प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

रथ व रथसंबंधी (ॠग्वेद)

 रथ व रथसंबंधी (ॠग्वेद) / रथावयव ( ऋग्वेद)

अनस् - जरी एकदां रथामध्यें न बसतां गाडीमध्यें आरूढ असें वर्णन आहे. (येथें ‘अनर्विश’ हें विशेषण इन्द्राला लावावें की नाहीं अशी शंका येते. सायणभाष्यांत स्पष्ट कांहीं दिलें नाही.) तथापि अनस् हा शब्द रथ आणि मालाची गाडी यांच्यामध्यें फरक दाखविण्याकरितां योजिलेला असतो जरी उषादेवी कधीं कधीं रथावर आरूढ होते तथापि तिचें सुख्य वहान गाडी हेच होय. (हा अर्थ सायणाचार्यांनां संमत नाहीं) त्याची रचना फारशी माहीत नाहीं. ॠग्वेदांतील ज्या सूक्तांत सूर्याच्या सूर्या नांवाच्या मुलीच्या विवाहाचें वर्णन केलें आहे त्यांत तिला ज्या गाडींत बसविलें होतें त्या गाडीला एक आच्छादन होतें असें वर्णन आहे. रथाच्या तुंब्याचें देखील वर्णन आहे. रस्ते वाईट असल्यास विपथ नांवाच्या ओबडधोबड वाहनाचा उपयोग होत असे. विवाह वगैरे समारंभामध्यें ज्या मिरवणुकी निघत असत त्यांत गाडया ओढण्याकडें बैलांचा उपयोग होई. उषेची गाडी तांबूल बैल अगर गाई ओढीत असें वर्णन आहे.
गर्त- ॠग्वेदांत प्रथमतः याचा अर्थ योध्याची रथांतील बसण्याची जागा असा आहे. ती बरीच मोठी असे. तदनंतर लक्षणेनें किंवा खरोखर त्या शब्दाचा रथ असा अर्थ होऊं लागला (सायणभाष्याप्रमाणें याचा रथ असाच अर्थ आहे).
यान- ॠग्वेदांत व तदनंतर वाहन या अर्थी हा शब्द आलेला आहे.
रथ- ॠग्वेदांत आणि नंतरच्या ग्रंथांत अनस् गाडीपेक्षां निराळया (रथ या) अर्थी हा शब्द आला आहे. तरी पण फरक विशेष नाहीं. दोहोंच्या रचनेमधल्या फरकाविषयीं आपणांस माहिती नाहीं. रथचक्राचें कणा घालण्याचें भोंक गाडीच्या भोंकापेक्षां मोठें असें येवढीच माहिती मिळते. रथाला बहुतेककरून दोन चाकें असत व त्याविषयीं उल्लेख वारंवार आलेला आहे. चाकाची रचना म्हणजे त्याला एक धाव असून त्यास एक पाटा (प्रधि), अरे आणि तुंबा हीं असत. पाटा आणखी वर्तुळ मिळून नेमि होते. तुंब्यामधील भोंकाला ख हें नांव आहे; या ख मध्येंच कणा घाला वयाचा. आणीचा अर्थ तुंब्यांत घातलेलें कण्याचें टोंक किंवा चाकामध्यें टोंक नीट बसण्याकरितां घातलेली कुणी असा आहे. कधीं कधीं जाड चाकाचा उपयोग केला जाई. अथर्ववेदांत (५.१४.६;) केव्हा केव्हा अरटु लांकडाचे कणे करीत असत असा उल्लेख आहे. (सायणभाष्याप्रमाणें अरट् हा एक राजा होता) याच्या टोकांभोवती चाकें फिरत. कण्यावर रथाचा मुख्य भाग ( कोश) ठेवीत. ह्या भागाला वंधुर हाहि शब्द आहे. परंतु त्याचा अर्थ रथामधील बैठक असाहि होतो. आश्विनांच्या रथाविषयीं त्रिवंधुर हें नांव वापरलें आहे. त्रिवंधुराचें आणि त्रिचक्राचें बरेंच साम्य आहे. वेबरच्या मतें रथाला तीन चाकें आणि तीन बैठकी असत परंतु झिमरच्या मतें अशा प्रकारचे वाहन केवळ काल्पनिक होय. गर्ता या शब्दानेंहि योद्ध्याच्या