प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

वैद्यक

  रोग व आरोग्य ( ऋग्वेद )

अज्ञात यक्ष्मन् -- ऋग्वेद, अथर्ववेद आणि काठक संहिता यामध्यें याला 'अज्ञात रोग' असें म्हटलें आहें. राजयक्ष्माचें वर्णन करतांना याचा उल्लेख आहें. ग्रोमनचें असें मत आहे की, एकाच आजाराचें हें दोन प्रकार आहेत, एक अतिवृद्धि आणि दुसरा एकांग क्षय. ऋग्वेदांत जो मंत्र आहे तो दोन्ही प्रकारच्या रोगांनां दूर करण्याकरितां उपयोगी पडतो. अथर्ववेदांतील बलास याचें या रोगाशीं साम्य आहे असें ग्रोमन दर्शवितो. झिमर म्हणतो की, हें अनुमान बरोबर नाहीं. ज्याचें पुढें क्षयांत रूपांतर होतें. असा जीर्णज्वर म्हणजे हा रोग असावा.
(अ) शिपद -- अशिपद या नकारार्थी रूपांत हा शब्द ऋग्वेदांत अशिमिद शब्दाबरोबर आलेला आहें. शिपद व शिमिद हें दोन्ही शब्द एखाद्या अज्ञात रोगांची नांवे असावीत.
(अ) शिमिद -- ऋग्वेदांत अशिमिद या समासांत हा आलेला असून त्याचा अर्थ रोग असा असावा. अथर्ववेद व शतपथ ब्राह्मण यांमध्यें शिमिदा हें स्त्रीलिंग रूप आलें असून त्याचा अर्थ एका राक्षशिणीचें नांव असा आहें.
ग्राहि -- ऋग्वेद व अथर्ववेद यांत ही एक व्याधींची निशाचरी आहें. निद्रा ( स्वप्न ) हा तिचा मुलगा होय.
जीवगृभ -- ( जिवंतपणीं धरणारा ). रॉथच्या मतें हा शब्द प्रजेच्या जीविताचें रक्षण करणारा या अर्थानें ऋग्वेदांत आलेला आहें. परंतु हा अर्थ जरी ह्याच सूक्तांतील पुढील ऋचेंत आलेल्यां 'मध्यमशीं' ( मध्यस्थ ) शब्दावरून शक्य असला तरी हा अर्थ घेण्याची आवश्यकता नाहीं व तो संभाव्याहि नाहीं. ऋ. १०. ९७, ११ या ठिकाणीं जीवगृभ याचा जीवांना धरणारा, मारणारा असाच अर्थ होतो.
यक्ष्मन् -- सामान्यत: शरीराला कृश करणारा रोग या अर्थी हा शब्द ऋग्वेदांत आणि अथर्ववेदांत आलेला आहें. वाजसनेयि संहितेंत शंभर प्रकारच्या यक्ष्मांचा उल्लेख केला गेला आहे आणि काठकसंहितेंत अयक्ष्म म्हणजें रोगविरहित असा अर्थ दिलेला आहे. यजुर्वेदसंहितेंत यक्ष्माच्या उत्पत्तीविषयीं माहिती दिलेली आहें. यक्ष्म तीन प्रकारचे सांगितले आहेत:- राजयक्ष्म, पापयक्ष्म, आणि जायेन्य, दुस-या प्रकारचा यक्ष्म अप्रसिद्ध असून त्याचा अर्थ फक्त भयंकर रोग असा होतों. वैद्यकांत यक्ष्म या शब्दाचा अर्थ रोग असा आहें.
राजयक्ष्मन् -- राजरोग असा या शब्दाचा अर्थ असून ऋग्वेदांत आणि पुढें पुष्कळ ठिकाणीं याचा उल्लेख आलेला आहे. झिमरनें हा रोग म्हणजें क्षयच होय असें म्हटलें आहें. या रोगाचें जें पुढें निदान झालें आहें. त्यावरून हें मत बरोबर आहे असें दिसतें. याचा अर्थ उपदंश असा असावा असें ब्लूमफील्ड सुचवितो. परंतु हें संभवनीय दिसत नाहीं. वैद्यकांत या रोगास राजयक्ष्म असेंच म्हणतात. हा सर्व रोगांचा राजा आहे म्हणून त्यास राजयक्ष्मा हें नांव दिलें आहें.
वंदन -- एका रोगाचे नांव म्हणून हा शब्द ऋग्वेदांत आला आहे. सर्व शरीरांवर उठणारे फोड म्हणजे हा रोग असावा. ऋग्वेदांमध्यें आश्विनांच्या आश्रितांचेंहि हें नांव आहे. हा शब्द प्रचलित वैद्यकांत नाहीं.
सुराम -- अतिशय सुरापानानें उत्पन्न होणा-या रोगांचें हे नांव ऋग्वेदांमध्यें आलेलें आहें. नमुचीच्या कथेंत इंद्राला हा रोग झाला होता असें म्हटलें आहे. पुढील ग्रंथांत सुराम हें विशेषण सोमाला 'आनंददायक' अशा अर्थानें लावलेंलें आहें. हा विकार वैद्यकांत नाहीं.
१०हरिमन्. -- ऋग्वेद व अथर्ववेद यांमध्यें हा एक रोग आहे असें म्हटलें असून पिंवळेंपणा ( कावीळ ) असा त्याचा अर्थ आहे.
