प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

विचार

 ब्रह्मविशेषणें (ॠग्वेद) / वेदान्त (ऋग्वेद ) /
ऋषि - ऋषिनामें (ऋग्वेद )

*ॠषि - या शब्दाची व्युत्पत्ति कठिण आहे.हा शब्द कदाचित अत्यंत पूर्वकालीन धातूपासून झाला असेल ॠषींचें मुख्य काम म्हणजे ईश्वरविषयक स्तोत्र तयार करणें. ॠग्वेदांत जुने आणि नवे अशा ॠषीचा उल्लेख आला आहे (अग्निः पूर्वेभिः ॠषिभिः ॠ. १.१,२) जुन्या ॠषींची स्तोत्र त्यांच्या कुलांतील लोक संरक्षण करीत असत व त्यांत भर घालीत असत. परंतु ॠषींचा मुख्य उद्योग म्हणजे स्तोत्रें करीत असणें हाच असे संहितीकरणकालापर्यंत ही स्तोत्ररचना सारखी चालू होती. उदाहरणार्थ गाथा. या गाथा आचार्य स्वतःच रचून पठण करीत असत.
असें ॠग्वेद (९,९६,६) व शतपथ ब्राह्मण (१२.४,४,६) यांवरून आढळतें. ब्राह्मणांमध्यें जे श्रेष्ठ असत त्यांनांच ॠषि ही पदवी दिली जात असे. व त्यांचें कौशल्य दैवी असे असें दर्शविलें आहे ॠषी बहुतेक राजे लोक यांच्या घरी पुरोहित या नात्यानें आश्रित म्हणून राहत असत. क्वचित् राजेलोकहि स्तोत्रकर्ते असल्याचे आढळतें. पंचविंश ब्राह्मणांत (१२,१२,६) स्तोत्रकर्त्या राजपुत्रांनां (ओल्डेनबर्गच्या मताप्रमाणें हा शब्द जरी काल्पनिक असला तरी) राजन्यर्षि अथवा राजर्षि हा शब्द लावीत. स्तोत्रकर्त्यामध्यें जरी कांही राजे असले तरी बहुतेक सूक्ते ब्रह्मणांनीच केलेली आहेत. ॠषी हे पवित्रभूत अशा कालचे प्रतिनिधि म्हणून मानिले जात व त्यांनां साधु असेंहि म्हणत यांचे सप्तर्षि असे समुच्चयात्मक नांव ॠग्वेदांत चरवेळ व अथर्ववेद आणि वाजसनेयि संहिता या ग्रंथांतून आढळते. या सात ॠषीचा बृहदारण्यकोपनिषदांत (२.२,४) अनुक्रमे उल्लेख असून तेथे दोन नेत्र, दोन कर्ण, दोन घ्राणद्रियें आणि सातवी वाणी याशी त्यांचा संबंध जोडला आहे हे सात ॠषि म्हणजे गोतम, भरद्वाज, विश्वमित्र, कश्यप, वसिष्ठ, जगदग्नि व अत्रि हे होत. उपनिषदांतील उता-यांत अत्रीचा संबंध त्या शब्दाच्या व्यप्तत्तीवरून वाणीशी जोडला आहे. ॠग्वेदांत वरील सात ॠषीशिवाय आणखी ब-याच ॠषीचा उल्लेख आहे व त्यांच्या संबंधी माहिती याच भागातील दाशराज्ञयुद्धप्रकरणात आली आहे. अथर्ववेदांतील  एकाच ॠचेंत (४.२९,३) सुमारें अठरा ॠषींची नांवे आलीं आहेत व तीं सर्व ॠग्वेदांत आलेल्यापैकीच आहेत. भाटचारण्यादिकांच्या काव्याप्रमाणें ॠषींच्या स्तोत्रांत चढाओढीनें कूटस्तोत्रांची रचना होत असे. ही कूट वाक्ये अथवा भाग (ब्रह्मोद्य) अश्वमेध ॠतूतील एक मुख्य अंग म्हणून गणला जात असे. अशा प्रकराच्या कूट वाक्यांच्या संबंधी चढाओढ अथवा वादविवाद उपनिषद्वाङ्मयांत जास्त आढळतो. असले वाद जिंकणारे ॠषी त्याचा मोबदला म्हणून राजाकडून दक्षिणा मिळवित असत. ॠग्वेद १०.८२.२ यांतील सप्तर्षि व शब्द आकाशातील ता-यांचा वाचक आहे असें पाश्चात्य पंडिताचें मत आहे. ते याला मोठें अस्वल असें म्हणतात. याला पूर्वी सप्तॠक्ष असें म्हणत असत. परंतु पुढे वारंवार सप्तॠषि असा शब्द आल्यामुळें सप्तकक्ष याचा सप्तर्षि असा अर्थ होऊं लागला असावा असें मॅकडोनेलचें म्हणणे आहे. ॠग्वेदांत आलेल्या वरील उता-यांतील सप्तॠषि याचा मोठें अस्वल असा सायणांनीं अर्थ केला नाहीं परंतु ॠ. १.२४, १० मधील ॠक्ष शब्दाचा ॠक्षाः सप्तर्षयः असा अर्थ केला आहे आणि त्याला ॠक्षइति हा स्मवै पुरा सतॠपीनचक्षो असा वाजसनेयि संहितेंतील आधार दिला आहे.

