प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
जैनेंद्र व्याकरण- जैनेंद्र व्याकरणाच्या ग्रंथकर्तृत्व निर्णायक आणि व्याकरणशास्त्रचिकित्सक वादविवादांत महत्वाचे दोन लेख आहेत. ते दोन्ही लेख देऊन या विषयाला प्रारंभ करावा. एक लेख डॉ.कीलहॉर्न यांचा इंडियन अँटिक्वरी पु. १० मध्यें आहे. आणि दुसरा प्रोफेसर पाठकांचा पुस्तक १२ मध्यें आहे. कीलहॉर्नच्या लेखाकडे प्रथम लक्ष देंऊ.
जैनेंद्र व्याकरणाच्या म्हणून समजल्या जाणाऱ्या ( कारण हें देवनन्दि नांवाच्या मनुष्यानें केलें असावें, असा उल्लेख मिळतो ) अशा पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्यें खालील सरकारी हस्तलिखित प्रती आहेत.
१.(अ) ३१४ पानांचा कागदावरील जैनेन्द्रवयाकरणमहावृत्ति नांवाचा हस्तलेख-त्यांत 'अभयनन्दिमुनी' यांचे टीकेसहित. १-१-१ पासून ४-३-३० इतकीं मूळ सूत्रें आहेत.
(ब) ७५ पानांचा वरच्या पुढील सूत्रांचा म्हणजे ४-४-१४३ ( नैकाच: पाणिनीचें ६-४-१६३ ) पासून शेवटपर्यंत (५-४-१२४).
२.(अ) सोमदेवयति किंवा मुनीश्र्वर ( सोममार व्रतिप ) याच्या शब्दार्णवचंद्रिका नांवाच्या संक्षिप्त टीकेसहित कागदावरील २६२ पानांचा संपूर्ण सूत्रांचा हस्तलेख.
(ब) जुन्या भूर्जपत्रावरील वरच्याच ग्रंथाचा ३०० पानांचा परंतु हल्लीं फारच अव्यवस्थित असलेला हस्तलेख. शब्दार्णवचन्द्रिकेच्या हस्तलेखांवरून हा ग्रंथ इ.स. १२०५ त भोजदेवाच्या (दुसऱ्या भोजाच्या) वेळेस केलेला दिसतो. कोल्हापूर प्रांतांत आजुरिका (आजरें ?) येथें गंडरादित्य देव यानें स्थापन केलेल्या जिनालयांत सांपडला आहे.
३.कागदावरील १३८ पानांचा हस्तलेख. ग्रंथनाम पंचवस्तु. कौमुदीच्या सारखी याची पद्धति आहे. या लेखाच्या शेवटीं सर्व ग्रंथ देवनन्दि याचा आहे असें म्हटले आहे.
वर जे हस्तलेख सांगितले त्यांच्या दोन जाती करतां येतील. अभयनन्दिन् आणि पच्चवस्तुंक यांनीं त्यांतले त्यांत संक्षिप्त घेतली आहे, आणि सोमदेवाच्या टीकेची मोठी आहे.
सर्व संस्कृत व्याकरणांत हें बरेंच कमी दर्जाचें ठरते.कारण यांत फारसा नवेपणा नाहीं. यांतील मुख्य तत्व म्हणजे 'अर्धा स्वर कमी झाला म्हणजे पुत्रोत्सवासारखा आनंद. 'म्हणजे होतां होईल तितकीं सूत्रें लहान करणें. त्यांतच ग्रंथकर्त्यानें आपली अल्प बुध्दि खर्च केली आहे. बाकी उपयुक्ततेच्या मानानें व्याकरण फारच कमी दर्जाचें ठरतें.
१.आघात (ॲक्सेंट) च्या नियमांपैकीं उदात्त, अनुदात्त आणि स्वरित यांचे सर्वसाधारण नियम मात्र ठेविले आहेत.बाकी सर्व गाळले आहेत.
