प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
राजविशेष [ ऋग्वेद ] |
१उदन्कशौल्बायन -- प्राण आणि ब्रह्म एकच आहेत असें याचें विचार असल्याबद्दल बृहदारण्यक उपनिषदांत (४. १, ३.) वर्णन आलें आहें. तो विदेह देशाच्या जनकराजाचा समकालीन असावा असें वाटतें. तैत्तिरीय संहितेंत [ ७. ५, ४, २ ] सत्रांतील दशरात्रकतु हाच मुख्य भाग आहें असें त्याचें मत होतें असा उल्लेख आहें. उदंक हें नांव आहे व शौल्बायन हें पैतुक नांव आहें.
२केशिन्दार्भ्य अथवा दाल्भ्य -- 'दर्भाचा वंशज'. शतपथ ब्राम्हणांप्रमाणें तो राजा होता व जैमिनीय उपनिषदब्राह्मणाप्रमाणें तो उचै:श्रवस् याच्या बहिणीचा मुलगा होता. पांचाल हे त्याचें प्रजाजन होतें. म्हणून केशिन् ही त्यांचीच एकशाखा असावी, आणि त्यांचे तीन वर्ग ( व्यानीक ) होतें असें म्हणतात. धार्मिक विधीचें बाबतींत त्याचें षाण्डीक याच्याशीं पटत नव्हतें अशीं एक कथा मैत्रायणी संहितेंत आहे; हीच गोष्ट शतपथ ब्राह्मणांत दुस-या शब्दांत दिली आहे व मैत्रायणी आणि तैत्तिरीय संहिता यावरून केशिन् हा सात्यकामि याचा समकालीन होता असें वाटतें. पंचविश ब्राम्हणाप्रमाणें एक साम अथवा एक गीताचा हा द्रष्टा आहे असें दिसतें; व हें गीत याला सुवर्ण पक्ष्यानें कसें शिकवलें याचा कौषीतकि ब्राह्मणांत उल्लेख आहें. जुनें वाङमय दार्भ्य हा ऋषि आहे असें मानितें आणि म्हणून शतपथ ब्राह्मणावरील टीकेंत तो राजा असल्याबद्दलचा व त्याच्या प्रजेचा जो उल्लेख आला आहें. तो कितपत खरा मानावा याबद्दल शंका उत्पन्न होतें. कारण, तो ऋषि असावा हाच अर्थ चांगला लागू पडतो. शिवाय जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांवरहि जास्त भरंवसा ठेवतां येत नाही. काठक संहितेंत केशिन् लोक असा जो उल्लेख आहे तो राज्यपद दर्शवितो असें उत्तरकालीन ग्रंथकार ( जै. उ. ब्रा. ) गृहित धरून चालतात. परंतु तें अयोग्य आहें.
३परआट्णार -- ऋग्वेदोत्तर संहिताग्रंथ व ब्राह्मण ग्रंथ यामध्यें एक विशिष्ट यज्ञ करून पुत्र मिळविणा-या पूर्वीच्या महान् राजांपैकी हा एक होय असा उल्लेख आहें. शतपथ ब्राह्मणांत हैरण्यनाभ व शांखायन श्रौतसूत्रांत 'परआट्णार वैदेह अशीं नांवे दिलेली आहेत. त्यावरून कोसल व विदेह यांचा निकट संबंध असल्याचें सिद्ध होतें. त्याच सूत्रांत उल्लेखिलेल्या यज्ञगाथेंत हिरण्यनाभ कौसल्य याचा उल्लेख 'परा' संबंधानें आलेला आहें. 'पर ' हें विशेष नाम असून 'आट्णार' हें पैतृक नांव आहें. हा ऋषि आहे असे सायणाचार्य म्हणतात. ४भालंदन -- भलंदनाचा वंशज. पंचविश ब्राह्मण आणि काठक व तैत्तिरीय संहिता यांत आलेल्या वत्सप्रीचें हें पैतृक नांव आहें. हा ऋग्वेदांतील एका सूक्तांचा द्रष्टा आहें.