११हृद्रोग व हृद्योत -- 'काळजाचा विकार'. याचा उल्लेख ऋग्वेद व अथर्ववेद यांमध्यें अनुक्रमें आला आहें. झिमरच्या मतानें अथर्ववेदांमध्यें आलेला हा रोग व हृदयामद रोग हे दोन्ही एकच आहेत. ऋग्वेदांमध्यें हें संभवत नाहीं. पाश्चात्य वैद्यक ग्रंथांत याला अंजिना पेक्टोरिस असें नांव दिलें आहें. हृद्रोग म्हणजे हृदय विकृत झाल्यामुळें होणारा विकार. याचें वर्णन वैद्यकांत आलें आहें.
१२जायान्य, जायेन्य -- अथर्ववेद व तैत्तिरीय संहिता यांमध्यें उल्लेखिलेल्या  रोगांची जायान्य व जायेन्य ही नावें आहेत. अथर्ववेदांत एके ठिकाणी हरिमा ( कावीळ ) व गात्रांतील दु:खें ( अंगभेदो विसल्पक: ) यांच्याबरोबर या रोगाचा उल्लेख आलेला आहे. झिमरच्या मतें या वेदना म्हणजे त्या रोगांची लक्षणें होत व यक्ष्मा रोग ( फुप्फुसाचा रोग ) आणि हा रोग यांमध्यें बरेंच साम्य आहे. ब्लूमफील्डचें तर असें मत आहे की, हा रोग म्हणजें उपदंशच होय. कारण याचीं लक्षणें व कौषीतकी सूत्रामध्यें जो कर्मविधि दिलेला आहे त्यांत सांगितलेली लक्षणें हीं सारखीं जुळतात. रॉथच्या मतें हा रोग म्हणजे संधिविकार होय. हा अनिश्चित आहे असें व्हिटनें म्हणतो. जायान्य या नांवावरून व बरोबरच्या लक्षणांवरून वैद्यकशास्त्राच्या मतें या रोगाचें निश्चित नांव देतां येत नाहीं. अति स्त्रीगमन करण्यानें क्षय होण्याचा जास्त संभव आहें. तेव्हां कदाचित् हा क्षयरोग असूं शकेल. ब्लूमफील्डचें मत मात्र बरोबर नाहीं. कारण उपदंश हा रोग ( स्त्री पासून होणारा ) पूर्वी इकडील लोकांत नव्हतां व तो जुन्या वैद्यक ग्रंथांतहि नाहीं.      
१३दुष्कर्मन् -- त्वग्रोगानें पीडिलेला असा याचा अर्थ असून हा शब्द तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांमध्यें आलेला आहें. या शब्दानें बहुधा कुष्टरोगाचा बोध होत असावा. याच रोगाला दुसरें नेहमींचें नांव किलास असें आहें. किलास म्हणजें पांढरें किंवा तांबूस कोड. हा पापरोग आहे असें वाग्भटादि वैद्यक ग्रंथांतहि म्हटलें आहें.
१४वरूणगृहित -- 'वरूणानें पछाडलेला'. जलोदरानें पीडित झालेल्या माणसाचें वर्णन करतांना अनेक ठिकाणीं हा शब्द आलेला आहे. पापाबद्दल शिक्षा म्हणून हा रोग वरूणानें पाठविलेला आहे. वरूण ही पाण्याची देवता आहें व जलोदरांत पाणीच सांठतें. या संबंधावरून वरूणगृहीत हें नांव जलोदर या रोगाला सयुक्तिक दिसतें.
१५अक्षत अथवा अक्षित -- जायान्यासंबंधीं अथर्ववेदांत जें वचन आहे त्यांत अक्षित आणि सुक्षत या नांवाच्या जखमेवर उपाय सांगितला आहे. कौशिक सूत्रांत अक्षत आणि सुक्षत व सायणाप्रमाणें अक्षित आणि सुक्षित असें शब्द आहेत. ब्लूमफील्ड या शब्दाचें अर्थ 'कापण्यानें न झालेलें' आणि 'कापल्यामुळें झालेंलें' असें करतो. पहिल्यानें यानें 'हावर' अथवा 'गळूं' असा अर्थ केला. जायान्याचें हे दोन प्रकार आहेत असें व्हिटनें म्हणतो. सायणाप्रमाणेंच लुडविग अक्षित असा अर्थ करतो व 'पक्केंपणी न मुरलेंलें' असें त्याचें स्पष्टीकरण करतो. यामध्यें क्षय या रोगाचा अंतर्भाव होतो असें झिमरचें म्हणणें आहें. जायान्याचें हें जर प्रकार असतील तर व जायान्य म्हणजे क्षय असा अर्थ असेल तर अक्षत म्हणजे दोषसंचयानें झालेला क्षय व सुक्षत म्हणजें फुप्फुसाला जखम होऊन झालेला क्षय असा अर्थ योग्य होईल. क्षतक्षय म्हणून हल्लीं एक रोग मानीत असतात.
१६अपचित् -- अथर्ववेदांत पुष्कळ वेळां हा शब्द उपयोगांत आणलेला आहें. रॉथ, झिमर आणि दुसरे ग्रंथकार असें म्हणतात की, याचा अर्थ एक किडा असा असून त्याच्या दंशानें जागा सुजते. परंतु ब्लूमफील्ड म्हणतो की, हा शब्द एका रोगाचें नांव आहे व तो रोग म्हणजे गंडमाळा होय, असें केशव आणि सायण यांच्या भाष्यांवरून व उत्तरकालीन जो 'अपाचि' व्याधि आहे त्याशीं तुलना करून तो सिद्ध करून दाखवितो.
