प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
हेमचंद्राच्या व्याकरणसंप्रदायाचा प्रसार- हेमचंद्राच्या ग्रंथकर्तृत्वाचा व त्याच्या संप्रदायाचा व्याप येणें प्रमाणें मोठा होता खरा,परंतु त्याचा संप्रदाय फार दिवस प्रचारांत राहिला नाही. १५ व्या शतकांत टीकाकारांची एकदां लाट येऊन गेल्यानंतर हा संप्रदाय मागें पडत चालला. स्वतंत्र बुध्दीचा अभाव हें तर याचें कारण खरेंच, पण हा विशिष्ट धर्मपंथी असल्यानें लवकर बुडाला अस म्हटल्यास तें सत्यास अधिक अनुसरून होईल.
यानंतर आपण केवळ व्याकरणाचा विचार करणाऱ्या ज्या व्याकरणाच्या शाखा आहेत तिकडे वळूं. आतांपर्यतच्या शाखा संप्रदायविशिष्ट होत्या. परंतु यापुढें ज्या शास्त्रांचें वर्णन येणार आहे त्यांची गोष्ट तशी नाहीं.त्यांचे ग्रंथ कोणत्याहि विशिष्ट संप्रदायाचे म्हणून लिहिलेले नाहींत. या शाखा म्हणजे ज्यांनां कातंत्र व सारस्वत म्हणून म्हणतात त्या होत.