प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.     

पतंजलीचें महाभाष्य व त्याचा काळ- कात्यायनानंतरचा मोठा वैयाकरण म्हणजे पतंजलि. याचा काल ख्रि.पू. १५० हा असावा. याला मुख्य प्रमाणें अशी- (१) 'इह पुष्पमित्रं याजयाम:' हें वाक्य पतंजलीनें अशा कांहीं संदर्भानुसार घेतलें आहे कीं, तो प्रसंग पतंजलीच्या हयातींतच घडला असला पाहिजे. (२) 'अरूणवद्यवन:साकेतम् 'व' अरूणद्यवनो मध्यमिकाम्' यांत. मीनांडरनें दिलेल्या वेढयाचा उल्लेख आहे. (३) यांशिवाय मौर्यांच्या संबंधाचा एक उल्लेख यांत आहे. पंतजलि पुष्पमित्राशीं समकालीन होता. महाभाष्यांत आलेलीं गोनर्दीय व गोणिकापुत्र हीं नांवें पतंजलीचींच खुद्द पर्यायनांवें आहेत असें मानण्याचा प्रघात आहे. परंतु राजेंद्रलाल मित्र [ज.ए.सो.बंगाल; पु. ८, पृ. २६९] व डॉ.कीलहॉर्न [इंडियन ऍंटिक्करि पु. १४, पृ. ४० ] यांनीं हे निराळे ग्रंथकार आहेत असें मानलें आहे; व वात्स्यायनानें आपल्या कामसूत्रग्रंथांत या ग्रंथकारांचा उल्लेख केलेला आहे. पतंजलीच्या काळाच्या संबंधाची हकीकत महाभाष्यांतच सांपडण्यासारखी आहे.

महाभाष्यांत कात्यायनावर टीका आहे. पाणिनीच्या सूत्रांवर कात्यांयनानें केलेलीं टीका जेथें जेथें पतंजलीस अयोग्य वाटली तेथें तेथें त्यानें पाणिनीला उचलून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्या उचलून धरण्याचा प्रयत्नांत पतंजलित सुद्धां कात्यायनावर निष्कारण घसरला आहे. तरीपण एकंदरीनें पतंजलिला आपल्या कार्यांत बरीच यश:प्राप्ती झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. कात्यायनाने केलेलें कार्यच पुन:एकदा करून म्हणजे त्यानें केलेल्या परीक्षणाचेंच पुन: परीक्षण करून शिवाय पतंजलिनें त्याला स्वत:ला टीकार्ह वाटणाऱ्या पाणिनीच्या मूळ सूत्रांवरहि टीका लिहीलेली आहे.