१७अप्वा -- 'कोठयासंबंधीं'. हा रोग बहुधा आमांश असावा, असें झिमर म्हणतो. कारण शत्रूंच्या सैन्याला त्रास व्हावा म्हणून याला आव्हान करीत असत. वेबर म्हणतो की, भीतींमुळें उत्पन्न होणारा हा हगवणीचा रोग असावा, आणि असें वर्णन महाभारतादि पुराणांत बहुत करून असतें. या मताला ब्लूमफील्ड व बहुधा यास्क यांचा दुजोरा आहें. अप् ( पाणी ) याचा अतिसार रोगाशीं संबंध आहे म्हणून याला अप्वा हें नांव दिलें असावें. वाईट किंवा पुष्कळ पाणी प्याल्यानें अतिसार होतो हें सर्वमान्य आहें.
१८अलजि -- अथर्ववेदांमध्यें हे एका व्याधींचें नांव आहें. नंतरचा 'अलजी' हा शब्द नेत्ररोगाचा द्योतक असून, नेत्रबाहयपटल आणि बाहुलीचा पडदा यांच्या सांध्यांतून पाणी वगैरे वाहणें असा त्याचा अर्थ आहें. वैद्यकांत या रोगांचें वर्णन आहे. नाकाच्या बाजूकडील डोळयाच्या कोप-यास जी सूज येते तीस अलजि असें म्हणतात.
१९आशरीक -- अथर्ववेदांत जंगिड झाडाचें महत्व ज्या सूक्तांत वर्णिलें आहे त्यांत हा एक व्याधि आहे असा उल्लेख आहे ताप येण्याच्या वेळी अंग दुखतें त्याला हा शब्द योजितात असें झिमरचें मत आहे. व्हिटनें सुचवितो की, हा शब्द फक्त विशेषणच आहे. याचा अर्थ काय आहे हें त्याला नीटसें समजलें नाहीं.
२०आस्त्राव -- हा एक रोग आहे असें अथर्ववेदांवरून दिसते; पण तो कोणत्या प्रकारचा असतों हें कळत नाहीं. एका ठिकाणी भाष्यकार याचा अर्थ मूत्रातिसार असा करतात; पण लानमनच्या मताप्रमाणें मधुमेह असा त्याचा अर्थ आहे. ब्लूमफील्ड म्हणतो की, हा रोग हगवण होय. पण ज्या अर्थी अरूस्स्त्राण हा उपाय सांगितला आहे त्या अर्थी 'जखमांतून पू वाहणें' हा तो रोग असला पाहिजे असें झिमरचें मत आहे. व्हिटनें फक्त 'पूं' असा अर्थ करतो व ब्लूमफील्डच्या मताविषयीं शंका प्रदर्शित करतो. त्याचा अर्थ 'आजार, सरदी' असा असावा असें लुडविग म्हणतो. प्रस्त्राव या शब्दाचा लघवी असा अर्थ असून, त्याशीं आस्त्राव हा शब्द बरेंच साम्य दाखवीत असल्यामुळें आस्त्राव म्हणजें लघवीचा रोग हा अर्थ बरोबर दिसतो. पण निश्चित असें मत मात्र कांहीं देतां येत नाहीं.
२१कांस, कास, कासा, कासिका -- ही चारहिं एकाच शब्दाचीं रूपें 'खोकला' या अर्थी अथर्ववेदांत आलीं आहेत. हा खोकला डोकें दुखण्याबरोबर येऊन, तो पुढें येणा-या तापाचें ( तक्मन् ) चिन्ह दाखवितो. हा स्वतंत्र असाहि रोग आहे. वैद्यकांत कास नांवानेच या रोगाचें वर्णन आहें.
२२किलास -- अथर्ववेद आणि वाजसनेयि संहिता यांमध्यें 'श्वेतकुष्ट,' या रोगाचें हें नांव आहे. पहिल्यानें तो रोग करडा ( पलित ) व नंतर पांढरे ठिपके या रूपानें शरीरावर दिसतो. हौग यानें ऐ. ब्राह्मणांतील अलस या शब्दाचा अर्थहि तोच केला आहे. परंतु हा अर्थ खात्रीलायक नाहीं. ऋग्वेदांतील एका उता-यांत किलासी या स्त्रीलिंग रूपाचा अर्थ मॅक्समुल्लरने 'ठिपके असलेली हरिणी' असा केला आहे. वैद्यकांत याचें वर्णन असून किलास या नांवानेच त्याचा उल्लेख आहें.
२३कीश्मिल -- हा अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेंत, बोथलिंगच्या म्हणण्याप्रमाणें एक व्याधिवाचक शब्द आहे. हा व्याधिवाचक शब्द वैद्यकांत नाहीं.
२४क्षत -- झिमर म्हणतो की, अथर्ववेदांतील हा मुख्य व्याधि होय; परंतु हा शब्द फक्त विशेषणच असावा असें वाटतें. शस्त्रानें अगर बाहय अपघातानें झालेली जखम असा याचा अर्थ आहें.
२५क्षत्रिय -- अथर्ववेदांत हा एक व्याधि आहे. याच्या उपशमासाठी तीन ऋचा लिहिल्या गेल्या आहेत. काठक संहिता आणि तैत्तिरीय ब्राह्मण यांतहि तो आला आहें. अथर्ववेदावरील टीकाकार म्हणतात की, हा आनुवंशिक रोग आहे. त्याची व्युत्पत्ति म्हणजे बहुत करून 'शेतांत जन्मलेला' किंवा 'इंद्रिय रोग' अशी असावी. हा नक्की रोग कोणता आहे हें सांगता येत नाहीं. वेबर म्हणतो की, अथर्ववेदांमध्यें ज्या ऋचा आहेत हें त्यांचा मुख्य उद्देश शेतांनां होणारा उपद्रव नाहीसा व्हावा हा होय; परंतु शक्य वाटत नाहीं. ब्लूमफील्ड म्हणतो की, तो रोग म्हणजें 'गंडमाला, अथवा 'गरमी', 'परमा' होय. याच्यावर उपाय म्हणून जे सांगितले आहेत त्यांवरून त्या रोगाची चिन्हें काय असतात हें मुळींच समजत नाहीं.
