प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
सौपद्मशाखा.– हिचा प्रवर्तक पद्मनाभदत्त नांवाचा एक माणूस होता. हा पद्मनाभदत्त व या शाखेसाठी म्हणून ज्यानें पुढे पृषोदरादिवृत्ति नांवाचा ग्रंथ लिहिला तो पद्मनाभदत्त हे एक नव्हत. हा दुसरा पद्मनाभदत्त इ.स. १३७५ च्या सुमारास होऊन गेला असे दिसते. कारण, त्याची पृषोदरादिवृत्ति हि याच सालांत लिहिलेली आहे, असें तो स्वत:च म्हणतो. हें खरें असेल तर हा उज्ज्वलदत्ताच्या कांहीसा नंतर उदयास आला असें म्हटलें पाहिजे. कारण यानें उज्ज्वलदत्ताच्या ग्रंथाचा आधारभूत ग्रंथ या नात्याने आपल्या भूरिप्रयोग कोशांत उल्लेख केलेला आहे; व या कालनिर्णयाचा आज निश्चित मानल्या जाणाऱ्या कोणत्याहि गोष्टीशीं विरोध येत नाही.