xमुनि- हा शब्द ॠग्वेदांत दोन ठिकाणीं आला आहे. तेथें त्याचा अर्थ ईश्वरप्रेरित व अद्भुत शक्ती असलेला असा आहे. पहिल्या मंत्रांत मुनि हा शब्द अनेकवचनी असून ते पिशंगवणीची व मळकट वस्त्रें वापरीत असें म्हटलें आहे. सायणमताप्रमाणें हे मुनि म्हणजे वातजूति, विप्रजूति वगैरे नांवांचे ॠषि होत व ते विरक्त असून वल्कलें परिधान करीत असत. वर जें मुनींचें वर्णन दिले आहे तें ऐतरेय ब्राह्मणांत ऐतशप्रलाप नामक मंत्रकांड पठण करणा-या ऐतश नामक मुनीशी सदृश आहे. तेथें हें मंत्रकांड पठण करीत असलेल्या आपल्या पित्यास भ्रम झाला आहे असें समजून त्याच्या मुलानें विसंगत अशा प्रकारचें तें मंत्रकांड पठण बंद केलें. परंतु हें त्याचें करणें बरोबर नव्हतें. कारण ऐतश भ्रमिष्ट होऊन कांही तरी प्रलाप काढीत होता असे नसून तें मंत्रकांडच तसें होतें. वर ॠग्वेदांतील मुनि व ऐतशमुनि यांचे मॅकडोनेलनें दाखविलेलें साम्य सायणसंमत नाहीं. ॠग्वेदांत एका मंत्रात इंद्राला मुनीचा सखा असें म्हटलें आहे. अथर्ववेदांत (८.६,१७) मुनि शब्द सामासिक शब्दांत आला असून त्याचा वरीलप्रमाणेंच सायणांनीं अर्थ दिला आहे. उपनिषदग्रंथांत मुनि हे अधिक निग्रही असत असे दाखविले आहे. जो अभ्यासानें, यज्ञानें, तपाने, श्रध्देनें अथवा व्रतनियमांच्या योगानें पूर्णब्रह्माचें स्वरूप ओळखण्यास शिकतो अथवा ओळखतो त्याला मुनि असे म्हणत. वेदांतील मुनी व उपनिषदांतील मुनि यांच्यात फारसा भेद आहे असें म्हणता येणार नाहीं. दोहींमध्यें मुनि हे ब्रह्मानिदांत निमग्न असत असेच वर्णिले आहे. तरी पण वेदांतील मुनीपेक्षा उपनिषदांतील मुनींच्या ऐहिक आकांक्षा अगदीच कमी असत असें दिसतें. वेदवाङ्मयांतील मुनीच अध्यात्मज्ञानाकडे विशेष ओढ नसून ते वैद्यकी करीत असत. वेदग्रंथांत मुनीचा विशेषसा उल्लेख नाहीं. म्हणून त्या कलीमुनि कमी असत असें म्हणतां येत नाहीं. श्रौत धर्माचरण कणा-या कर्मठ लोकांनां या मुनींना फारसा मान दिलेला नाहीं. मुनीच्या व कर्मठांच्या ध्येयांत फरक होता. केवल सतति अथवा संपत्ति मिळविणें या कर्मठांच्या ध्येयापेक्षां मुनीचें ध्येय श्रेष्ठ प्रकारचें होतें.

अरुणऔपवेशिगौतम- हें एका आध्यापकाचें नांव आहे. तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण ग्रंथ यांत याचा वारंवार उल्लेख आला आहे. प्रसिद्ध उद्दालक आरुणि हा याचा मुलगा होय. हा उपवेशि गौतम याचा शिष्य व राजपुत्र अश्वपेतीच्या गुरुचा समकालीन असल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१०.६,१,२) उल्लेख आहे.
आट्णार- पर याचा वंशज. यानें अग्निचयन केल्यामुळें याला संतति प्राप्त झाल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत उल्लेख आहे.