२६गलुन्त -- हा शब्द अथर्ववेदांत एकदांच 'फुगणें' सुजणें. या अर्थी येतो. परंतु व्हिटनें 'मान, गळा' असें त्याचें स्पष्टीकरण करतो. याचाहि अर्थबोध बरोबर होत नाहीं.
२७ग्राह -- हे एका रोगाचे नांव शतपथ ब्राह्मणांत आलें आहें. अथर्ववेदांत अर्धांगवायु असा त्याचा अर्थ आहें.
२८ग्रैव्य -- मानेवरील वाळूक किंवा बेंड असा याचा अर्थ अथर्ववेदांत दिला आहें.
२९ग्लौ -- अथर्ववेद आणि ऐतरेय ब्राह्मण यांत हें एका व्याधीचें चिन्ह आहे. 'गूळं, उठांणू' असा बहुधा त्याचा अर्थ असावा असें ब्लूमफील्ड म्हणतो. वाजसनेयि संहितेवरून याचा अर्थ बरोबर लागत नाही; कदाचित् तो यज्ञिय पशूचा कोणता तरी भाग असावा. हा शब्द वैद्यकांत नाहीं.
३०जंभ -- एक रोग किंवा सर्वात अत्यंत वाईट रोगाचे नांव म्हणून हा शब्द अथर्ववेदांमध्ये आलेला आहे. जंगिड या झाडाच्या योगानें हा रोग नाहीसा होतो असें एका ठिकाणीं म्हटलें आहे. दुस-या एका ठिकाणी सहनु:  ( दोन्ही जबडे एकत्र आणणारा ) असें त्याचें वर्णन आलें आहें. कौशिक सृत्रावरून वेबर असें म्हणतो की, दांत येणें हें जें मुलाचें दुखणें आहे ते हें असावें. ब्लूमफील्डच्या मतें बालग्रह किंवा आंचके येणें हा तो रोग असावा. हा रोग म्हणजे धनुर्वात होय असें कॅलँडचें मत आहे. व्हिटनें म्हणतो की, हा रोग म्हणजें आंकडी किंवा दांतखीळ होय. जृंभा म्हणजे जांभई आल्याबरोबर केव्हां केव्हां तोंड तसेचं उघडे रहातें किंवा एकदम मिटतें; उघडें राहिलें तर मिटत नाहीं व मिटलें तर उघडत नाहीं. यास वैद्यकांत 'हनुस्त्रांस' असे म्हणतात. हनुवटीच्या मुळांशीं वायु कुपित झाल्यानें हा रोग होतो. जंभ रोगहि हाच असावा. 'जबडे एकत्र आणणारा' हें विशेषणहि यास चांगलें लागू पडतें.
३१तक्मन् -- हा एक प्रकारचा रोग असून याचा उल्लेख अथर्ववेदांमध्यें वारंवार येतो. तदुत्तर ग्रंथांत मात्र तो याच  नांवानें प्रसिद्ध नाहीं. अथर्ववेदांत या रोगावर पांच सूक्तें आहेत; व इतर ठिकाणीहि या रोगाबद्दल उल्लेख आलेले आहेत. हा रोग म्हणजे 'ताप' असावा असें वेबरचे मत आहे. तापाची सर्व लक्षणें या रोगाच्या लक्षणाशीं जुळतात असें ग्रोहमननें सिद्ध केलें आहें. थंडीचें व ऊष्णाचें आळीपाळींनें रोग्यास येणारे झटके, तापामुळे कावीळ झाल्यावर येणारा पिंवळा रंग व त्याची विशिष्ट ठराविक मुदत वगैरे बद्दलचें उल्लेख ठिकठिकाणी आलेलें आहेत. या तापाचें निरनिराळें प्रकार दाखविणारे शब्द म्हणजे 'अन्येघु, उभयद्यु:, तृतीयक, वि-तृतीय व सदं-दि हे होतं. या शब्दाचें निश्चित अर्थ ठरविणें फार मुष्किलिचें आहें. पहिल्या शब्दाचा अर्थ दैनिक ताप ( हिंव ) असा आहे व याबद्दल एकमत आहे. तरी पण अन्यें हा शब्द 'दुस-या दिवशीं' अशा अर्थी  असल्याने दैनिक असा अर्थ कसा होतो हें गूढच आहे. 'उभयद्यु:, याचा अर्थ दर दोन दिवसांनी येणारा ताप असा आहे. सायणाचार्याच्या मतें 'उभयद्यु:' चा अर्थ तिजारी ( तिस-या दिवशीं येणारा ) ताप असा आहे. पण तृतीयक याचा अर्थ तिजारी ताप असा असला पाहिजे. झिमरच्या मतें तृतीयक ताप म्हणजे ज्या तापांत तिस-यांदा पाळी आल्यावर रोगाचा जोर होतो व मग रोग असाध्य होतो तो ताप होय. ग्रोहमनच्या मतें वि-तृतीयक म्हणजे असा ताप की, जो दक्षिणेकडील देशांत नेहमीं असतो व जो दररोज येणारा असून ज्याचा जोर एक दिवसाआड होत असतो. ब्लूमफील्डच्या मतें तर वि-तृतीयक व उभयद्यु: हें एकच ताप होत. सदंदि हा ताप पुढें ज्याला 'सतत ज्वर' म्हणूं लागलें तोच असावा. या आजारांत एकदां ताप आला म्हणजे तो पुन: येण्याचें पूर्वी कांहीं दिवस ताप बिलकुल असत नाहीं. हा ताप निरनिराळया ऋतूंत येत असें. शरद्ऋतूंत शरद, उन्हाळयांत ग्रैष्म, व पावसाळयांत वार्षिक अशा त्याला संज्ञा असत. हा ताप विशेषत: शरत्कालीं येत असें, म्हणूनच त्याला विश्वशारद