. ४. २) या सूत्रानें जैमिनीनें प्रतिपादिली आहे.
वा क्य भे दा चें भ य.- वाक्यभेद करण्याचा प्रसंग टाळण्याकरितां कांहीं ठिकाणीं नामधेय स्वीकरिलेलें असतें. उदाहरणार्थ ‘चित्रया यजेत पशुकाम:’ याचा पशूची इच्छा असणाऱ्यानें ‘चित्रा’ याग करावा,’ असा अर्थ आहे. ‘चित्रा’ हें यागाचें नांव घ्यावें कीं चित्रविचित्र आणि स्त्रीलिंग यांचें विधान करणारें हें वाक्य आहे असा येथें प्रश्न आहे. ‘चित्रा’ हें पद येथें गुणविधायक नाहीं. कारण, गुणविधान ‘दधिमधु पयो घृतं धाना उदकं तण्डुलास्तत्संसृष्टं प्राजापत्यम्’ या वाक्यानें पूर्वीच केलें आहे. म्हणून गुणविशिष्ट यागाचें विधान करणें अयोग्य आहे. शिवाय एकाच वाक्यानें फलसंबंध आणि गुणविधान सांगितल्यास वाक्याची आवृत्ति करणें भाग पडतें. हाच आवृत्तिरूप वाक्यभेद टाळण्याकरितां ‘चित्रा’ हें यागाचें नांव आहे असें ठरविणें भाग पडतें.
वाक्याच्या आवृत्तीचें स्वरूप असें होईल. ‘यागेन पशुं भावयेत्’ ‘यागानें पशु मिळवावा.’ आणि ‘चित्रत्वस्त्रीत्व विशिष्ट पदार्थानें याग करावा’ हा आवृत्तिस्वरूप वाक्यभेद ‘चित्रा’ हें नांव घेतल्यानें टाळतां येतो. म्हणून ‘चित्रा’ हें नांव स्वीकारलें आहे. हें जैमिनीने ‘यस्मिन्गुणांपदेश: प्रधान तोऽभिसंबंध:’ (जै. सू. १. ४. ३) या सूत्रानें सांगितले आहे.
त त्प्र ख्य शा स्त्र -आतां तत्प्रख्यशास्त्रावरून यागाचें नांव घेण्याचा प्रसंग कोठें आहे तें पाहूं. ‘अग्निहोत्रं जुहोति’ ‘आघारमाघारयति’ इत्यादि तत्प्रख्यशास्त्रानें नामधेय झाल्याचीं उदाहरणें होत. ‘तत्प्रख्यशास्त्र’ म्हणजे त्या गुणाचें प्रख्यापकशास्त्र दुसरें विद्यमान असल्यामुळें ‘अग्निहोत्रं जुहोती’ ‘आघारमाघारयति’ इत्यादि ठिकाणीं ‘अग्निहोत्र’ ‘आघार’ वगैरें नांवेच स्वीकारणें भाग पडतें.
‘अग्नींत’ हवन करावें असें अग्निरूपी गुणाचें विधान या वाक्यानें केलें असें म्हणतां येत नाहीं. कारण, ‘आहव नीये जुहोति’ या पूर्व वाक्यानेंच येथें अग्नीची प्राप्ति आहे. प्राप्त झालेली गोष्ट पुन:प्रतिपादणें हें विधीचें कार्य नसल्यामुळें ह्या ठिकाणीं ‘अग्निहोत्र’ हें नांवच स्वीकारणें भाग आहे. ‘अग्नौ होत्रं’ असा अर्थ करून अग्निरूपी गुणाचें ज्याप्रमाणें विधान करतां येत नाहीं, तसेंच ‘अग्निेय होत्रम्’ असा अर्थ करून ‘अग्नि’ ही देवताहि घेतां येत नाहीं. कारण, ‘अग्निर्ज्योति र्ज्योतिरग्नि:स्वाहा’ या वाक्यानेंच ‘अग्नि’ ही देवता प्राप्त आहे. म्हणून ‘अग्निहोत्र’ हें येथें नांवच घेतलें पाहिजे.
हें सर्व ‘तत्प्रख्यं चान्सशस्त्रम्’ (जै. सू. १. ४. ४) ह्या सूत्रानें जैमिनीनें दाखविलें आहे.
त व्द्य प दे श.- तव्द्यपदेशावरून कांहीं ठिकाणीं ‘नामधेय’ ठरवावें लागतें. उदाहरणार्थ, ‘श्येनेनाभिचरन्यजेत’ म्हणजे ‘अभिचार करणाऱ्या माणसानें श्येन नांवाचा याग करावा. ‘या ठिकाणीं ‘श्येन’ हें तव्द्यपदेशानें यागाचें नांव आहे.
व्यपदेश म्हणजे उपमान. श्येनाची जी उपमा तीवरून या ठिकाणीं श्येन पक्षी असा अर्थ न करतां श्येनयाग असा अर्थ केल्याशिवाय अर्थवाद वाक्याचें तात्पर्य बरोबर लागू शकत नाहीं. म्हणून ‘श्येन’ हें नांवच घेणे भाग आहे.
ज्या वाक्यांत श्येनाचा उपमात्वानें उल्लेख आहे तें वाक्य खालीलप्रमाणें आहे:-
‘यथा वैश्येनो निपत्यादत्ते, एवमयं द्विषन्तं भ्रातृव्यं निपत्यादत्ते यमभिचरति श्यनेन’ अर्थ.- ज्या प्रमाणें श्येन पक्षी झडप मारून (कांहींहि) घेतो, तसा श्येनाभिचारी द्वेषी शत्रूला झडपतो.
येथील उपमानोपमेयभावावरून श्येन शब्दानें कर्मच घेतलें पाहिजे, असें स्पष्ट होतें. त्याशिवाय श्येन शब्दाची उपमा बिलकुल जुळत नाहीं. कारण, उपमानउपमेयभाव नेहेमीं भिन्ननिष्ठ असतो. ज्याची त्यानेंच स्तुति होत नाहीं, म्हणून येथें श्येनययाग स्वतंत्र मानून त्याची सदर अर्थवादानें स्तुति करणें व त्याला श्येन पक्ष्याची उपमा देणें ही गोष्ट अत्यंत जुळते. अतएव तद्वयपदेशावरून येथें ‘श्येन हें यज्ञाचें नांव आहे. हें ‘तद्वयपदेशं च’ (जै.१. ४. ५) या सूत्रानें जैमिनीनें दाखविलें आहे.