प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.               

व्यापारवकृषि

कृषि (ॠग्वेद)/ मापें (ऋग्वेद) / नाणीं (ऋग्वेद)

अष्ट्रा- शेतक-याची खूण अथवा बैलांनां मारावयाची पराणी. ॠग्वेदांत या शब्दाचा उल्लेख पुष्कळ वेळ आला आहे.
कृषि- नांगरणें. इराणियन् लोकांपासून अलग होण्याच्या पूर्वीच आर्य लोकांनां जमिनीची लागवड करणें. माहित होतें. कारण जमीनीत बीं पेरणें आणि धान्य उत्पन्न करणें या विषयी ॠग्वेदांतील यवम्- कृष, सस्य या शब्दांच्या अर्थाचे अवेस्तांतील शब्द यवकरेश व हह्य हे आहेत. बी पेरणें हा शब्दसमुच्चय मुख्यत्वेंकरून ॠग्वेदाच्या पहिल्या आणि दहाव्या मण्डलांत व क्वचित गोत्र मंडलांत (२ ते ७) जो आला आहे त्याला कांही तरी अर्थ असलाच पाहिजे. अथर्ववेदांत पृथी वैन्य हा कृषिकर्माचा आद्य प्रवर्तक असल्याचा उल्लेख (८.१०,२४) आहे. ॠग्वेदांतहि आश्विन नांगराच्या साहाय्यानें बी पेरीत असत असा उल्लेख आहे. पुढील संहिता आणि ब्राह्मणग्रंथ यांत कृपिकर्माचा बराच उल्लेख आला आहे. ॠग्वेदांत देखील कृषिकर्माला महत्त्व दिलेलें आढळतें. पंचविंश ब्राह्मणांत ब्राह्मणसत्तेच्या बाहेर असलेले व्रात्यलोक जमीन नांगरीत नसत असा उल्लेख आहे. नांगरलेल्या जमीनीला उर्वरा अथवा क्षेत्र म्हणत.  खताचा (शकन्, करीष) उपयोग करीत असत आणि पाट बंधा-याचा (खनित्र) हि उपयोग केला जात असे.  नांगर सहा आठ व कधीं कधीं बारा बैलांनीं ओढविला  जात असे. शतपथ ब्राह्मणांतील शेतकीची कृत्यें म्हणजें नांगरणें, पेरणें, कापणी करणें आणि मळणें (कृषतःवंपतःलुनन्तः मृण्मन्तः) हीं आढळतात. धान्य पिकलें म्हणजे कोयत्यानें (दात्र, सृणी) कापीत, गठ्ठे(पर्ष) बांधीत आणि कोठारांच्या जमीनींत (कल) मळति असत. धान्य चाळणीनें अथवा सुपानें चाळून त्यांतील कचरा काढून टाकीत असत. व एका सांठणांत (ऊर्दर) भरून ठेवीत असत. धान्य पाखडणाराचें नांव धान्यकृत् असें होतें. कोणत्या प्रकारचें धान्य पेरीत असत हें ॠग्वेदावरून स्पष्ट होत नाहीं. कारण यव शब्दाचा अर्थ निश्चित नाहीं व धानाचाहि अस्पष्टच आहे. तैत्तिरीय  वाजसनेयि संहितांमध्यें व्रीहि (तांदूळ), यव (जव)उपवाक(एक यवाची जात), वाटाणे, मुद्ग (मूग), गोधूम, नीवार, प्रियंगु, श्यामाक, मसुर इत्यादि धान्यांचा उल्लेख आहे. आणि उर्वारु, उर्वारुक (काकडया) यांचाहि उल्लेख आहे. वैदिक काळांतील लोक फळझाडांची लागवड करीत किंवा की आपोआप उगवत असत हें समजत नाहीं. परंतु कर्कन्धु, कुवल, बदर इत्यादि फळांचा उल्लेख येतो.  तैत्तिरीय संहितेत (७.२,१०,२). शेतीचे हंगाम कोणते ते सांगितले आहेत. यव हें धान्य हिवाळयांत पेरून उन्हाळयांत काढीत असत, पावसाळयांत पेरलेले धान्य शहदृतूत निघे; वाटाणे आणि तीळ ही धान्यें ग्रीष्म ॠतूंत पेरून हिवाळयांत काढीत. तैत्तिरीय संहितेंत आणखी एका स्थली (५.१,७,३) पिकाचे वर्षातून दोन हंगाम असत असा उल्लेख आहे. हिवाळयांत पेरलेले  धान्य चैत्रांत निघत असे असा कौपीतकी ब्राह्मणांत उल्लेख आहे. शेतीच्या कामांत शेतक-यांना  फार त्रास पडत असे. उंदीर बी खात, पक्षी आणि निरनिराळे सरपटणारे प्राण (उपक्वसू, जभ्य, तर्द, पतंग) पिकाचे कोवळे अंकुर तोडीत असत, आणि अवर्षण व अतिवृष्टि यांमुळे पिकाचा नाश होत असे. हीं सर्व विघ्नें टाळण्यासाठी अथर्ववेदांत (६.५०, १४२; ७.११) मंत्र सांगितले आहेत.