म्हणजे दर शरदृतूंत येणारा असें नांव मिळालें आहे. अग्नि जलांत शिरला म्हणजे हा रोग उत्पन्न होत असें. यावरून वेबरनें असें अनुमान काढलें आहे की, उष्णतेनंतर जी थंडी पडत असते किंवा दलदलीच्या प्रदेशावर उष्णतेचा जो परिणाम होत असे त्याचा परिणाम म्हणजे ही रोगोत्पति होय. ग्रोंहमनच्या मतें अग्नि जलांत शिरला म्हणजे रोग उत्पन्न होतो याचा अर्थ असा की, पावसाळयांत ज्यावेळीं विजेच्या रूपानें अग्नि पावसाबरोबर पृथ्वीवर अवतरतो त्यावेळी हा रोग उत्पन्न होतो. झिमरला हें मत ग्राहय असून त्यानें असें म्हअलें आहे की, हिमालयाजवळ ज्याला हल्ली तराई असें म्हणतात त्या भागांत हा रोग दिसून येतो. त्याच्या मतें वन्य म्हणजे अरण्यांत होणारा असाच अर्थ अथर्ववेदांत सांपडणा-या वन्य शब्दाचा केला पाहिजे. कारण हिमालय पर्वताच्या पश्चिम भागांत असणा-या मूजवंत व महापृष या दोन जातीच्या लोकांत हा रोग आढळून येतो, असा उल्लेख आहे. सांचलेल्या पाण्यातींल अ‍ॅनोफीलस नांवाच्या डांसांपासून ( ते चावल्यावर ) हा ताप उत्पन्न होतो अशाबद्दल कोठेंहि उल्लेख नाहीं. पूर्वकालीन वैद्यशास्त्रांस या रोगाची उत्पत्तिा माहीत होती अशाबद्दलचा शोध त्या शास्त्रावर विनाकारण लादण्यांत आलेला आहें. या रोगाची लक्षणें किंवा यापासून होणारे इतर उपद्रव जे सांगितले आहेत त्यांमध्यें पामन् (खरूज्) शीर्षशोक ( कपाळदुखी ), कासिका ( कफ ) बलास ( क्षय किंवा एक प्रकारची खरूज ). हें रोग सांगितलें आहेत. तक्मन् या रोगाचा उल्लेख अथर्ववेदापासून होतो. ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. कदाचित् वैदिक काळांतील आर्यलोक हिंदुस्थानांत जेव्हां प्रथम आलें तेव्हां त्यानां हा रोग ठाऊकहि नसेल. कदाचित् त्यांनां त्या रोगाची माहिती उडत उडत आलेली अशी ठाऊक असली तरी तो रोग स्थानिक होऊन लोकांना भयप्रद होण्यास ब-याच पिढया लागल्या असतील. या रोगावर कोणते उपाय लोकांस उपयोगी पडत हें निश्चयानें कांही सांगतां येत नाहीं. कारण, अथर्ववेदामध्यें मंत्रतंत्र व कुष्ट यांचाच फक्त उल्लेख आहे. पण यांचा जरी पुढें बरेच दिवस लोक उपयोग करीत होते तरी हें रामबाण उपाय खास नव्हत. अथर्ववेदाचें काळांतसुद्धां या तापानें बरेच बळी घेतले असलें पाहिजेत. कारण त्याशिवाय या रोगाचा एवढया प्रामुख्यानें उल्लेख होता ना. या रोगाचें वर्णन हिंवतापाशीं जुळतें. अन्येद्यु: याचा अर्थ दररोज येणारा ताप असाच वाग्भटांत दिला आहे.
३२तृतीयक -- तिजारी ताप या अर्थी अथर्ववेदामध्यें हा शब्द आलेला आहे.
३३दूषीका -- 'डोळयाचा श्लेष्मा' असा याचा अर्थ असून अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथ यांत रोगाचें नांव म्हणून हा शब्द आलेला आहें.
३४निराल. -- अथर्ववेदामध्यें एकदां हा शब्द आला असून तो एका रोगांचे नांव आहे असें सायणाचार्याचें मत आहें. ब्लूमफील्ड पदपाठाच्या मदतींने हे दोन शब्द घेतो. त्यांपैकी निर हा सक्षिप्त आज्ञार्थी असून आल हा संबोधनार्थी आहें. व त्याचा अर्थ एक प्रकारचें रान असा आहें. व्हिटनें यानें प्रथम आल हें क्रियावाचक नाम समजून शेवटीं असें ठरविले की, निराल हा एक शब्द असून त्याचा अर्थ अनिश्चित आहे. हा शब्द वैद्यकांत नाहीं.
३५पामन् -- अथर्ववेदांमध्यें हें एका त्वग्रोगाचें नांव असून त्या शब्दापासून पामन् हें तद्धित विशेषण आहे. व त्याचा अर्थ त्वग्रोग्रानें पीडिलेला असा आहे. उत्तरकालीन संहिता व ब्राह्मण ग्रंथ यात हें विशेषण आढळून येतें. ताप आल्यानंतर हा रोग होतो असें ज्या अर्थी म्हटलें आहें. त्या अर्थी पुरळ किंवा खरूज ( ताप येऊन गेल्यावरची ) असा याचा अर्थ असावा. पामा नांवाचा रोग निदानांत वर्णिलेला आहे. हा खरजेसारखाच एक विकार आहे. या रोगांत येणा-या पुळया कंबरेवर व हातांवर दाट अशा येतात.
