प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ७ वें.
देश्य चळवळ व परराष्ट्रीय राजकारण.

महाराष्ट्रीयांचें राजकारण.- सर्वांत मोठा भावनांशीं संबद्ध असा विषय म्हणजे स्वातंत्र्य हा होय. लोकांच्या भावना एकत्र करण्यास साहाय्यक अशा ज्या चळवळी त्या राष्ट्रीय चळवळी होत. अशा चळवळींपैकीं राजकारणविषयक चळवळींकडे महाराष्ट्रीयांचें लक्ष बरेंचसें आहे असा निदान लौकिक तरी आहे. वस्तुस्थिति निराळी दिसते. सध्यांच्या परिस्थितीमध्यें एखादी गोष्ट साध्य कशी करून घ्यावी या प्रकारची तालीम महाराष्ट्रीय सुशिक्षितांस त्यांच्या राजकीय चळवळींच्या गुरूंनीं कितपत दिली आहे हें बर्‍याच सूक्ष्म अवलोकनाशिवाय समजावयाचें नाहीं. परंतु सामान्य अनुभव असा दिसतो कीं वैयक्तिक किंवा सामाजिक हिताची प्राप्ति करून घ्यावायाची झाल्यास त्या कामांत नांगर्‍ये व कारकून या दोहोंनीं भरलेल्या महाराष्ट्रीयांपेक्षां गुजराथी व बंगाली लोक अधिक यशस्वी होतात. महाराष्ट्रीयांची राजकीय प्रगति झाली असेल तर ती हीच कीं आपल्या ऐतिहासिक अस्तित्वाची जाणीव महाराष्ट्रीयांस आहे आणि पारतंत्र्याची चीड किंवा निदान इंग्रजांचा द्वेष हा महाराष्ट्रांत अधिक बद्धमूल झाला आहे. इंग्रजांचा अधिक द्वेष करण्याचें श्रेय ब्राह्मणास देणारें विधान दुसरा आपणाकडे कसें पाहतो तसें आपण आपल्याकडे पाहिलें पाहिजे या तत्वानुसार इंग्रज लेखकांच्या आधारावरून आम्ही करीत आहों.

महाराष्ट्रानें ५७ सालानंतर राजकारणामध्यें जें कार्य केलें तें हें कीं स्वतःच्या उन्नतीला आणि उन्नत्त्यर्थ प्रयत्‍नाला अवश्य असणारा जो स्वाभिमान तो त्यानें परकीय सत्तेखालीं असून देखील जागृत ठेवला. हा अभिमान जागृत ठेवण्यासाठीं वर्तमानपत्रें, काव्यें, नाटकें व कादंबर्‍या या सर्व प्रकारचें वाङ्मय खर्चीं पडलें. महाराष्ट्राचा इतिहास विशेषेंकरून शिवाजीचें चरित्र सर्व लोकांमध्यें  उच्च प्रकारचें आत्मबल उत्पन्न करण्यास कामीं आलें. विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून ज्या जोरदार लेखण्या महाराष्ट्रांत दिसूं लागल्या, त्या लेखण्यांनीं केलेल्या विधानांची योगत्या कदाचित् फार थोर प्रतीची नसेल, पण सर्व राष्ट्रामध्यें आपण उपेक्षा करण्यासारखे लोक नाहीं. अशी भावना जागृत करण्यास व ठेवण्यास अवश्य असणारें वाङ्मय त्या लेखण्यांनीं निर्माण केलें यांत शंका नाहीं.

सत्तावन सालानंतर इंग्रजांचें राज्य उलथून पाडावें या तर्‍हेचे विचार नष्ट झाले नव्हते. हे विचार ज्यांच्या मनांत वागत होते ते लोक अज्ञानी होते हें खरें, तथापि त्यांचे विचार म्हणजे केवळ एकलकोंड्या तर्‍हेवाईक लोकांचे विचार असें म्हणतां येत नाहीं. दहा विचार करणारांमधून एखादा कर्ता निर्माण होतो या न्यायानें वासुदेव बळवंत फडक्यांसारखेच विचार असलेल्या अनेक लोकांमधून एक कर्ता वासुदेव बळवंत फडके निघाला असें म्हणता येईल. काँग्रेस जी निर्माण झाली ती निर्माण करण्याच्या योजनेस, त्या वेळीं कांहीं तरी गुप्त खटपटी देशांत चालू होत्या त्यांपासून प्रेरणा मिळाली असें ह्यूमचा चरित्रकार म्हणतो.

लोकमतास जागृत करून त्याचा शासनतंत्रावर परिणाम घडवून आणण्याची पद्धति काँग्रेसच्या पूर्वीं महाराष्ट्रांत नव्हती असें नाहीं. १८५२ सालापासून अनेक संस्थांचीं राजकीय विषयांवरचीं पुस्तकें मराठींत प्रसिद्ध झालेलीं दिसतात. (महाराष्ट्रीय वाङ्मयसूची ऐझुर पृ. १३२ पहा). याच्या अगोदर देखील सार्वजनिक चळवळींचें अस्तित्व मुंबई शहरांत दिसून येतें. सदरील पुस्तकें मुंबई, पुणें, कर्‍हाड, सातारा, नाशिक इत्यादि ठिकाणीं लोकमतास एकीकृत करून त्यांचा परिणाम शासनतंत्रावर करण्याची प्रवृत्ति दाखवितात. इ. स. १८५० पासून आज १९२० पर्यंत म्हणजे ७० वर्षांत जी राजकीय भावनांत प्रगति झाली ती ही कीं, युद्ध करून स्वातंत्र्य मिळविण्याची कल्पना जवळजवळ नष्ट झाली व लोकमतास जागृत करावें आणि समाजांत प्रत्येकाच्या आर्थिक कार्यानें म्हणजे वर्णव्यवस्थेनें जो अन्योन्याश्रय उत्पन्न होतो त्या अन्योन्याश्रयामुळें समाजांत येणार्‍या समतोलपणाचा आणि सुसंघटित स्थितीचा बिघाड होण्याची शक्यता ओळखून लोकसंग्रहास अथवा लोकघटनेस अधिक व्यवस्थित स्वरूप द्यावें या कल्पनांचा फैलाव जोरानें झाला. राज्यक्रांति करण्याची कल्पना अगदींच नष्ट झाली नाहीं हें पंजाबांत युद्धकालीं झालेल्या चळवळींवरून दिसून येईल.