प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
त्यांचे प्रकार.- अर्थवादवाक्याचें विधिशेष व निषेधशेष असे दोन प्रकार आहेत.
वि धि शे ष.- प्रथम विधिशेषाचें उदाहरण घेऊं. वायव्यं श्वेतमालभते भूतिकाम:’ ‘म्हणजे ऐश्वर्येच्छु माणसानें वायुदेवतेला उद्देशून पांढरा पशु मारावा.’ या वाक्याचा स्तुतिरूप अर्थवाद ‘वायुर्वैक्षेपिष्ठा देवता’ हा होय. ‘वायुदेवता अतिशय वेगवती आहे’ असा या वाक्याचा अर्थ आहे. म्हणून, त्या देवतेला पशु दिला असतां ती देवता तात्काळ फल देईल असा अर्थ झाला.
नि षे ध शे ष.- निषेवशेषाचें उदाहरण ‘बर्हिषि रजतं न देयम्’ ‘यज्ञांत रूपें देऊं नये’ हें आहे. या निषेधाचा अवशेषभाग खालीलप्रमाणें आहे.
‘सोऽरोदीद्यदरोदीत्तद्रुद्रस्य रूदत्वं यदश्चशीयत तद्रजत हिरण्यमभवत्तस्माद्रजतं हिरण्यमभवत्तस्माद्रजत हिरण्यमदक्षिण्यमभु हि यो बर्हिषि ददाति पुराऽस्य संवत्सराद्गृहे रूदान्ति तस्माद्बर्हिषि रजतं न देयम्’ (तै. सं. १.५.१)
अर्थ.- ‘अग्नि रडला म्हणून त्याला रूद्र म्हणतात. जें नेत्रांतून पडलें तें रजतरूपी धन होय. तें अश्रुज धन जो यज्ञांत देतो त्याच्या घरांत वर्षाच्या आंत रडारड होते. म्हणून यज्ञांत रजतदान देऊं नये.
येथें रूप्याचीं निंदा केल्यानें अर्थवादाला अर्थवत्व आहे. अशा वाक्याचें आलस्यादिकानें अप्रवृत्त असणाऱ्यांनां प्रवृत्ति देणें हें फल असतें.
अर्थवादाचे आणखी तीन प्रकार आहेत. विरोधे गुणवाद:स्यात् अनुवादोऽवधारिते । भूतार्थवादस्तध्दानादर्थवाद स्त्रिधा मत: ॥
गु ण वा द.- अन्य प्रमाणाचा विरोध आल्यास त्यास गुणवाद असें म्हणतात. उदाहरणार्थ, ‘आदित्यो यूप:’ येथें यूप आणि आदित्य एक असणें केव्हांहि शक्य नाहीं. अर्थात् यावरून इतकाच अर्थ घ्यावयाचा कीं, यूप आदित्यासारखा तेजस्वी असावा.
अ नु वा द - अन्यप्रमाणानें माहित असलेल्या गोष्टीचें प्रतिपादन करणाऱ्या वाक्यास ‘अनुवाद’ असें म्हणतात. उदाहरणार्थ ‘अग्निर्हिमस्य भेषजम्’ अग्नीचें हिमविरोधित्व जगप्रसिद्धच आहे.
भू ता र्थ वा द - अन्यप्रमाणांनीं माहित नसणाऱ्या आणि विरोधहि नसलेल्या अर्थवादास ‘भूतार्थवाद’ असें म्हणतात. उदाहरणार्थ, ‘इन्द्रो वृत्राय वज्रमुदयच्छत’ ‘इन्द्र वृत्रावर वज्र उगारता झाला.’ ही गोष्ट अन्य प्रमाणांनीं विदित नाहीं.
या प्रकारें वेदाचें अर्थवत्व सिद्ध झालें, आणि त्याचप्रमाणें प्रयोजनवत्वहि त्यामध्यें दिसतें. येणेंप्रमाणें, विधि, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद या वेदांतील पांच प्रकारांचें विवेचन पूर्ण झालें आहे. सारांश असंगत, सदोष, असें वेदांत कांहिहि नसून एकसूत्रता सर्वत्र स्पष्ट दिसते. म्हणून सर्वोनीं वेदविहित धर्माचा विचार करावा.
वैदिककर्म ब्रह्मार्पणविधीनें करावें कीं जसें विहित आहे तसें त्यात्या देवतेला उद्देशून करावें याविषयीं आचार्यांमध्यें मतभेद आहे त्याविषयीं येथें विचार करावयास नको.