५परिक्षित -- अथर्ववेदांमध्यें एका राजाचें हें नांव आलेलें आहें. याच्या म्हणजे कुरूंच्या राज्यांत सुबत्ता व शांतता यांचे साम्राज्य होतें. ज्या ऋचांतून यांचे गुणवर्णन आलेंलें आहे, त्या ऋचांना मागाहून 'पारिक्षित्य:' असें नांव पडलें. अग्नि मनुष्यांत राहतो म्हणून ब्राह्मण ग्रंथांत त्याला परिक्षित असें नांव दिलेंलें आहें. याच कारणास्तव या नांवाचा मानवी राजा झालाच नाहीं असें रॉथ व ब्लूमफील्ड यांचे जें मत तें कदाचित बरोबर असूं शकेल. पण निश्चित असें कांहीच सांगतां येत नाही. झिमर व ओल्डनबर्ग हें दोघेहि हा राजा होता हें कबूल करतात व या गोष्टीला आधार म्हणजे उत्तरकालीन वैदिक ग्रंथात जनमेजय राजा पारिक्षित हे पैतृक नांव धारण करतो ही गोष्ट होय. हें जर खरें असेल तर परिक्षित मागाहून झाला असावा. कारण, ज्या अथर्ववेदाच्या लेखांत त्याचें नांव आलेंलें आहे तो खात्रीनें मागाहून लिहिला गेला असावा. इतर कोणत्याहि संहिता ग्रंथांत हा शब्द आलेला नाहीं. महाभारतामध्यें या परिक्षिताला प्रतिश्रवस् याचा आजा व प्रतीपाचा पणजा असें म्हटलें आहे व झिमर अथर्ववेदांतल्या दुस-या एका मागाहूनच्या लेखांत आलेल्या प्रातिसुत्वन् व प्रतीप यांच्याशी यांची तुलना करतो व हें त्यांचे करणें बरोबर दिसतें. पण देवापि व शंतनु यांचा प्रतीपाशी संबध जुळविणें शक्य नाहीं.
६दिवोदास भैमसेनी -- भीमसेनाचा वंशज. हा शब्द काठक संहितेंमध्यें आरूषीचा समकालीन म्हणून आलेला आहें.
७अंगवैरोचन -- ऐतरय ब्राह्मणांत अभिपिक्त राजांच्या यादीत याचा उल्लेख आहें. याचा उदमय आत्रेय या नांवाचा पुरोहित होता.
८अजातशत्रु -- हा काशीचा राजा काश्य असून बालाकी नामक एका अभिमानी ब्राह्मणाला आत्मविद्येचें मूलतत्व शिकवीत असें असें बृहदारण्यक व कौषीतकि उपनिषदांत वर्णन आहें. बौद्धधर्मीय पुस्तकांतील अजातशत्रु आणि हा एकच असें मानतां येत नाहीं.
९अत्यरातिजानंतपि -- हा राजा नसतांना वसिष्ठ सात्यहव्यानें याजकडून राजसूय यज्ञ करविला व त्यामुळें तो सर्व पृथ्वी जिंकण्यास समर्थ झाला. वसिष्ठ सात्यहव्यानें जेव्हां पौरोहित्याची आठवण देऊन त्याबद्दल बक्षीस मागितलें तेव्हां उत्तरकुरूंना जिंकल्यावर सर्व पृथ्वीचें राज्य आपणांस देऊन मी आपला सेनापति होईन असें त्यानें रागानें उत्तर दिलें. यावर अत्यराति म्हणालां तूं मला फसविलेंस. कारण उत्तरकुंरूनां जिंकणें मनुष्याच्या स्वाधीन नाहीं. नंतर सात्यहव्यानें आपल्या तप:सामर्थ्यानें अत्यरातीचें सामर्थ्य काढून घेऊन त्याला हतबल केलें आणि शिबिराजाचा मुलगा अमित्रतपन शुष्मिन् याजकडून त्याचा वध केला. ( ऐ. ब्रा. ८. २३)
१०अपाच्य -- नीच्य आणि अपाच्य ही पश्चिम दिशेच्या लोकांची नांवे आहेंत असा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहें.