आसनाचाच अर्थ सूचित होतो. रथाचा दांडा कण्याशीं काटकोनांत असे. साधारणतः एकच दांडा असे व त्याच्या दोन्ही बाजूंला घोडे जुंपीत व घोडयांच्या मानेवर जूं ठेवीत. जुंवाच्या मधील भोंकांत दांडा बसविला जात असे व त्यालाच ख किंवा तर्दमन् असें म्हणत. नंतर जूं आणि दांडा एकत्र बांधीत असत. जूं घोडयाच्या मानेवर ठेवीत आणि नंतर त्यांनां बांधीत. पट्टयांचा उल्लेख रश्मि आणि रशना या दोन शब्दांनीं होत असे. हे शब्द घोडयाच्या लगामालाहि लावीत. सारथी लगामाच्या योगानें घोडयांनां आंवरून धरी. चाबकाच्या सहाय्यानें त्यांनां हांकीत असे. घोडयाच्या तंगांनां कक्ष्या असें म्हणत. नेहमीची पद्धत म्हणजे साधारणपणें रथास दोन घोडे असत. पण कधीं कधीं तीन किंवा चारहि असत. तीन असल्यास तिसरा घोडा पुढें लावीत किंवा बाजूला लावीत याविषयी माहिती नाहीं. परंतु बहुधा दोनहि पद्धती अमंलात असाव्यात. पांच घोडयांचा सुद्धां उपयोग करीत. रथांनां बहुतेक घोडे जुंपीत तरी पण गाढवांचा आणि खेचरांचा उपयोग केलेलाहि आढळतो. गाडया ओढण्यास बैलांचा उपयोग करीत व म्हणूनच अनद्वाह हा शब्द प्रचारांत आला. कधीं गरीब लोकांना एका घोडयावरच संतुष्ट रहावें लागे. अशा वेळीं घोडयांच्या दोन्हीकडे दोन दोन दांडया असलेल्या जुवाचा उपयोग करीत (ॠ. १०.१०१,११;१३१,३) रथामध्यें सारथी उजव्या बाजूस बसत असे आणि योद्धा सव्येष्ठृ किंवा सव्येष्ठा हे शब्द दर्शवितात त्याप्रमाणें डाव्या बाजूस बसत असे. अपस्तंबाच्या शुल्ब सूत्रामध्यें रथाची लांबी रुंदी दिली आहे ती अशीः- रथाचा दांडा १८८ अगुळें, कणा १०४ अंगुळें, जूं ८६ अंगुळें. धांव शिवाय करून बाकी चहूंकडे लांकडाचा उपयोग करीत. रथाच्या दुस-या भागांचाहि उल्लेख आलेला आहे पण तो अस्पष्ट आहे.
शकट,शकटी- जुन्या वाङ्मयांत गाडी अशा अर्थानें हे शब्द विरळा आलेले आहेत. गाडीच्या करकर आवाजाची अरण्यांत रात्री ऐकलेल्या आवाजाशीं ॠग्वेदांत तुलना केलेली आहे.
स्थूरि-ॠग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें दोन घोडयांचे ऐवजीं एकाच जनावरानें ओढलेला (व तेंहि हलक्या प्रतीचे जनावर) असा याचा अर्थ आहे. (ॠ. १०, १३१,३) या ठिकाणीं हा शब्द आहे. त्याचा अर्थ सायण छकडा असा करितो. ऐ. ब्रा. ५.३०, या ठिकाणीं ‘यथाहवास्थूरिणैकन’ असें शब्द आहेत. सायणभाष्यांत अस्थूरि असा शब्द घेतला आहे व त्याचा अर्थ घोडा असा दिला आहे.
स्यंदन- रथ- ॠग्वेदांत एके ठिकाणीं पूर्वीच्या वाङ्मयांत हा शब्द आलेला आहे. स्पंदन असाहि पाठ याच ठिकाणीं सर्वसंमत असा आहे.
स्वनद्रथ- खडबड आवाज करणारी गाडी. याचा अर्थ लुडविगच्या मतानें ॠग्वेदामध्यें आसंगाचें विशेषनांव असा आहे. पण हा शब्द नुसता विशेषण असावा. सायणाच्या मताप्रमाणें हा शब्द नाम आहे; व त्याचा अर्थ “आवाज करणारा रथ” असा आहे. ग्रिफिथच्या मतें त्याचा अर्थ “स्वनद्रथ नांवाचा आसंगाचा मुलगा” असा आहे.