३६पृष्टयामय -- बाजूस किंवा बरगडयांतील दु:ख असा या शब्दाचा अर्थ अथर्ववेदांत दिलेला आहें. निदान तेथें तरी तापाला लागून होणारें दु:ख असा याचा अर्थ वाटतो. उसण हा एक पृष्टयामय आहे. केव्हां केव्हां हा विकार होतो.
३७प्रमोत -- हें एका रोगांचें नांव आहे असे से. पी. कोशांत म्हटलें आहें. हा शब्द अथर्ववेदांत आला आहे. झिमरच्या मतें हा शब्द विशेषण असून याचा अर्थ 'मुका' असा आहे. हें मत ब्लूमफील्म्ड व व्हिटनें यांनी भीतभीत मान्य केलें आहे. हा रोगवाचक शब्द वैद्यकांत नाहीं व दुसराहि योग्य अर्थ कोणता आहें हें माहित नाहीं.
३८बलास -- अथर्ववेद आणि तदुत्तर ग्रंथांत या रोगांचें नांव पुष्कळवेळां आलेंलें आहें. महीधर आणि सायण याचा अर्थ क्षय असा करितात. झिमरहि याच मताचा आहे. कारण हा एक यक्ष्म्याचा प्रकार आहे असा उल्लेख येतो. यामुळें ( अस्थिस्त्रंस आणि परूसस्त्रंस ) हाडें आणि सांधे मोकळें होतात. हा रोग उत्पन्न होण्याचें कारण प्रेम. त्वेष किंवा हृदय (?) होय. पुढील हिंदु वैद्यकांत क्षयाच्या बद्दल हें वर्णन आढळतें. बलास हा नेंहमी तक्मन् या शब्दाबरोबर आढळतो हेहि योग्यच आहे. कारण तक्मन् हा क्षयाच्या वर्णनाचा एक राक्षस आहे. ग्रोहमनच्या मतानें त्याचा सूज किंवा दु:ख असा अर्थ असावा. ब्लूमफील्डच्या मतें याचा अर्थ संशांयित आहें. लुडविग याचा जलोदर असा अर्थ करतो. या रोगावर त्रिककुद् व जंगिड या वनस्पतीचें अंजन औषध म्हणून दिलें आहें. वैद्यकांत बलास याचा कफ असा अर्थ आहे. क्षयांत कफाचेंच प्राधान्य असते. आणि त्यांत दुष्ट कफ फार पडतो यावरून आणि इतर वर्णनावरून हा रोग म्हणजे ज्यास कफक्षय म्हणतात असा क्षय रोगाचाच एक प्रकार असावा. क्षयरोगाच्या सुरूवातीस एक प्रकारचा ताप येऊं लागतो त्यास वैद्यकांत वातबलासकज्वर असें म्हणतात. यावरूनहि बलासक हें नांव क्षय रोगासंबंधी प्राचीन असून लोकरूढ आहे असें वाटतें. कारण रोगांची नांवे जी पूर्वीपासून रूढ होती तींच चरकानें वापरलीं आहेत. लुडविग याचा जलोदर असा अर्थ करतो. त्यास आधार काय हें समजत नाहीं. सुजेच्या विकारानें हाडें दूर होतात असें जें त्या विकाराचें लक्षण दिलं आहे तें क्षय रोगांत जास्त संभवतें.
३९मन्या -- ( मानेचा कांटा, अनेकवचनी ). अथर्ववेदांतील एका रोगविषयक ऋचेंत हा शब्द आला आहे. हा रोग म्हणजें बहुधा गंडमाळेंमुळें मानेवर आलेली सूज होय. वाइज या शब्दाची मन्सकूंडर म्हणजे मानेवरची गलांडे या रोगाशीं तुलना करतो. हा मन्सकूंडर शब्द मन्या व स्कंध्या ( खांद्याचें आणि मानेवरचें दु:ख ) या दोन्ही ( पहिल्या आणि तिय-या अथर्वण ऋचांतून आलेल्या ) शब्दांसारखा दिसतो.
४०रोग -- अथर्ववेद व मागांहून झालेले ग्रंथ यांत रोग या शब्दाचा आजार असा अर्थ दिला आहे.
४१विंक्लिंदु -- एका रोगाचें नांव म्हणून हा शब्द अथर्ववेदांत आलेला आहें. ब्लूमफील्डच्या मतानें याचा अर्थ मोतीबिंदु असा आहे. हा शब्द वैद्यकांत नाहीं.
४२विद्रध -- सपूयक्षत नांवाच्या एका रोगाचे हें नांव अथर्ववेदामध्यें आलेलें आहें. झिमरच्या मतें यक्ष्मा या रोगांचें हें लक्षण आहे. याच रोगाला पुढें विद्रधि असें लोक म्हणूं लागले. लुडविग या शब्दाची व ऋग्वेदामधल्या अस्पष्ट विद्रध शब्दाची तुलना करतो, पण ऋग्वेदांतील विद्रध शब्दाचा नक्की अर्थ काय आहे हेंच समजत नाहीं. वैद्यकांत विप्रधि नांवाचा रोग वर्णिला आहे तोच हा रोग असावा.