११अभिप्रतारिनकाक्षसेनि -- जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण, छांदोग्य उपनिशषद व पंचविश ब्राह्मण यांत हा तत्वज्ञान विवादांत निमग्न असें असा उल्लेख आहे हा कुरूवंशांतील एक राजपुत्र होता व तो जिवंत असतांच त्याच्या मुलांनी त्याची मालमत्ता वाटून घेतली असा जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत उल्लेख आहें.
१२अमित्रतपनशुष्मिन् शैब्य -- शिबीचा मुलगा यानें अत्यराति जानंतपिचा वध केल्याचा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहें. अमित्रतपन हें शत्रुतापन या अर्थी विशेषण आहें.
१३अश्वपति -- हा केकय देशाचा राजा असून यानें प्राचीनसाल यास व दुस-या कांही ब्राह्मणांनां शिक्षण दिल्याबद्दल छांदोग्य उपनिषद् व शतपथ ब्राह्मण या ग्रंथांत उल्लेख आहें.
१४असमातिराथप्रोष्ठ -- जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत रथप्रोष्ठ कुलांतील इक्ष्वाकु राजा असमाति आणि त्याचे उपाध्याय गौपायन यांच्या भांडणाची गोष्ट आढळतें. ही आख्यायिका ऋग्वेदांतील एका उल्लेखावरून आली असावी. परंतु तेथें असमाति हें फक्त विशेषण आहें. नंतरची गोष्ट अशी आहे की, किरात आणि आकुलि या दोन असुरांनी कुलोपाध्यायास सोडून देण्याबद्दल राजांचे मन वळविलें आणि त्यांच्यापैकी सुबंधूचा वध करविला. परंतु त्याच्या भावांनी त्याला ऋग्वेदांतील १०.६० या सूक्ताच्या जपानें जिवंत केलें असा पंचविश ब्राह्मण व बह्द्देवता या ग्रंथांत उल्लेख आहें.
१५आंबाष्ट्य -- ऐतरेय ब्राह्मणांत या राजाच्या राजसूय यज्ञात नारद पुरोहित होता असा उल्लेख आहें. सेंट पीटर्स बर्ग कोशाच्या भाषांतराप्रमाणें हें 'आंबष्ट यांचा राजा' असें स्थानिक नांव असावें. नंतर 'आंबष्ट' म्हणजे ब्राह्मण जातीचा पुरूष आणि वैश्य जातीची स्त्री यांच्या पासून होणारी संतति असा अर्थ रूढ झाला.
१६इंद्रद्युम्नभाल्लवेयवैयाघ्रपद्य -- अग्निवैश्वानराचें धर्म काय आहेत या बाबतींत इतर पुरोहितांबरोबर याचें मतैक्य होत नसे. याला अश्वपति कैकेय यानें विद्या शिकविली होती. शतपथ ब्राह्मणांत याचा भाल्लवेय या नावानें धार्मिक विधींत ब-याच वेळा उल्लेख आला आहें.
१७इंद्रोतदैवाप शौनक -- यानें जनमेजयाच्या अश्वमेध यज्ञांत पौरोहित्य केल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणांत जनमेजयाचा पुरोहित तुर:कावषेय हा होता असा उल्लेख आहे. जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांत हा श्रुत याचा शिष्य होता असा उल्लेख असून वंश ब्राह्मणांतहि याचा उल्लेख आला आहे. ऋग्वेदांतील देवापाचा व याचा काहीं संबंध नाहीं.