गव्यूति- ॠग्वेदांत हा शब्द रॉथच्या मताप्रमाणें गुरांनां चरण्यासाठी गवत असलेली जमीन या अर्थी आणि गव्य शब्दहि त्याच अर्थी आलेला आहे. पुढें पंचविश ब्राह्मणांत (१६,१३,१२) त्याचा रस्त्याची लांबी मोजण्याचें माप असा अर्थ होऊं लागला. गेल्डनेर त्याचा पहिल्यानें मूळअर्थ खरोखरचा अथवा लाक्षणिक रस्ता असा करून नंतर जमनींचे माप व पुढें जमीन असा अर्थ करतो.
तोक्मन् - हा शब्द नपुसंकलिंगी असून ॠग्वेदामध्यें व इतरत्र कोणत्याहि धान्याचे हिरवे कोंब या अर्थी आला आहे. ऐतरेय ब्राह्मणांत व्रीहि, महाव्रीहि, प्रियंगु व यव यांच्या अंकुराचा उल्लेख आहे.
फर्वरि- हा शब्द ॠग्वेदांत आला आहे. याचा निश्चयात्मक अर्थ सांगता येत नाहीं. कदाचित् याचा अर्थ पिकलेले शेत असा असावा. सायणमतानें याचा अर्थ भरणारा व ग्रासमनच्या मतानें पेरणारा असा याचा अर्थ आहे.
लांगल- ॠग्वेद व पुढील ग्रंथांत याचा नेहमीचा अर्थ नांगर असाच आहे. अनेक ठिकाणीं याचें वर्णन पवी रवत, पवीरवम् , (बारीक मूठ असलेला) असें वर्णन आलें आहे.
वृक- ॠग्वेदांत दोन ठिकाणीं (१.११७, २१;८.२२, ६) याचा अर्थ नांगर असा आहे.
शुनासीर-हा शब्द द्विवचनी असून ॠग्वेद व पुढील ग्रंथांत कृषिकर्मदेवता असा त्याचा अर्थ होतो. या देवता रॉथच्या मतानें नांगराचा फळ व नांगर या होत. हा शब्द शुन आणि सीर ही दोन पदें एकत्र होऊन झाला आहे. याच्या अर्थाबद्दल मतभेद आहे. शुन याचा अर्थ सायणमतानें वायु असा होतो. सीर या शब्दाचा अर्थ सायणमतें वायु व यास्कमतें आदित्य असा आहे. वस्तुतः सीर याचा अर्थ नांगर व शुन म्हणजे सुख आणि दोन्ही शब्द मिळून सुखकारक नांगर किंवा नांगरामुळें उत्कर्ष असा अर्थ होतो. नांगर हें शेतीचें मुख्य साधन असल्यामुळें त्याला देव मानण्याचा प्रघात पडला व यालाच अनुसरून सायण व शौनक यांनी अर्थ केला असावा.
सीरा- हा शब्द ॠग्वेद व पुढील ग्रंथ यांत अनेक वेळां आला आहे. हा नांगर ओढण्यास बैल असत, त्यांच्या मानेवर जूं असे व पाठीवर ओढपटया (ॠ. ४.५७,४;१०.१०२,८) असत व बैलानां हांकण्यासाठी नांगर चालविणाराजवळ अणी (अष्ट्रा) असे. नांगराच्या निरनिराळया भागाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीं.
