प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
मीमांसा-तिचें प्रयोजन व उत्पत्ति- आतां मीमासां शास्त्राकडे वळूं. मीमांसेने काय केलें, तिची उत्पत्ति कशी झाली, याविषयीं थोडेसें विवेचन प्रथम देतों. म्हणजे तिचें भाषाशास्त्रीशीं कसें नातें आहे हें स्पष्ट होईल.
यज्ञ चालू असतां मध्यें कांही संशय किंवा तंटा उत्पन्न झाला, म्हणजे तो तोडण्यास उपाय म्हणजे शिष्टांनां विचारणें. शिष्टांनीं निर्णय द्यावयाचा, म्हणजे पूर्वीची रीत किंवा वाक्य पाहून किंवा कांहीं तरी युक्ति काढून निर्णय द्यावयाचा. युक्ति किंवा पाठीमागची रीत अगर वाक्य पाहून जे निर्णय करीत तेच पहिले मीमांसक. त्यांस ब्रह्मवादी देखील म्हणत. जसजसें वेदाक्षर स्थित होऊं लागलें तसतसें युक्तिचें प्रयोजन कमी होऊन शब्दांपासून शुद्ध अर्थ काढण्याकडेसच प्रवृत्ति होऊं लागली. या तऱ्हेचे प्रयत्न पुष्कळसे वेदांतच द्दष्टिस पडतात. मीमांसाकारांनीं विधिवाक्यें काढावयाचीं, त्यांचा अर्थ लावावयाचा आणि निर्णय द्यावयाचा, हें त्यांचे कार्य असे. मीमांसेचा धर्माशीं संबंध वेबस्टरच्या कोशाचा हिंदुस्थानच्या कायद्याशीं असलेल्या संबंधापेक्षां अधिक नाहीं. वास्तविक पहातां तो त्याहूनहि कमी आहे. मीमांसेचा उपयोग वेदवाक्याचा अर्थ लावण्यासाठी. वेदवाक्याचा म्हणजे ब्राह्मण वाथ्यांचाच अर्थ विशेषत: मीमासेंत लावलेला आढळतो. ऋग्वेदाचा अर्थ लावण्याच्या कामीं मीमांसेचा उपयोग नाहीं. अर्थ लावण्याचा हेतु यज्ञांतील क्रिया कशी करावी. यासंबंधीं बोध देणें हा होय. लग्न कोणाशीं कसें लावावें; आणि सावकारानें व्याज किती आकारावें यासंबंधी निर्णय करण्यास लागणारीं वाक्यें वेदांतील विधिवाक्यांत संगृहीत नाहींत. आणि तो त्यांचा विषय नव्हे. मीमांसा हें कायद्याचें शास्त्र मुळींच नाहीं. तर्कशास्त्राचे इंग्रज लोक इंडक्टिव्ह म्हणजे प्रत्यक्षसंकलनमूलक तर्कशास्त्र आणि डिडक्टिव्ह म्हणजे आप्तवाक्यमूलक तर्कशास्त्र असे दोन भाग करतात. एका सिद्धांतावरून दुसरे सिद्धांत काढले म्हणजे वाक्यमूलक तर्कशास्त्र झालें. मीमांसेविषयी असेंहि म्हणतां येईल कीं, वाक्यमूलक तर्कशास्त्राची अत्यंत परिणतावस्था भारतीयांचें मीमांसाशास्त्र दाखवतें. मीमांसेवर ग्रंथ थोडे आहेत. मूळ जैमिनीची सूत्रें आणि त्यावरील कुमारीलाचें भाष्य त्यांवरून मुख्यत: आजचा अभ्यास होतो. मीमांसेचें स्वरूप लक्षांत येण्यासाठीं तदंतर्गत विषयांचें थोडेसें विवेचन येथें देतों.
या शास्त्रास भगवान् जैमिनीनें 'अथातो धर्मजिज्ञासा' या सूत्रापासून सुरूवात केली असून 'अथ' या शब्दाचा अर्थ वेदाध्ययनानंतर असा करण्यांत येतो. 'अत:' या पदानें अर्थज्ञानरूप वेदाध्ययनाचें द्दष्ट फल आहे असें सांगितलें जातें. म्हणून धर्माची म्हणजे वेदार्थाची जिज्ञासा म्हणजे विचार करावा असा स्पष्ट अर्थ होतो. एका वाक्यांत या सूत्राचा असा अर्थ देतां येईल.
'वेदाध्ययनानंतर अर्थज्ञानाकरितां वेदार्थाचा-धर्माचा विचार करावा. 'जिज्ञासा' या पदाची 'विचार' या अर्थी लक्षणा करावी लागते.
एकंदरीत हें धर्मविचारशास्त्र आरंभावें असें या सूत्रानें सांगितले आहे.
'धर्म' म्हणजे काय याचा विचार दुसऱ्याच सूत्रांत जैमिनीनें केला आहे. तें सूत्र खालीलप्रमाणें आहे.
चेदनालक्षणोऽर्थोधर्म:।
याचा थोडक्यांत अर्थ (वेदानें प्रयोजनाला उद्देशून) 'विधीमान जो अर्थ त्याला धर्म' म्हणावयाचें असा आहे.
याचें उदाहरण 'यजेत स्वर्गकाम: 'स्वर्गेच्छु माणसानें यज्ञ करावा' असा आहे.
'चोदना' फक्त वेदाचीच घ्यावयाची.
'वेद' म्हणजे अपौरूषेय वाक्य. वेद हे पुरूषनिर्मित नाहींत. कारण,
वेदस्याध्ययनं सर्वे गुर्वध्ययनपूर्वकम्।
वेदाध्ययनसामान्यादधुनाध्यनं यथा॥
या अनुमानपद्धतीनें वेदांचें अपौरूषेयत्व सिद्ध होतें.
'य: कल्प: स: कल्पपूर्व:' यावरून जग अनादि आणि ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळें पूर्वकल्पीय वेद ईश्वर या कल्पांत पुन: उपदेशितो. यावरून वेद पौरूषेय नाहींत असें होतें.
काठक, कौथुम, तैत्तिरीयक वगैरे नांवें संप्रदायप्रवर्तकांचीं आहेत; वेदकर्त्यांचीं नव्हेत.
भारतादिकांचा कर्ता ज्याप्रमाणें उपलब्ध होतो त्याप्रमाणें वेदाचा कर्ता उपलब्ध होत नाहीं.म्हणून वेदांनां पौरूषेय म्हणतां येत नाहीं.
अपौरूषेय वेदांत प्राणिमात्राला स्वाभाविक असणारे दोष शक्य नसल्यामुळें वेद हे धर्मविषयक प्रमाण आहेत.
वेदांचे पांच प्रकार आहेत.
(१) विधि (२) मन्त्र (३) नामधेय (४) निषेध (५) अर्थवाद.