कुसुरुबिन्द्र औद्दालकि- यानें आपणास पशूंचा लाभ व्हावा म्हणून एक यज्ञ केल्याबद्दलचा तैत्तिरीय संहितेंत उल्लेख आहे. याचा आणखी उल्लेख  जैमिनीय (१.७,५) व पंचविशंब्राह्मणांत (२२.१५. १०) आला आहे.
केशिन- सात्यकामि- यानें केशिन् दार्भ्य याला शत्रूंचा नाश होण्यासाठीं आपल्या यज्ञांत एका विशिष्ट मंत्राची भर घालण्यास सांगितल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत (२.६,२,३) उल्लेख आहे.
कौसुरबिंदि-प्रोतिकौशंबेय- हा उद्दालकाचा शिष्य व समकालीन असल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत (१२.२,२,३) उल्लेख असून तैत्तिरीय संहितेंत याला औद्दालकि म्हटलें आहे. या गोष्टीवरून अशा पितृवंशिक नांवांना फार थोडे महत्त्व दिलें पाहिजे हें उघड दिसतें. शिवाय अमुक मनुष्य अमक्याचा समकालीन होता या गोष्टीला सुद्धां विशेष महत्त्व देऊन चालावयाचें नाहीं. (असें मॅकडोनेल म्हणतो)
ॠतुजिज्जानकि - डोळे अधू असलेल्या रजनकौणेय याची दृष्टी साफ होण्याकरितां ॠतुजिज्जानकि यानें रजनकौणेय याजकडून एक त्रिहविष्का नामक दृष्टि करविल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत (२,३,८,१) उल्लेख आहे.
चैत्रियायण- हा यज्ञसेनाचा वंशज असून यानें छंदोभिद्  नामक इष्टकांच्या चितीच्या साधनानें पशूंची प्राप्ति करून घेतल्याबद्दल तैत्तिरीय संहितेंत (५.३,८,१) उल्लेख आहे.
जानकि- जनकाचा वंशज. हें तैत्तिरीय संहितेंत क्रतुजिताचें, ऐतरेय ब्राह्मणांत ॠतुविदाचें आणि बृहदारण्यकोपनिषदांत अयस्थूणाचें पितृप्राप्त नांव आहे. बृहदारण्यकोपनिषदांत याला चूलभागवित्तीचा शिष्य व सत्यकाम जाबालाचा गुरू असें म्हटले आहे. वरील सर्व स्थली उल्लेखिलेला जानकि एकच किंवा अनेक व्यक्ती याबद्दल खात्री नाहीं.
जामदग्निय- तैत्तिरीय संहितेंत जमदग्नीच्या दोन वंशजाचें म्हणून हें नांव आले आहे. जमदग्नीनें चतूरात्र नामक एक यज्ञ केल्यामुळे पुढें त्याच्या पिढींत दरिद्री निपजला नाहीं व एकदा प्रमादानें दरिद्रि झालाच तर लगेच दुस-याच पिढींत त्याचें दारिद्र्य नष्ट होत असे असा तेथें (तै.सं. ७.१,९,१) उल्लेख आहे.
१०पुलस्तिन् - हा शब्द तैत्तिरीय संहितेंत आला असून याचा अर्थ मोकळे केश ठेवणारा असा होतो व तो कपर्दिन् म्हणजे डोक्यावरील केसांच्या जटा बांधणें याच्या उलट आहे. वरील अर्थ सायणसंमत नाहीं.
११प्रयोग- तैत्तिरीय संहितेंत एक सूक्तांचा द्रष्टा म्हणून याचा उल्लेख आहे. ॠग्वेदाच्या सर्वानुक्रमणिकेप्रमाणें हा तैत्तिरीयांत उल्लेखिलेल्या ॠचांचा (ॠ. ८.१००) द्रष्टा आहे.
१२बंबाविश्वावयसौ - या समासग्रथित अशा नांवाच्या ॠषीचा तैत्तिरीय संहितेंत उल्लेख आहे. यांनीं एका विशिष्ट देवतेला सोमरस अर्पण करण्याचा नवा संप्रदाय सुरू केला.
१३शण्ड- हा शब्द मर्क या शब्दाशीं जोडलेला आढळतो. यजुर्वेद संहितेंत यांचा उल्लेख असून शण्ड व मर्क हे दोघे असुरांचे पुरोहित होते असें म्हटलें आहे.
१४शौचेयसार्वसेनि- तैत्तिरीय संहितेंत हें एक पैतृक नांव आहे. सायणमतानें शुचा ही स्त्रीं असून शौचेय हें मातृक नांव आहे. यानें पंचरात्र नांवाचा एक यज्ञ करून पशूंची प्राप्ति करून घेतली.
