प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
पूज्यपाद व जैनेंद्र व्याकरण या ग्रंथांचें कर्तृत्व- डॉ.किलहॉर्न साहेबांच्या मतें, जैनेंद्र या संस्कृत व्याकरणाचा कर्ता जैन तीर्थकरांपैकी शेवटील जो महावीर तो होता. व 'पूज्यपाद' हें त्याचेंच सन्मानदर्शक नाव आहे. (अँ.पु. १० पा. ७५-७९ पहा). पण रा.पाठक यांनीं असें सिध्द् केलें आहे कीं,(१) पूज्यपाद या नावांचा एक खरोखरीचा ग्रंथकार होऊन गेला; (२)त्यानें 'जैनेंद्र' हें संस्कृत व्याकरण लिहिलें. (३) या पूज्यपादाचें 'देवनंदी' असें दुसरें नांव होते; (४) याचा शक ६५१होता; (५) बारा शतकें होऊन गेली तरी याचे पुष्कळ ग्रथ दक्षिण हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहेत.
(१)पूज्यपाद हा खरोखरीचा एक ग्रंथकार होऊन गेला हें दाखविण्याकरितां आधार, कर्नाटकांतील अर्थदास, इंद्रभूति व नागचंद्र या जैन कवींच्या काव्यांतील 'प्रशस्ति' यांचा आहे.
(२)पूज्यपादानें 'जैनेंद्र' लिहिलें या विधानास आधार मितगति याच्या धर्मपरीक्षा या ग्रंथाचें वृत्तविलास यानें कानडींत केलेलें भाषांतर यांतील 'प्रशस्ति'चा आहे. सोमदेवहि तेंच म्हणतो. पट्टावलीवरूनहि हेंच शाबित होतें.
(३)पट्टावलीवरून त्याचें नांव देवनंदी होतें हें सिद्ध होतें.
(४)मेघनंदीचा श्रावकाचार व समाधिशतक या ग्रंथावरील मेघचंद्राची टीका यांवरून या पूज्यपादाचा काल शक ६५१ हा होता असें सिद्ध होतें (इं. अँ. पु. १२ पा. १९२१ ).
या दोन लेखांत येऊन गेलेला मजकूर देऊन डॉ.बेलवलकर देवनंदीच्या ग्रंथकर्तृत्वाबद्दल आतां शंका रहात नाहीं असा अभिप्राय व्यक्त करतात.या देवनंदीला पूज्यपाद या दुसऱ्या नांवानंहि ओळखतात. डॉ.कीलहॉर्न यांच्या मतें पूज्यपाद हें टोपण नांव असावें. शेवटल्या तींर्थकराच्या नांवावर ग्रंथ विकला जावा एवढयासाठीं कोणीतरी मागील लेखकानें हें नांव घेतले असावें असें ते म्हणतात. परंतु, प्रोफेसर पाठक यांनी हा सूत्रकर्ता देवनंदी व पूज्यपाद हे दोघे एकच असें आतां निश्चयानें सिद्ध केलें आहे.