१८उग्रसेन -- शतपथ ब्राह्मण आणि गाथा यामध्यें हा भीमसेन, श्रुतसेन व जनमेजय यांचा भाऊ असल्याबद्दल उल्लेख आहे आणि अश्वमेध यज्ञ केल्यामुळें याची पापापासून मुक्तता झाल्याचाहि उल्लेख आहें.
१९उचै:श्रवसकौपयेय -- हा कुरूंचा राजा आणि केशिन् याचा मामा असल्याबद्दल जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत उल्लेख आहे. उपमश्रवस् हा कुरूश्रवणाचा मुलगा होता आणि ही नावें सारखी दिसतात म्हणून याचा कुरूंशीं संबंध असावा असें दिसतें.
२०ऋतुपर्ण -- बौधायन श्रौतसूत्रांतील ब्राह्मण ग्रंथासारख्या उता-यावरून हा भंगाश्विन् याचा मुलगा आणि 'शफाल, चा राजा असावा असें वाटतें. आपस्तंब श्रौतसूत्रांत 'ऋतुपर्ण कयोवधि भंग्याश्विनौ' असा उल्लेख आहें.
२१ऋषभ -- हा याज्ञतुर याचा आनुवंशिक व श्विक्लसचा राजा असून, अश्वमेध करणारापैकी एक होता असा शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आला आहे. शतपथ ब्राह्मणांत गौरिवीति याच्या नांवावर जी गाथा आहे तिचा हाच बहूतेक जनक असावा आ त्या ग्रंथांत उल्लेख आहें.
२२एकादशाक्षमानुतंतव्य -- सुर्योदयाबरोबर होम करणा-या ( उदित होमी ) राजांचें हें नांव आहें असा ऐतरेय ब्राह्मणांत उल्लेख आहे. हा नगरिन् जानश्रुतेय याच्या समकालीं होता.
२३ऐक्ष्वाक -- इक्ष्वाकूचा वंशज. शतपथ ब्राह्मणाप्रमाणें पुरूकुत्स यांनें हें आनुवंशिक नांव धारण केंलें होतें. दुसरा ऐक्ष्वाक वार्ष्णि हा असून तो अध्यापक होता असा जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत उल्लेख आहें. राजा हरिश्चंद्र हा वैधस ऐक्ष्वाक असल्याचा ऐतरेय ब्राह्मणांत व त्र्यरूण हा ऐक्ष्वाक असल्याचा पंचविश ब्राह्मणांत उल्लेख आहें.
२४औग्रसैन्य -- ऐतरेय ब्राह्मणांत राजा बुधांश्रौष्टि याचें हें पैतृक नांव आहें.
२५औपतस्विनि -- शतपथ ब्राह्मणामध्यें राम याचें हें पैतृक नांव आहें.
२६कामप्रि -- ऐतरेय ब्राह्मणांत मरूत याचें हें पैतृक नांव आहे. सेंट पीटर्स बर्ग कोशांत असें सुचविलें आहे की तो पाठ 'काम प्रे' 'इच्छा पूर्ण करणारा' असा पाहिजें. सायणाचार्य काम प्रि हें मरूत यांचें विशेषण आहे असें भाष्यांत म्हणतात.
