प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.         

चांद्रसंप्रदाय- चंद्रगोमिनचा काल- कालानुक्रमाच्या द्दष्टीनें पाणिनीय संप्रदायाच्या पुढचा जो चांद्र संप्रदाय त्याजकडे आतां आपण वळूं.चांद्र संप्रदायासंबंधाचा सर्वांत जुना उल्लेख भर्तृहरीच्या वाक्यपदीयांत सांपडतो. सर्वांत अलीकडचा उल्लेख म्हणजे मल्लिनाथानें मेघदूतांतील' नीचेराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो:' या श्लोकावरील टीकेंत केलेला होय. परंतु, चांद्र व्याकरणाची मूळ प्रत मल्लिनाथाच्या हातीं लागली होती असें दिसत नाहीं. डॉ.बुह्लर यानें काश्मीरहून १८७५ त आणलेली एक अर्धवट प्रत व नेपाळ मधून हरप्रसादशास्त्री यांनीं आणलेली नेपाळी भाषेंत इ.स. १३५६ त लिहिलेली एक पूर्ण प्रत या दोहोंखेरीज या ग्रंथाच्या प्रती सरकारच्या प्रयत्नानें सुद्धां सांपडल्या नाहींत. डॉ.ब्रुनो लिबिश यानें मात्र परिश्रम करून चांद्र व्याकरणाची पीठिका बसविली असून १९०२ सालीं त्यानें लाइपझिग येथें एक चांद्र व्याकरणहि प्रसिद्ध केलें आहे. काशिका वृत्तीमध्यें, ज्याला पाणिनीशीं किंवा कात्यायनाशीं समानार्थक सूत्रें नाहींत अशीं चांद्र व्याकरणांतील सूत्रें, कर्त्याचा उल्लेख न करतां दिलेलीं आहेत म्हणून वर सांगितलेंच आहे. त्यावरून चंद्राच्या कालाची एक सीमा इ.स. ६५० ही ठरते. दुसऱ्या बाजूस, चांद्र सूत्रांवरील एका वृत्तींत वक्तृसमकालीन भूतकाळाचें उदाहरण म्हणून 'अजयद्गुप्तो (?मूळांत जतों किंवा जप्तो आहे) हूणान् 'असें वाक्य घेतलें आहे त्यावरून इ.स. ४६५ किंवा ५४४ ही सीमा येते. यांपैकीं पहिलीच जास्त संभवनीय आहे. म्हणजे इ.स. ४७० हा स्थूल मानानें चंद्राचा काल आहे असें म्हणावयास हरकत नाहीं.