२.सूत्रांत होतां होईल तों लहान शब्द वापरले आहेत. उदाहरणार्थ - विभाषा (वा), औपम्य (इव), परस्मिन् (परे) - वगैरे.
३. नवीन अगदी आखूड पारिभाषिक शब्द तयार केले आहेत. उदाहरणार्थ- ऱ्हस्व(प्र), दीर्घ(दी), प (प्लुत). स(समाप्त), त(निष्टा), वाच्(उपपद) वगैरे.
४.प्रत्येक विभक्तींचे नांव 'विभक्ती' या शब्दांतील प्रत्येक व्यंजनास 'आ' व स्वरास 'प्' लावून केलें आहे जसें वा (प्रथमा), इप्(द्वितीया), भा(तृतीया) अप्(चतुर्थी), का (पंचमी), ता(षष्ठी), इप्(सप्तमी). आणि शेवटी संबुध्दीला 'की' असें नांव आहे.
५.स्पर्धे परम् [किंवा, विप्रतिषेधे परं कार्यम् (पाणिनी)] या नियमांचे कार्य दाखविण्यास नवीन युक्ति योजिली आहे. जेथें दोघांचा विरोध येईल तेथें नपुसकलिंगी पारिभाषिक शब्दाच काय गौण म्हणून सोडून द्यावयाचें. जसें-रू:(गुरू) याचा जोर घि(लघु पेक्षां) जास्त, व द:(आत्मनेपद) याचा जोर मम् (परस्मैपद) पेक्षां जास्त समजावयाचा.
६.एकाच नामावरून त्याच जातीचीं सगळीं स्वाभाविकच समजलीं जातात. (स्वाभाविकत्वादभिधानस्यैकशेषानारम्भ:). सबब एकशेष प्रकरण सबंध गाळलें आहे. म्हणून यास 'अनेकशेष व्याकरण' म्हटले आहे.
७.पाणिनीनें 'विभाषा' दाखविण्याकरितांच निरनिराळया आचार्यांची नांवें दिलीं आहेत.
बोपदेवाच्या धातुपाठांतील उल्लेखावरून पहिल्यानें 'जैनेंद्र' हें बोपदेवानें काल्पनिक नांव बनविलें असावें, कारण शब्दार्णवचन्द्रिकेच्या हस्तलेखी प्रतीवरून या व्याकरणाचा कर्ता 'पूज्यपाद' असावा असें बहुतेक खात्रीलायक दिसतें. आणि हा 'पूज्यपाद महावीर'या नावांनें ओळखिला जात होता.
तो जेव्हां आठ वर्षांचा झाला तेंव्हा आईबापांनीं त्याला गुरूगृहीं पाठविला. त्याच वेळीं इन्द्राचें सिंहासन हालल्यामुळें त्याला मृत्यूलोकीं काय चाललें आहे हें समजून तो खालीं आला आणि त्या मुलास प्रश्न करूं लागला. त्यांने गुरूस न येणाऱ्या अशा व्याकरणांतील प्रश्नांचीं उत्तरें दिलीं; आणि बरेच नवीन नियम स्वत:तयार केले. हेंच तें 'जैनेन्द्र व्याकरण' अशी याबद्दल दंतकथा आहे. जैन लोकांची नेहमींचीच चाल आपले अनेक ग्रंथ 'जिनेन्द्र महावीर'या नावावर प्रसिद्ध करण्याची असल्यामुळें दुसरा कोणी 'मर्त्य' याचा 'कर्ता' आहे काय असें पहावें लागतें. तसें पाहूं गेल्यास तो देवनन्दी असावा याबद्दल बरेच पुरावे सांपडतात. त्यांतील एक असा की, ग्रंथकर्त्यानें आपलें नांव पहिल्याच श्लोकांत सूचित केलें आहे तो श्लोक-
लक्ष्मीरात्यन्तिकी यस्य निरवद्यावभासते ।
देवनन्दितपूजेशे नमस्तस्मै स्वयंभुवे ॥
आतां प्रो.पाठकांच्या लेखाकडे वळूं.