प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             

सारस्वत प्रक्रियेखेरीज स्वतंत्र ग्रंथ- अशा ग्रंथांत रामचंद्राश्रम नांवाच्या टीकाकारानें लिहिलेल्या सिध्दान्तचंद्रिकाग्रंथांचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे. यावर अनेक उपटीका झालेल्या आहेत. सदानंदाची सुबोधिनी आणि क्षेमंकराचा मुलगा व रामकराचा नातू लोकेशकर याची तत्वदीपिका, ह्या सिद्धांतचंद्रिका ग्रंथाच्या दोन टीका आहेत.

सारस्वतव्याकरणावरचा प्रक्रियेखेरीज आणखी स्वतंत्र ग्रंथ म्हणजे तर्कतिलकभट्टाचार्य याचा होय. यानें आपला ग्रंथ जहांगीरच्या राज्यांत इ.स. १३१४ सालीं लिहिला.

जिनेंद्रु किंवा जिनरत्न याचा सिद्धांतरत्न हा या शाखेचा चवथा स्वतंत्र ग्रंथ आहे.
 
या संप्रदायाचा आणखी एकच ग्रंथ राहिला. भट्टोजी दीक्षिताचा शिष्य रघुनाथ यानें लिहिलेला लघुभाष्य हा तो ग्रंथ होय. यांत पतंजलीच्या भाष्याच्या धर्तीवर व्याकरण विषयाची रचना करण्याचा यत्न केलेला आहे. हा सुमारे १७ व्या शतकांतला असावा.