१०सृणि - ॠग्वेदांत हा शब्द विळा या अर्थानें एकदां निश्चयानें (१५८,४) व दुस-या एका ठिकाणीं (१०.१०१, ३) अनिश्चित असा आहे. पिशलेच्या मतानें (ॠ. १.५८,४) येथें असलेले सृण्या हे पद त्याच्या बरोबर असलेल्या जुहूचें विशेषण असून या दोन्ही पदांचा अर्थ कोयतांच्या आकाराच्या पळया असा आहे पण या अर्थाबद्दलहि शंका आहे. सृण्या या शब्दाबरोबर जेता हा शब्द येतो परंतु त्याचा अर्थ संदिग्ध आहे. रॉथच्या मतें जेता याऐवजी चेता असा शब्द असावा. ओल्डेनबर्ग म्हणतो हा शब्द चेता असाहि असेल. हॉपकिन्स याच्या मतें सृणि शब्दाचा अर्थ आकडा (आकडी) असा असावा.
११तुप- अथर्ववेद व तदुत्तर ग्रंथांत याचा नेहमीचा अर्थ धान्याचा भुसा असा आहे. या भुशाचा विस्तव पेटविण्याकडे उपयोग करीत असल्याबद्दल तैत्तिरीय (५.२,४,२) व शतपथ ब्राह्मणांत (७,१,१,७) उल्लेख आहे.
१२पलाल- अथर्ववेदांत अनुपलाल या शब्दाबरोबर एका राक्षसाचें नांव म्हणून हा शब्द आला आहे. याचा अर्थ गवताची पेंढी असा असावा व तोच अर्थ शांखायन सूत्रांत (३०,२७) स्वीकारला आहे. या शब्दाचें स्त्रीलिंगी रूप यवाची पेढी या अर्थानें अथर्ववेदांत (२.८३) आलें आहे.
१३पलाव- अथर्ववेद व जैमिनीय उपनिषद्  ब्राह्मण (१५४,१) या ग्रंथांत हा शब्द भुसा या अर्थानें आला आहे.
१४पवन- अथर्ववेदांत टरफलापासून धान्य वेगळें करण्याचें यंत्र अथवा धान्य वाढविण्याची पाटी अशा अर्थानें हा शब्द आला आहे. आश्वलायन गृह्यसूत्रांत या पवनाच्या योगानें दहन केल्यानंतर प्रेतास्थि शुद्ध करीत असत. (आश्वलायन सूत्रांतील पवन याचा अर्थ वायु असा असावा.)
१५शण- याचा अर्थ अंबाडी असा असून ही जंगलांत वाढते असा अथर्वात उल्लेख आहे. जंगिडाप्रमाणें विस्कंधावरहि तोडगा म्हणून हिचा उपयोग होतो असें तेथें म्हटलें आहे. हिचा शतपथ ब्राह्मणांतहि (३.२,१,११) उल्लेख आहे.
१६लवन- निरुक्तांत (२.२) धान्याची मळणी किंवा कापणी या अर्थानें हा शब्द आला आहे.
१७अरत्नि- याचा मूळ अर्थ कोपरापासून करंगळीच्या टोकपर्यंतचा हात. ॠग्वेदांत व पुढील ग्रंथांत लांबी मोजण्याचें माप या अर्थानें त्याचा उपयोग केला आहे.
१८खारी- ॠग्वेदांत एका ठिकाणीं सोमरस मोजण्याचे माप या अर्थाने हा शब्द आला आहे.
१९तेजन- शेत मोजण्याची काठी या अर्थाने हा शब्द ॠग्वेदांत आला आहे. अथर्ववेदांत दोन वेळां हा शब्द आला असून दुस-या ठिकाणीं (२०.१३६,३) वासंतिक वसंत ॠतूंतील)बांबू अशा अर्थाने आला आहे. ऐतरेय ब्राह्मण वगैरे ग्रंथांत (१.२५) त्याचा बाणाचें टोक असा अर्थ आहे.
२०पंक्ति- हा शब्द पक्ष्यांची (५.५९,७) घोडयांची (१.१२६,४) किंवा रथाची (४.३८,३) रांग या अर्थाने ॠग्वेदांत आला आहे. छांदोग्य उपनिषदांतहि (५.१४,१) याचा उल्लेख आहे.
