प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                 

तौलनिक भाषाशास्त्राची यूरोपांत उत्पत्ति- व्याकरणशास्त्राचे तीन भाग करतां येतील.एका भाषेचें एका कालापुरतें व्याकरण, ऐतिहासिक व्याकरण व तौलनिक व्याकरण. तौलनिक व्याकरण म्हणजे अनेक भाषांचें पृथक्करण करून निरनिराळया भाषांच्या घटनेंत सादृश्य किंवा विसाद्दश काय आहे तें पाहणें. या तीन प्रकारच्या प्रयत्नांपैकीं पहिल्या तऱ्हेचा प्रयत्न यूरोपांत थोडाबहुत झाला, आणि भाषातत्वक्ते व व्याकरणज्ञहि थोडेबहुत झाले. त्यांत बर्नहार्डी वगैरेचीं नांवें देतां येतील. तथापि व्याकरणशास्त्रांत म्हणण्यासारखी यूरोपची प्रगति जेव्हां त्यांनां संस्कृत व इतर भारतीय भाषांशीं परिचय झाला आणि भारतीय व्याकरणपद्धति द्दष्टीस पडली तेव्हांच झाली. व्याकरणशास्त्रावरचा यूरोपीयांचा महत्वाचा पहिला ग्रंथ म्हटला म्हणजे हंबोल्टचें जर्मनमधील कविभाषेचें व्याकरण, आणि विशेषेंकरून त्यांतील त्याची प्रस्तावना, हा होय. म्हणजे जी बुध्दिमत्ता हिंदुस्थानांत वररूचिहेमचंद्र यांच्या काळांत होती ती बुध्दिमत्ता यूरोपमध्यें येण्यास हंबोल्टच्या काळापर्येंत वाट पहावी लागते.याच्यानंतर तौलनिक व्याकरणशास्त्राचा उदय झाला असें म्हणतां येईल. आणि वॉप, बेन्फे, बीम्स यांसारख्या पंडितांचा काळ त्याच्यानंतरचा होय.