प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.               

जौमरशाखा व तिचा प्रवर्तक.- या शाखेचे नांव जे लोकांत प्रसिद्ध आहे ते चुकीनें दिलें गेलें असावे.  या शाखेंतील प्रख्यात लेखक जुमरनंदी याच्या नांवावरुन हें नांव पडलेलें आहे.  परंतु, या शाखेचा प्रवर्तक जो क्रमादीश्वर त्याच्या मागाहून कांही काळाने हा उदयास आला असावा असे वाटते.  वंशाबद्दल किंवा जन्मभूमीबद्दल काही माहिती मिळत नाही.  याच्या ग्रंथाचे नांव संक्षिप्तसार.  या नांवावरुन हा ग्रंथ दुसऱ्या कोठल्या तरी मोठया ग्रंथाचे सार असावें असें दिसते आणि पाणिनीच्या व्याकरणाखेरीज ज्या अर्थी हें कोठल्याहि व्याकरणाचें सार असणें शक्य नाहीं, त्या अर्थी प्रक्रियाकौमुदी किंवा सिद्धांतकौमुदी यांसारखे जे ग्रंथ आहेत त्यांच्या पूर्वीचा हा ग्रंथ असावयास पाहिजे.  ऑफ्रेक्टनें हा संप्रदाय बोपदेव संप्रदायाच्याहि पूर्वीचा आहे असे म्हटलें आहे; पण हा बोपदेवाच्या लगेच मागाहून निघाला असे कोलब्रूकचें मत आहे.