प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
धातूशीं किंवा प्रत्ययाशीं अन्वय करण्यास दोन बाधक कारणें.- सदरप्रमाणें अन्वय करण्यास बाधक उपक्रमविरोध व विकल्पप्रसक्ति हीं दोन कारणें असतात.
उपक्रमविरोध.- उपक्रमविरोधाचें उदाहरण ‘तस्यव्रतं’ असा उपक्रम करून ‘नेक्षेतोद्यन्तमदित्यम्’ असा निषेध सांगितला आहे तेथें पहावयास मिळतें.
स्नातकाचीं व्रतें सांगतांना ‘त्यांनीं हीं व्रतें करावींत’ असा उपक्रम करून ‘नेक्षेतोद्यन्तमदित्यम्’ असें पुढें म्हटलें आहे. येथें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, ‘ईक्ष्’ या धातूवर नत्राचा अन्वय करावा कीं, विधीसंबंधी प्रत्ययावर करावा.
प्रत्ययावर अन्वय करणें हें प्रत्ययार्थाच्या प्राधान्यामुळें योग्य आहे. पण त्यामुळें विघ्यर्थप्रवर्तनेविरूद्ध निवर्तना असा होऊन ‘तस्य व्रतम्’ या उपक्रमाच्या विरूद्ध अर्थ होईल. कारण, ‘व्रत’ या शब्दानें कर्तव्य अशा अर्थाचा बोध होतो; आणि पुढें कर्तव्याचा अभाव कथन केला जातो. म्हणून येथें नत्राचा अन्वय प्रत्ययावर न करतां धातूवर केला पाहिजे. म्हणजे ‘ईक्षणाभाव करावा’ असा विधिरूप अर्थ होईल म्हणून ‘उपक्रमविरोध’ टाळण्याकरितां नत्राचा अन्वय धातूवर करणें योग्य होय.
परंतु नामाशीं किंवा धातूशीं नत्राचा संबंध असतां तो निषेधार्थक केव्हांहि नसतो. तदर्थक एक श्लोक आहे.
नामधात्वर्थयोगी तु नैव नत्र प्रतिषेधक:।
वदत्यब्राह्मा धर्मावन्यमात्र विरोधिनौ ॥
विकल्पप्रसक्ति.- विकल्पप्रसक्ति होईल म्हणजे विकल्प घ्यावा लागेल. म्हणून कांहीं ठिकाणीं नत्राचा अन्वय प्रकृतीवर होतो. उदाहरणार्थ ‘नानुयाजेषु ये यजामहं करोति’ या वाक्यांत ‘न’ चा अन्वय प्रत्ययाकडे केल्यास अनुयाजामध्यें ‘ये यजामहे’ हा मन्त्र म्हणूं नये असा अर्थ होतो. निषेध प्राप्तिपूर्वक असावयास पाहिजे. प्राप्ति ‘यजतिषु ये यजामहं करोति’ या वाक्यानें आहे. शास्त्रप्राप्त गोष्टीचा निषेध केल्यास वचनांत परस्पर विरोध येऊन एक-वचन व्यर्थ येण्याचा प्रसंग येईल. असा विरोध आला असतां विकल्प घ्यावा लागेल. विकल्प घेण्यांत आठ दोष स्वीकारावे लागत असल्यामुळें विकल्प टाळणें हें शास्त्रद्दष्टया बरें असतें. म्हणून या ठिकाणी नत्राचा अन्वय प्रत्ययावर न करतां अनुयाजाशीं करावा. म्हणजे ‘अनुयाजव्यतिरिक्त स्थलीं’ ‘ये यजामहे’ हा मन्त्र म्हणावा. असा अन्वय केल्यानें परस्पर विरोध न येतां- विकल्प स्वीकारावयास न लागतां-वाक्यार्थ करतां येतो. यावरून ‘विकल्प’ घेण्याचा प्रसंग आला म्हणून नत्राचा अन्वय गौणावरहि करावा लागला ही गोष्ट सिद्ध झाली. हाच पर्युदास होय.
या निषेधासंबंधीं विचार करतांना हीं गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, प्रतिषेध ज्या ठिकाणीं विकल्पाला कारण असतो त्या ठिकाणीं निषेध अर्नथहेतु नसतो. कारण विधि आणि निषेध दोनहि यज्ञाकरितांच असतात. परंतु ज्या ठिकाणीं स्वभावत: प्राप्ति असते आणि शास्त्रवचनानें निषेध केलेला असतो तेथें निषिद्ध पदार्थ अनर्थहेतु असतो. उदाहरणार्थ ‘न कलज्जं भक्षयेत्’ म्हणजे ‘विषारी बाण लागून मेलेल्या हरणाचें मांस खाऊं नये.’