प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
जैमिनीच्या ग्रंथाचा भाषाशास्त्राशीं संबंध.- जैमिनीच्या ग्रंथांत भाषेचें अशा रीतीनें पृथक्करण केलें आहे कीं, वाक्यांतील शब्दांचा एकमेकांशीं किंवा निरनिराळ्या विधानांचा एकमेकांशीं संबंध लक्षांत यावा. व्याकरण म्हणजे केवळ नैरूक्तांचें शास्त्र नाहीं. तर्कशास्त्राचा भाषाशास्त्राशीं निकट संबंध किती आहे, याची साक्ष जैमिनीच्या ग्रंथावरून जेवढी पटेल तेवढी दुसऱ्या कोणत्याहि ग्रंथावरून पटणार नाहीं. जैमिनीची मीमांसा ही धर्माचें स्पष्टीकरण करते परंतु धर्म याचा अर्थ पुढें व्यापक होऊन कायदा हा अर्थ त्यांत शिरला म्हणून मीमांसा हा कायदेशास्त्रावरील ग्रंथ आहे असें मात्र कोणी समजूं नये. जैमिनीला श्रौंतकर्म म्हणजे तीन अग्नींवरील कर्म करण्यासाठीं वेदांचा शास्त्रशुद्ध अर्थ कसा लावावा एवढ्याशींच कर्तव्य होतें.
निरूक्त, पदपाठ, शिक्षा, प्रातिशाख्यें, व्याकरण आणि मीमांसा या भाषाशास्त्रांतर्गत शास्त्रांचें विवरण येथपर्यंत करण्यांत आलें आहे.