प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.           

जैनेंद्र संप्रदायाचें उपलब्ध वाङमय.- अभयनंदी व सोमदेव यांच्या दोन टीका एवढेंच काय तें जैनेंद्र संप्रदायाचें उपलब्ध वाङमय आहे. अर्थात् व्याकरणसूत्रें आहेतच. सोमदेव हा शिलाहार राजा भोजदेव याचा समकालीन असून आजुरिका येथील राहणारा होता असें त्याच्या म्हणण्यावरून दिसतें. आजुरिका व कोल्हापूर संस्थांनांतील आजरें हीं एकच असावीत असें वाटतें.

जैनेंद्र सूत्रांचा 'पंचवस्तु' नांवाचा आणखी एक संक्षेप केलेला आहे. याचा उपयोग नवशिक्या लोकांकरितां आहे. या ग्रंथांत अभयनंदीचा सूत्रपाठ प्रमाण धरलेला आहे. हा ग्रंथ देवनंदीचा म्हणतात, पण ती चूक आहे. पंचवस्तु ग्रंथांचें उपोध्दातप्रकरण प्रक्षिप्त असावें असें दिसतें. यांत प्रत्याहारविचार असून सर्व ग्रंथाचा कर्ता कोणी आर्यश्रुत कीर्ती हा होता असें त्यांत म्हटलें आहे.हाच या रूपांतराचा कर्ता म्हणावयाचा कीं काय ? श्रुतकीर्तीचा काळ अजमासे इ.स. १०४५ असावा असें प्रो.पाठक म्हणतात.

तेराव्या शतकापासूनचा जैनेंद्र संप्रदायाचा इतिहास फारसा अवगत नाहीं. या संप्रदायांतील ग्रंथांचा अभ्यास दक्षिणहिंदुस्थानांत दिगंबर जैन लोकांपैकी एखाददुसरा विद्यार्थी करतो.