२१मना- हा शब्द ॠग्वेदांतील एका दानस्तुतिसूक्तांत (८.७८,२) आला आहे तेथे आलेल्या ‘सत्वामना’ या रूपावरून हें सोन्याचें नाणे अथवा वजन असावें किंवा अलंकार असावा व म्हणून याची ग्रीस स्रा व लॅटिन ‘मिना’ या शब्दांशीं तुलना करितात, हे शब्द मूळचे सोमटिक भाषेंतील आहेत व ते फोनेशियन लोकापासून ग्रीक लोकांनीं घेतले असावेत व फोनेशियनापैकीच असलेल्या सिसली अथवा एट्रुरिया येथील कार्थेजियन लोकांनीं रोमन लोकांपासून घेतले व बाबिलोनियन लोकापासून हिंदुस्तानातील लोकानीं घेतले. परंतु ही मनाच्या बाबतीतील कल्पना धोक्याची आहे कारण त्या कल्पनेला आधार काय तो बाबिलोनियन लोकापासून हिंदुस्थानातील लोकांना हें नाणें माहित झालें हा होय; व तोहि जलप्रलयाची हकीकत व नक्षत्रव्यवस्था हिंदी लोकांनीं बाबिलोनियन लोकांपासून घेतल्या या कल्पनेप्रमाणेंच होय. परंतु उलटपक्षी या मनाचा अर्थ ॠग्वेदांत आणखी आढळणा-या (१.१७३, २.४ ३३,२;१०.६,३) व ‘इच्छा’ अर्थ असणा-या ‘मना’ प्रमाणेंच असावा अथवा कदाचित प्रथम दिलेल्या स्थलीं (८.७८, २) मना याचा इच्छित वस्तु असाहि अर्थ असेल. बोथलिंकच्या कोशात मना हा एकटाच शब्द सापडतो व त्याचा इच्छा किंवा मत्सर एवढाच अर्थ दिला आहे हें लक्षात ठेवण्यासारखें आहे.
२२योजन- ॠग्वेद व तदुत्तर वाङ्मयांत लांबी मोजण्याचें माप या अर्थानें हा शब्द आला आहे. परंतु योजन या शब्दाने जमीनीची किती लांबी गणली जाई हें सांगतां येत नाहीं. नंतर पुढील काळात योजन म्हणजे चार कोस किंवा नऊ मैल अशी गणना होऊं लागली.
२३स्थिवि- हा शब्द अनेकवचनी रूपांत ॠग्वेदांत (१०,६८,३) एकदा आला असून त्याचा अर्थ एक कैली माप असा आहे, हा शब्द ॠग्वेदांत आणखी एकदा (१०.२७, १५) ‘स्थिविमन्त’ असा विशेषणात्मक रूपांत आला आहे.
२४कृष्णल- याचा अर्थ बोर असा आहे. परंतु पुढे त्याचा वजन या अर्थी व तें वजन चार कृष्णल म्हणजे एक माष (उडीद) असा उपयोग होऊं लागला. यजुर्वेद आणि तैत्तिरीय  संहिता या ग्रंथांत हा शब्द येतो.
२५बाहु- तैत्तिरीय संहिता आणि सूत्रग्रंथ यांत हा शब्द लांबी मोजण्याचे माप या अर्थानें आला आहे.
२६मान- तैत्तिरीय संहिता व अथर्ववेद व ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द येतो व तो नेहमी रक्तिका किंवा कृष्णल या शब्दांबरोबर येतो. याचा अर्थ गुंज असा आहे.
२७व्याम- तैत्तिरीय संहिता अथर्ववेद व ब्राह्मणग्रंथांत हा शब्द येतो. याचा अर्थ पसरलेल्या बाहूनें व्यापिलेली जागा असा आहे. हें लांबी मोजण्याचें प्रमाण आहे. एक व्याम म्हणजे सहा फूट किंवा इंग्रजींत ज्याला फॅदम म्हणतात ते प्रमाण होय.
२८आश्विन- अथवा अश्विन अथर्ववेदांत पुढील ग्रंथांत याचा अर्थ घोडेस्वारानें एका दिवसांत केलेल्या प्रवासाच्या लांबाचें माप असा आहे. अथर्ववेदांत हें माप पांच योजनांपेक्षां जास्त होतें असें म्हटलें आहे.  पांच योजनांपेक्षां जास्त लांबी मोजण्यास आश्विन याच मापाचा उपयोग करीत असत. ऐतरेय ब्राह्मणांत पृथ्वीपासून स्वर्ग एक हजार आश्विन लांब आहे असें म्हटलें आहे (२.१७)
२९शल- सेंट पीटर्सबर्ग कोशांत याचा अर्थ लांबी मोजण्याचें साधन असा आहे. व याच अर्थानें अथर्ववेद, काठक संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण (१५.१०) यांत आला आहे. व्हिटने म्हणतो कीं हा अर्थ सुसंगत नाहीं.
