प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.          

जैनेंद्र व्याकरणाचे स्वरूप- जैनेंद्र व्याकरणांत स्वयंप्रकाशित बुध्दिमत्तेची झांक कोठेंच नाहीं.त्याचें व्याकरण म्हणजे पाणिनीचीं सूत्रें व र्वात्तिकें यांचा संक्षिप्त संग्रह होय. संक्षेप करण्यांत मात्र यांनें आपली पराकाष्ठा केली आहे. 'विभाषा' बद्दल 'वा' किंवा 'मनुष्य' बद्दल 'नृ' घालणें असे संक्षिप्तीकरणाचे प्रसंग सुद्धां त्यानें वायां जाऊं दिले नाहींत. त्यानें याच गोष्टीच्या भरीं पडून 'प्रत्यय' बद्दल 'त्य' 'कर्मधारय' याच्याबद्दल 'य' 'परस्मैपद' याच्याबद्दल 'म' 'आर्धधातुका' बद्दल 'अग' असे नवीन पारिभाषिक शब्द उपयोगांत आणिले आहेत. त्यामुळें त्याच्या व्याकरणाचा अभ्यास करण्याचें काम कल्पनेबाहेर प्रयासाचें होऊन बसलें आहे. दिगंबर संप्रदायाच्या लोकांच्या वहिवाटीप्रमाणें देवनंदी उर्फ पूज्यपाद यानेंहि उध्दृत केलेल्या मजकुराच्या ग्रंथांचें अगर ग्रंथकारांचें नांव कोठेंहि दिलेलें नाहीं. त्याच्या सर्व सूत्रांत सहा नांवांचा उल्लेख आहे. परंतु हीं सर्व नांवें कल्पना सृष्टितील आहेत असें कीलहॉर्नप्रभृति विद्वानांचें मत आहे. आधारावाचूंन उगीच नांवांचा उल्लेख करणें हा प्रकार या संप्रदायांतच आढळतो असें नाहीं. याबद्दल आजच कांहीं निश्चित लिहितां येत नाहीं ही दुर्देवाची गोष्ट आहे.