१५श्रायस - याचा उल्लेख तैत्तिरीय संहितेंत दोन ठिकाणीं आला आहे. एका ठिकाणीं (५.४,७,५) हें कण्वाचें पैतृक नांव आहे असें म्हटलें आहे व दुस-या ठिकाणीं (५.६,५,३) हें वीतहव्याचें पैतृक नांव असें म्हटलें आहे. वरील दोन ठिकाणीं उल्लेखिलेला श्रायस हा एकच असेल असें म्हणतां येत नाहीं. कारण त्याचा दोन्ही ठिकाणी निरनिराळया प्रकारानें व निरनिराळया निमित्तानें उल्लेख आहे.
१६संश्रवस्-सौवर्चनस्- तैत्तिरीय संहितेंत याचा उल्लेख आहे. सत्रांतील होत्यानें करावयाच्या इडोपाव्हानासंबंधीं तुमिंज नामक एका ॠषीशीं याचा संवाद झाल्याबद्दल उल्लेख आहे.
१७सनातन- चितिसंबंधानें इष्टकांचें उपधानप्रसंगी पूर्वादि दिशांची स्तुति करतांना पूर्वादि दिशांच्या ठिकाणीं अनुक्रमें सानग,सनातन, अहंभूत, प्रत्न आणि सुपर्ण या ॠषींचा उल्लेख आला आहे. बृहदारण्यकोपनिषदांत सनग व सनारु यांचा गुरुशिष्यसंबंध आला आहे. (बृ.उं. २.५,२२).
१८सात्यहव्य- याचा तैत्तिरीय संहितेंत बहुयाजक सृंजयांनीं समिष्टयजु नामक मंत्र कोणत्या प्रकारें पठण करावा या विषयीं देवभाग नामक ॠषीला प्रश्न केल्याबद्दल उल्लेख आला आहे. ऐतरेय ब्राह्मणांतहि याचा उल्लेख आहे. याला वासिष्ठ असें म्हटलें आहे.
१९हविष्कृत् हविष्मत्- आंगिरस नामक कांही ॠषींनीं यज्ञानुष्ठानाच्या योगानें  स्वर्गप्राप्ति करून घेतली. परंतु त्यांच्यापैकी हविष्कृत्  व हविष्मत् नांवाचे दोघे स्वर्गातून च्युत झाले. तथापि स्वर्गप्राप्तीसंबंधी त्यांची अत्यंत उत्कट इच्छा असल्यामुळें द्विरात्र नांवाचा यज्ञ करून त्यांनी स्वर्ग मिळविला.
२०अगस्ति- ॠग्वेदांत येणा-या अगस्त्य या शब्दाचेंच हें दुसरें रूप असावें. याचा अथर्ववेदांत उल्लेख आला आहे. ॠग्वेदांत याला मित्रावरुणांचा  मुलगा म्हटलें असून अथर्ववेदांत याला मित्रावरुणांचा अत्यंत आवडता असें म्हटलें आहे. मरुतांनां उद्देशून उपाकरण केलेला यज्ञीय पशु ज्या वेळीं इद्रानें पळविला तेव्हां मरुत्  हे वज्र घेऊन इंद्राला मारण्यासाठी उद्युक्त झाले असतां अगस्त्यानें त्यांचें शांतवन करून इंद्राचें व मरुतांचें सख्य घडवून आणिलें अशी जी कथा तै.सं. (७.५,५,२), तै. ब्राह्मण (२.७,११,१) मैं. संहिता (२.१,८) काठक संहिता (१०.११), पंचविंश ब्राह्मण (२१.१४,५), ऐ. ब्रा.  (५.१६) या ग्रंथांतून आली आहे तिचें मूळ ॠग्वेद १.१६५, १७०,१७१ या सूक्तांतून आहे. ओल्डेंनबर्ग, सीज, हर्टेल व्हानश्राडर यांचे अगस्त्याच्या वरील कथेसंबंधी एकमत नाहीं. ॠग्वेदांत (१.१७९) लोपामद्रेबरोबर याचें जें संभोगाविषयक संभाषण झालें आहे त्यांत हा ज्ञानी असूनहि तिच्या प्रेमयाचनेस वश झाला असें म्हटलें आहे. व्हानश्रोडर याचें असें मत आहे कीं, हें वृषोद्भवविषयक रूपक असावें. सायणमतानें अगस्त्य हा खेल नामक राजाचा पुरोहित होता, परंतु पिशेल म्हणतो कीं, खल ही विवस्वत् देवता होय. अगस्त्याच्या बाबतींत सीजचें मत सायणाप्रमाणेंच आहे. तो वसिष्ठाचा भाऊ असून तृत्सूंनां वसिष्ठाची ओळख करून देतो असें अनुमान ॠग्वेद ७.३६,१०;१३ या ॠचांवरून निघतें असें गेल्डनेर म्हणतो.