प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

वर्णाश्रम (ॠग्वेद)

वर्णाश्रम (ॠग्वेद)
 क्षत्रिय  ब्रह्मचारी  विश्
 द्विज  ब्राह्मण  वैश्य
 धियायु (बुद्धिजीवि)  यति

पुढील क्षत्रिय, ब्राह्मण, विश्, वैश्य व शुद्र यासंबंधी माहिती अन्यत्र आली असल्यामुळें त्या शब्दावर येथें टीपा दिल्या नाहींत.

यति
- एका प्राचीन घराण्याचें नांव. यांचा ॠग्वेदांतील दोन उता-यांत (९.३,९;१०.२७,७) भृगूशीं संबंध जोडला आहे. पहिल्या उता-यांत ते कोणीतरी लोक असावेत असें स्पष्ट होतें. दुस-या उता-यांत निश्चयानें कांही सांगता येत नाहीं. यजुर्वेदसंहितेंत आणि पुढील ग्रंथांत ‘आपत्काली इंद्रानें सालावृकांच्या स्वाधीन केलेली एक जात’ असा उल्लेख आहे. सामवेदांतहि यतीचा भृगूबरोबर उल्लेख आला आहे. धर्मसूत्रें व पुढील वाङ्मयांत आश्रमचतुष्टयापैकी जो चतुर्थाश्रम(संन्यास) याला यति हें नांव दिल्याचें आढळतें.