४३विलोहित -- हें एका रोगांचें नांव अथर्ववेदांत आलें आहे. ब्लूमफील्डच्या मतें नाकांतून रक्त वहाणें ही ती पीडा असावी. हेनरी याचा अर्थ रक्त नासणें असा करतो. व्हिटनेच्या मतें रक्तक्षय (अ‍ॅनिमिया ) असा त्याचा अर्थ आहे. वैद्यकांत ज्यास पंडुरोग म्हणतात तोच हा विलोहित रोग होय. कारण, याच रोगांत रक्त कमीं होतें  ( 'ततोल्परक्त मेदस्को'-- वाग्भट, पंडुरोग निदान ). ब्लूमफील्डचें मत बरोबर नाहीं. कारण, नाकांतून रक्त वाहूं लागलें म्हणजे तो रक्त वाढल्याचा रोग समजतात. रक्ताचें पृथक्करण हा अर्थ कसा होतो हेंच समजत नाही; हीं शब्दयोजना चमत्कारिक आहे
४४विशर -- हा शब्द अथर्ववेदांत आढळतो. हा एखाद्या रोगाचा निदर्शक असावा. रॉथ म्हणतो की, हें एका राक्षसाचें नांव असावें, पण झिमर म्हणतो की, ताप ( तक्मन् ) आला असतां अंगाचें जें ठणकणें त्यास विशर असें म्हणत असतील; आणि या तर्कास 'विशरीक' व दुस-या एका स्थळीं आलेल्या 'बलास' ह्या शब्दानें पुष्टि मिळतें. हा शब्द वैद्यकांत नाहीं.
४५विसल्प, विसल्पक -- हा शब्द अथर्ववेदांत सांपडतो. विसल्पक असा पाठ वैदिक लोक घेतात तेव्हां तोच अधिक युक्त असें वेदार्थयत्नकार शं. पा. पंडित यांचें मत आहें. शल्य म्हणजे बाण, कांटा, वगैरे जर शरीरात घुसला तर त्यामुळें अथवा तो निघाल्यावर अशा प्रकारच्या वेदना होतात तशा वेदना असा याचा अर्थ होईल. ताप आल्यावर मज्जातंतूंनां जी व्यथा होते, तिच्या अर्थीहि ह्याचा उपयोग केला असल्याचा संभव आहें.
४६विष्कंध -- एका रोगाचें नांव म्हणून हा शब्द अथर्व वेदांत आढळतो. ह्यावर इलाज म्हणून शिशाचा ताईत, अंबाडी, जंगिड नांवाची वनस्पति अथवा एक प्रकारच्या मलमाचा उपयोग करावा असें तेथें म्हटलें आहे. एका सूक्तांत आलेल्या 'कार्षक' व 'विषक' ह्या नांवांच्या वनस्पतींचा या रोगावर उपयोग होत असावा. वेबर म्हणतो की, विष्कंध म्हणजें संधिवात. कारण यामुळें स्कंध वेगवेगळे होतात ( वि + स्कंध ) ब्लूमफील्डच्या मतानें ऋग्वेदांतील 'व्यंस' व विग्रीव ह्याप्रमाणें 'विष्कंध' हाहि एक राक्षस असावा. वैद्यकशास्त्राप्रमाणें ह्या शब्दाचा काहीं अर्थ लागत नाहीं.
४७शीर्षक्ति -- अथर्वांत डोकेंदुखीला हा शब्द योजिला आहे. हा वैद्यकांत नाहीं.
४८शीर्षामय -- याचा अर्थ डोक्याचा रोग. याचा उल्लेख अथर्ववेदांत आहें.
४९सस्कंध -- विष्कंध ह्या शब्दाबरोबरच हा एक रोगदर्शक शब्द आला आहे. ह्याचा अर्थ 'खांदे एकत्र असलेला', व्हिटनेच्या मतानें विष्कंधाचा प्रतिकार करणा-या औषधाचे हें नांव असावें. हा शब्द वैद्यकांत आढळत नाहीं.
५०स्कंध्या -- हें स्त्रीलिंग अनेकवचनीं रूप् अथर्वात आढळतें. खांद्याच्या रोगाचें किंवा कसल्या तरी गळवाचें हें नांव असावें. असा रोग वैद्यकांत नाहीं.
५१हृदयामय -- 'काळजाचा' रोग. हा शब्द अथर्वामध्यें 'यक्ष्मा' व 'क्लास' हयांच्या संबंधानें आलेला आहे. झिमरच्या मतें हा क्षय होय. तो वैद्यक संहितेंत दिलेल्या मतानुसार म्हणतो की, ह्या रोगास जीं कारणें आहेत, त्यांत प्रेम हें एक असावें.
५२अर्शस् -- वाजसनेयि संहितेंतील क्षय व दुसरें क्षुल्लक रोग यांच्या यादींत या रोगाचेंहि नांव आहें. उत्तरकालीन वैद्यकवाड्मयांत त्याचा अर्थ 'मूळव्याध' असा करितात.
५३उपचित् -- वाजसनेयि संहितेंत हा शब्द एका रोगाचा निदर्शक म्हणून आढळतो. रॉथ याचा अर्थ सृज असा करतो, व तो शक्य आहे. उपचय म्हणजे सूज असा वैद्यकदृष्टया अर्थ होतो. ब्लूमफील्ड उपचित् व अपचित् एकच असें म्हणतो.
५४पाकारू -- हा एक रोग विषूचिका व अर्शस् हयांच्या बरोबरच वाजसनेयि संहितेंत उल्लेखिला आहे. ह्या रोगाचें विशिष्ट स्वरूप् जरी माहीत नाही, तरी शब्दाच्या व्युत्पत्तीवरून याचा अर्थ पक्क झालेला व्रण असा होईल.
५५प्लिहाकर्ण -- वाजसनेयि संहितेंत गुराढोरांच्या मागें विशेषणात्मक रूपानें हा शब्द योजिला आहें. प्लिहेच्या आकाराचा गुरांच्या कानांवर दिलेला ठसा असाहि याचा अर्थ संभवले. पण वाजसनेयि संहितेंत महीधराचार्य याचा एक कर्णरोग असा अर्थ देतात. प्लिहाकर्ण हा रोग वैद्यकांत नाहीं. पाळिरोग असें एक कर्णरोगांत सदर आहे व त्याचा अर्थ कर्णपाळींचा रोग असा आहे. कर्णपाळी म्हणजें कानाची वरची सर्व बाजू.
