प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.            
 
त्याच्या ग्रंथावर टीका उपटीका वगैरे- हेमचंद्राच्या संप्रदायाच्या उपग्रंथांचें वर्णन विस्तारेंकरून करीत बसण्याचें कारण नाहीं.हेमचंद्राच्या शब्दानुशासनावरच्या टीका,किंवा उपटीका म्हटलें तर जास्त शोभेल, बृहद्व्रत्तिन्यास व हैमलधुन्यास अशा आहेत. या टीकांखेरीज दुसऱ्या नांव घेण्यासारख्या टीका यावर नाहींत.बृहद्व्रत्तिढुंढिका या ग्रंथाची पूर्ण हस्तलिखित प्रत अद्याप उपलब्ध नाहीं. सर्वांत मोठें हस्तलिखित पांचव्या अध्यायापर्यंत आहे.याचा कर्ता कोण हेंहि अनिश्चितच आहे.डेक्कन कॉलेजच्या हस्तलिखितांपैकीं एका हस्तलिखितांत हा धनचंद्राचा ग्रंथ होय असें म्हटलें आहे [इ.स.१८७७-७८ चें नं.१० चे हस्तलिखित] परंतु दुसऱ्या एका हस्तलिखितांत याचा कर्ता जिनसागर असें म्हटलें आहे [इ.स.१८६९-७० चेंनं.११९ चेंहस्तलिखित]. तिसऱ्या एका हस्तलिखितामध्यें त्याचें कर्तृत्व नंदसुंदर यास दिले आहे.यांत ग्राह्यांश एवढाच दिसतो कीं, ढुंढिका ग्रंथाचे दोन पाठ त्यावेळी प्रचलित असावे व त्यांचे कर्तेहि निरनिराळे असावे. आठव्या अध्यायावरची ढुंढिका ही लघुतपागच्छ पंथांतील हर्षकुलाचा शिष्य उदयसौभाग्य यानें लिहिली आहे. ही इ.स. १५३३ मध्यें लिहिली गेली. शब्दानुशासनाचीं सूत्रें क्रमश:घेऊन प्रत्येक सूत्राचे शब्दश:विवरण करणें आणि पुष्कळ ठिकाणी नियमांची उदाहरणे देऊन निरनिराळया रूपांची प्रसंगोपत दुसऱ्या सूत्रांचा उपयोग करून व्युप्तत्ति देणें हा ढुंढिकेचा उद्देश आहे. शब्दानुशासनावरील दुसरी टीका जी हैमलघुन्यास म्हणून सांगितली ती चांद्रगच्छ पंथांतील उदयचंद्राचा शिष्य देवेंद्र सूरि यानें लिहिलेली आहे. उदयचंद्राच्या विस्तृत न्यासाचें हें सार आहे असें त्याच्याच म्हणण्यावरून दिसतें. या टीकेचा विशेष हा आहे कि, हेमचंद्रानें उध्दृत केलेलीं वचनें कोठून घेतलेली आहेत हें जागोजाग यांत सांगितलें आहे. शब्दमहार्णवन्सास  नांवाची एक विनांवी टीका आहे.

शब्दानुशासनाचे साररूप असे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एक हैमललघुप्रक्रिया व दुसरा हैमकौमुदी. हैमललघुप्रक्रिया हा ग्रंथ कृतिविजयगणीशिष्य विनयविजयगणि यानें लिहिला. दुसरा हैमकौमुदी ग्रंथ इ.स.१६६९ साली सूरींपैकीं मेघविजय नांवाचा एक मनुष्य होता त्यानें लिहिला. या ग्रंथाच्या आधारावर सिध्दान्तकौमुदी हा ग्रंथ लिहिला गेला असे म्हणतात. खरा प्रकार याच्या अगदीं उलट असावा.

शिवाय आणखी कांहीं किरकोळ ग्रंथ आहेत. गुणरत्न सूरांनें लिहिलेला क्रियारत्नसमुच्चय हा त्यांपैकीं एक ग्रंथ आहे. गुणरत्नसूरी हा देवसुंदरसूरांचा शिष्य असून त्यानें हा ग्रंथ इ.स. १४०८ त लिहिला. यांत ग्रंथाच्या शेवटी जवळ जवळ ८० श्लोकांत त्यानें जी गुरूपरंपरा दिली आहे ती ऐतिहासिक द्दष्टा बऱ्याच महत्वाची आहे.