२७ काशि, काश्य -- काशि ( अनेकवचनांत ) म्हणजें काशीचें लोक आणि काश्य म्हणजे काशीचा राजा. धृतराष्ट्र हा शतानींक सात्राजिताकडून पराभूत झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की, पुन्हां ब्राह्मणांचे वर्चस्व होईपर्यंत काशी लोकांनी यज्ञ करावयाचें बंद ठेविलें असें शतपथ ब्राह्मणांत ( १३.५, ४, ९ ) म्हटलें आहें. सात्रजित हा भरत होता. अजातशत्रु हा काशीचा राजा होता असाहि उल्लेख आढळतो आणि उद्दालक याचा समकालीन भद्रसेन अजातशत्रह हाहि काशीचा राजा होता. काशि आणि विदेह हे जवळचें नातेवाईक होत. कारण भूगोलद्दया त्यांची जागा किंवा स्थान यांचा विचार केल्यास तसें होणें स्वाभाविक होतें. कौषीतकि उपनिषदांत 'काशि -- विदेह' हें सामासिक नांव आलें आहें. बृहदारण्यकोपनिषदांत गार्गी म्हणते कीं अजातशत्रु हा काशि किंवा विदेहचा राजा असावा. शांखायन सूत्रांत काशि कोसल आणि विदेह यांचा एकच पुरोहित होता असा उल्लेख आहें. बौधायन श्रौत सूत्रांत काशि आणि विदेह हे अगदी नजीक आहेत असें म्हटलें आहें. वेबर म्हणतों कीं. काशि आणि विदेह हे दोन्ही मिळून उशीनर होतात आणि हें नांव वैदिक वाङमयांत फारच क्वचित आलें आहें. ज्याप्रमाणें कोसल आणि विदेह यांचा निकट संबंध होता त्याप्रमाणें गोपथ ब्राह्मणांत काशि आणि कोसल हे काशि -- कौसल्य या सामासिक नांवात गोविले आहेत. काशि हें नांव जरी जूनें नसलें तरीं तें शहर मात्र जुनें आहें. कारण अथर्ववेदांतील वरणावती नदीचा वाराणषी ( काशि ) शी संबंध असावा. हें स्पष्टच आहे की, जर काशि-कोसल आणि विदेह हे एक होते तर त्यांचा कुरूपंचालांशी काहीतरीं वैरभाव संबंध असावा. या दोन मोठया राष्ट्रांत त्यावेळी राजकीय वैरभाव व त्याचप्रमाणें संस्कृतीमध्यें थोडयाफार प्रामाणांत भिन्नता होती हें अनुमान योग्य दिसतें. कोसल आणि विदेह या राष्ट्रांतील आर्य सुधारणेच्या प्रगतीच्या स्थितीबद्दल शतपथ ब्राह्मणांत या वेळची स्पष्ट दंतकथा सापडतें आणि ती ब्राह्मण संस्कृतीचें खरें केंद्रस्थान कुरूपंचाल देश होता याबद्दल एक आधार आहें. भूगोलदृष्ट्या स्थलावरून विचार केला असतां कोसल व विदेह हें कुरूपंचालांच्या अगोदरचे रहिवासी होतें, तरी ब्राह्मण संस्कृति त्यांनां कुरूपंचालांच्या कडूनच मिळाली. पश्चिमेपेक्षां पूर्वभाग जरा कमी संस्कृत होता हें संभवतें; आणि तो भाग ब्राह्मणांच्या धार्मिक वर्चस्वाच्या कमी आधीन होता कारण बुध्दाची चळवळ प्राच्य होती व बुद्धग्रंथात क्षत्रिय वरच्या पायरीचे होते असा उल्लेख आहें. मगधदेशांतील लोक कमी धार्मिक होते म्हणून त्यांनां वैरभावानें वागविलें जात असें. ही गोष्ट वरील विधानास पुष्टि देते, आणि ती वाजसनेयि संहितेंत आहेहि. कोसल, विदेह आणि काशि या खरोखर मागाहून माहित झालेल्या कुरू पंचालांच्याच शाखा असाव्या हें संभवतें; आणि त्यांच्यातील अंतर व मुळच्या रहिवाश्यावर ढिला ताबा यामुळें त्यांनी आपली ब्राह्मणसंस्कृति गमाविली. शतपथ ब्राह्मणांतील आर्यांच्या देशांतरासंबंधी दंतकथेचा शब्दश: भाषांतरानें वरील प्रमेयास जरी दुजोरा मिळाला तरी तें प्रमेय तितकें जोरदार नाहीं.