५६विषूचिका -- वाजसनेयि संहितेंत हा शब्द आढळतों सोमपानातिरेकामुळें होणारा हा रोग होय. याचा आमांश किंवा वाईजच्या मताप्रमाणें पटकीं असाहि अर्थ होईल. उघड शब्दार्थ 'दोनहि दिशांनी मलविसर्जन' असा आहे. चरकामध्यें हा अजीर्णाचा रोग होय असें लिहिलें आहें. हयांत सुया टोंचल्याप्रमाणें सर्वोगास वेदना होतात, म्हणून यास विषूचिका म्हणतात.
५७विष्ठाव्राजिन् -- शतपथ ब्राह्मणांतील या शब्दाचा अर्थ संशयित आहे. सायणाचार्य याचा अर्थ 'एके ठिकाणीं राहणारा' असा करितात. या अर्थाप्रमाणे पाहतां सेंट पीटर्सबर्ग-कोश व बोथलिंगचा कोश यांच्यात दिलेला ज्याचा कळप स्थिर आहे तो' हा अर्थहि बरोबर म्हणतां येईल. परंतु शतपथ ब्राह्मणांच्या कण्वशाखीय प्रतींत एके ठिकाणी त्याचा रोग या अर्थानें उपयोग उपयोग केला आहे असें एगलिंग म्हणतो. त्याचप्रमाणें विष्ठाव्राजिन् याचा अर्थ आमांशानें व्यथित असाहि होईल.
५८व्याधि -- व्याधि म्हणजे रोग. वैद्यक वाड:मयांत अनेक वेळां हा शब्द आलेला आहे. निरनिराळया रोगांनां निरनिराळीं नांवे दिलेलीं आहेत. वैद्यक संहितांमध्यें अनेक शारीरिक व्यंगांची नांवें आढळतात. वाजसनेयि संहितेतील पुरूषमेधांत बली दिल्या जाणा-या व्यक्तींच्या यादीत वामन किंवा कुब्ज, खल्वाटि       ( टकल्या ), अन्ध, बधिर, मूकपीवन् ( लठ्ठ मनुष्य ), सिद्मला किंवा कलास ( पण्डुरोगी ), हर्यक्ष ( पीतवर्ण डोळयांचा ), पिंगाक्ष ( पिंगट डोळयांचा ), पीठसर्पिन् ( लुला ), श्राम ( लंगडा ), जागरण ( निद्राहीन मनुष्य ), स्वपन ( निद्रारोग असलेला ), अति दीर्घ ( उंच सडपातळ मनुष्य ), अति -हस्व ( फार ठेंगू ), अति स्थूल किंवा अत्यलस, अतिकृश, अतिशुक्ल, अतिकृष्ण, अतिखल्व ( अतिशय टक्कल पडलेला ), अतिलोमश ( फार केंस असलेला ), अशीं नांवे आलेलीं आहेत. मैत्रायणी संहितेंत, ज्याचीं नखें वाईट आहेत, किंवा ज्याचें दांत पिंगट आहेत, अशा माणसावा दिधिषू:पतीसारख्या पापी लोकांच्या नांवाबरोबर उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत शुक्ल ( पांढ-या ठिपक्यांचा ) टक्कल पडलेला, पुढें दांत आलेला व तांबूस पिंगट नेत्रांचा मनुष्य असें एका माणसाचें वर्णन आलेंलें आहें. झिमरची अशी एक कल्पना आहे कीं वाजसनेयि संहितेंमध्यें आलेल्या किर्मिर ह्या शब्दावरून दोन जातींच्या लोकांच्या मिश्रणाचा बोध होतो. ही मोठी मजेदार पण निवळ कल्पनाच असून किर्मिर शब्दाचा कृ धातूंशीं आलेला संबंध हा त्या कल्पनेस आधार आहे. वाजसनेयि संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण हयांमध्यें बायकांना अनेक विशेंषणें दिलेंली आहेत; हयांतील कांही रोगदर्शक आहेत. अथर्वसंहितेमध्यें स्त्रीलिंगी विशेषणें ऋष्यपदी ( काळविटासारखे पाय असलेली ) वृषददी, वगैरेसारखीं जीं आढळतात तीं शारीरिक व्यंगदर्शकच असावींत. शारीर व्यंगांसंबंधी सर्व वैद्यक नांवें वैदिक ग्रंथांत आहेत.
५९श्लोण्य -- तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथांत ह्याचा अर्थ त्वग्रोग असा असून ( टीकाकारांच्या मतानें ) लंगडेपणा असा आहे.
६०श्वयथ -- शतपथ ब्राह्मणांत ह्याचा अर्थ फुगणें असा आहे. कदाचित् हा, बौधायन श्रौतसूत्रांत म्हटल्याप्रमाणें विदेहामध्यें असलेला शोयथु नांवाचा रोग असावा. या रोगांत सूज वगैरे येत असेल, कारण श्वयथु हा शब्द वैद्यकांत असून सूज असा अर्थ आहे.
६१श्वित्र -- पंचविश ब्रामहणांत ( १५,११,११ ) जलोदरानें पीडित असा अर्थी विशेषणाप्रमाणें ह्या शब्दाचा उपयोग केलेला आहे. वैद्यक शास्त्राप्रमाणें ह्या शब्दाचा अर्थ  श्वेत कुष्ट ( पांढरे कोड ) असा आहें.