प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.      

पाणिनी संप्रदायाच्या दुसऱ्या कालखंडाचा अखेरचा ग्रंथ,-कैयटाचा प्रदीप.- पतंजलीच्या महाभाष्याबरोबर जसा पाणिनी संप्रदायांतील एक भाग संपतो.तसा कैयटाच्या प्रदीपाबरोबर पाणिनीय संप्रदायाच्या इतिहासाचा दुसरा भाग पूर्ण होतो. कैयट आणि भर्तृहरि यांच्या मधल्या काळांत महत्वाचे असे वैयाकरण नाहींत. इसवी सनाचें सातवें शतक हा भर्तृहरीचा व आजमासें ११ वें शतक हा कैयटाचा काळ आहे. या मधल्या काळांत अणि पाणिनी संप्रदायाखेरीज इतर व्याकरणसंप्रदायांची वाढ झाली, पाणिनी संप्रदायाची झाली नाहीं.
 
कैयाटाच्या नांवावरून तो काश्मीरचा रहाणारा असावासें वाटतें. काव्यप्रकाशावरील एक टीकाकार भीमसेन (इ.स.१७२२)यानें कैयटाचा व मम्मटाचा सम्बंध जोडला आहे व कैयट मम्मटाचा शिष्य होता असेंहि तो म्हणतो. पण याकडे लक्ष्य देण्यांत विशेष अर्थ नाहीं. कैयटाचा काळ जास्तींत जास्त इ.स. १३०० च्या अलीकडे ओढतां येत नाही असें सर्वदर्शनसंग्रहांत त्याचा जो उल्लेख आहे त्यावरून स्पष्ट होतें. कैयटानें भर्तृहरीच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण चाललों आहो असें स्वत:च म्हटलें आहे; तेव्हां त्याच्या कामगिरीबद्दल विशेष लिहीण्याचें हें स्थळ नव्हे.