प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
हेमचंद्राचें शब्दानुशासन- ह्या ग्रंथाचें पूर्ण नांव 'सिद्धहेमचंद्राभिधस्वोपज्ञशब्दानुशासन' असें आहे.पाणिनीच्या आष्टाध्यायीप्रमाणें याचेहि आठ अध्याय असून प्रत्येक अध्यायांत चार पद आहेत.यांतील सुत्रसंख्या अजमासें ४५०० आहे. त्यांपैकी, जवळ जवळ चतुर्थोश सूत्रें शेवटच्या अध्यांयातच असून या अध्यांयात प्राकृत भाषेच्या व्याकरणाचाच उहापोह आहे. नवीन व्याकरण लिहिण्यांत हेमचंद्राचा उद्देश पूर्वीच्या व्याकरणकारांनीं जें काय सांगितलें होतें तेवढें सर्व थोडक्यांत सांगणें एवढाच नसून व्याकरणासंबंधानें जें जें सांगतां येण्यासारखें होतें तेवढया सगळयाचा मोजक्या शब्दांत एका ग्रंथांत समावेश करावयाचा होता. इतर ग्रंथांतून शक्य तितकी माहिती घ्यावी लागली असली पाहिजे हें उघड आहे. तथापि शाकटायनांतील माहिती घेतांना तर त्याच्या परोपजीवीपणाचा अगदी कळसच झाला आहे.