३०कुष्ठ- मैत्रायणी संहितेंत (३.७,१) अपूर्णांक या अर्थी हा शब्द आला असून ती कला, कुष्ठ शफ आणि पद अशी मालिका आहे व तिचा अनुक्रमें १६ वा, १२वा ८ वा व ४ था हिस्सा असा अर्थ होतो. (मूळांत शब्द आहेत परंतु अर्थ मात्र हाच असावा असें दिसत नाहीं. )
३१मृद- काठक संहितेंत हा शब्द समासांत आढळतो. याचा अर्थ साने वजन करण्याचें माप असा आहे व्याकरणदृष्टया पाणिनीमतानें (३.१,१४३) प्रद असा पाठ असावा कीं, काय असा संशय आहे.
३२अंगुष्ठ - लांबी मोजण्याचें परिमाण या अर्थी हा शब्द काठक संहितेंत आला आहे.
३३क्रोश - शब्दशः अर्थ ‘मोठयानें हाक मारली असतां तो ध्वनि जितका लांब जातो ती लांबी’ हा शब्द पंचविंश ब्राह्मणात (१६,१३,१२) आला आहे.
३४त्रैपद- हा नपुसकलिंगी शब्द योजनाचा तीनचतुर्थांश या अर्थानें पंचविंशब्राह्मणांत आला आहे. त्याच ब्राह्मणांत (१७,१३) योजनाला गव्यूति व योजन चतुर्थाशाला क्रोश म्हटलें आहे.
३५पाद-लांबी मोजण्याचें माप या अर्थी हा शब्द शतपथ ब्राह्मणांत आला आहे. हा शब्द कधीं कधीं वजनी माप या अर्थानेहिं उपयोगांत आणिला आहे. अपूर्णांकाच्या रूपांत याचा एक चतुर्थांश असा अर्थ आहे. व हा अर्थ चतुष्पाद प्राण्यांच्या चार पायांपैकी एक पाय यावरून आला आहे. जसें शफ म्हणजे पायांतील (खुरांपैकी) एक भाग म्हणजे एक या संख्येतील आठवा भाग.
३६पृथ- हा शब्द तैत्तिरीय ब्राह्मणांत (१.६,४,२) लांबी मोजण्याचे परिमाण या अर्थी आला आहे. याचा तळहात, तळवा, तळहाताची रुंदी असा अर्थ होतो.
३७प्रक्रम-हा शब्द शतपथ ब्राह्मणांत लांबीचें परिमाण या अर्थी आहे. याने किती लांबी मोजली जाते.
हें तेथे सांगितले नाहीं. सूत्रग्रंथांत याचा अर्थ एका पावलाची लांबी असा आहे.
३८प्रसृत- शतपथ ब्राह्मणांत मोजण्याचें माप या अर्थानें हा शब्द आला आहे. याचा अर्थ ‘मूठभर’ असा होतो.
३९प्रादेश- लांबीच्या परिमाणाकरितां वारंवार ब्राह्मण ग्रंथांत हा शब्द योजिला जातो. याचा अर्थ वीत (अथवा टीच) असा आहे.
४०रत्नि- पंचेचाळीस इंचाचें माप. पंचविंश ब्राह्मणांत आलेल्या अरत्नि याच्या उलट हा शब्द आहे.
४१शराव- तैत्तिरीय ब्राह्मण व सूत्रग्रंथांत धान्य मोजण्याचें माप या अर्थी हा शब्द आला आहे.
४२शुल्क- ॠग्वेदांत याचा अर्थ किंमत असा आहे धर्मसूत्रांत याचा अर्थ कर असा आहे व तो अर्थ मूरला अथर्ववेदांत आढळून आला आहे (३.२९,३). या ठिकाणीं शुल्क असा शब्द आला असल्यामुळें अर्थहानी बरीच झालेली आहे (?) हा अर्थ व्हिटने व ब्लूमफील्ड यांनीं स्वीकारला आहे. दुस-या एका ठिकाणीं वेबरनें केलेले अर्थ व्हिटनेनें स्वीकारलेला नाहीं, ब्लूमफील्डनें हा अर्थ संशय  प्रगट करून स्वीकारला आहे.