विपथ- व्रात्याच्या वर्णनांत ओबडधोबड रस्त्याला योग्य असें वाहन असा अर्थ आलेला आहे.
१०विपृथ- शांखायन श्रौतसूत्रांत हा शब्द आला असून वरवर याचा अर्थ विपथ (ओबडधोबड वाहन) ह्याच्यासारखाच आहे. बहुतेक ही चूक दिसते.
११दीघोप्सस्- ॠग्वेदामध्यें रथाचें विशेषण म्हणून हा शब्द आलेला आहे व रॉथच्या मतें त्याचा अर्थ रथाच्या पुढचा लांब असलेला भाग असा आहे.
१२धूर्षद- रॉथच्या मतें ‘जुवाचें खालीं बसणारा’ म्हणजे ‘ओझें वाहणारा’ अर्थात अलंकारिक भाषेंत बोलावयाचे म्हणजे धुरीण, असा ॠग्वेदांत जेथें हा शब्द आलेला आहे तेथें अर्थ होतो. जास्त संभवनीय अर्थ म्हणजे दांडयावर बसणारा, म्हणजे सारथी असा होईल. कारण घोडयाचें जवळ बसण्याकरितां सारथ्याला पुढें जाऊन दांडयावर किंवा जुंवाजवळ सुध्दां जावें लागतें.
१३मध्यमवह्- हें ॠग्वेदांत एके ठिकाणीं रथाचें विशेषण म्हणून आले आहे. याचा खरा अर्थ कोणता कळत नाहीं. रॉथ याच्या मतें दोन दांडयामधून एक घोडा हांकणें, हें विशेषणार्थी वाक्ये या शब्दाच्या मागें असावें. सायणाचार्याप्रमाणें ‘मध्यम वेगानें हांकणे’ याचा अर्थ मध्यम हा कर्ण म्हणजे अर्धवट पणानें हांकणें असा आहे.  ॠ. २.२९.४ या ठिकाणीं मध्यमवाळऋते असा शब्द आहे. याची मध्यमवाट् ॠते अशी पदें पडतात. मध्यमवाट् मध्यमेन मन्दगमनेन वाहकः म्हणजे मंदगतीनें जाणारा असा सायण अर्थ देतो. ग्रिफिथ असाच अर्थ करितो.
१४रथचर्षण- याचा ॠग्वेदांत एकदां उल्लेख आहे, तेथें अर्थ संशयास्पद आहे. रॉथच्या मतें रथाच्या कांही भागांकरिता हा शब्द योजिला असावा व बहुधा रथाचा भाग हाच अर्थ असावा.ॠ. ८.५.१९ या ठिकाणीं येणा-या रथचर्षण शब्दाचा अर्थ असावा. ऋ.८.५.१९ या ठिकाणी येणा-या रथचर्षण शब्दाचा अर्थ सायणाचार्यानें आपल्या भाष्यांत “रथस्य द्रष्टव्ये मध्यदंशे।“ म्हणजे रथाचा मध्यभाग असा केला आहे व ग्रिफिथ आपल्या इंग्रजी भाषांतरांत त्याचा “रथाचा मार्ग” असा अर्थ करतो. निरुक्तावरील दुर्गाचार्यांच्या भाष्यांत ५-१२ या ठिकाणीं रथचर्षण याचा अर्थ रथांतून गमन करणारा असा केला आहे. रथचर्षणे हे ज्या अर्थी संबोधन आहे त्या अर्थी असाहि अर्थ असावा असें दिसतें.
१५रथवाहन- ॠग्वेदांत (६,७,८) आणि अथर्ववेदांत रथ उभा करण्याचा हलती घोडी असा अर्थ आहे. रॉथच्या मतें ग्रीक लोक अशाच प्रकारच्या लांकडी घोडीचा उपयोग करीत. रथवाहन अथवा रथवाह हा शब्द दोन घोडयांनीं ओढावयाच्या घोडीला लावितात. वेबरच्यामतें हा शब्द लढाईच्या रथाला रणांगणावर नेणा-या घोडयांनां लावीत. ॠ. ६.७५.८ याठिकाणी असणा-या रथवाहन या शब्दाचा अर्थ सायणानें रथानें वाहिले जाणारें धन असा केला आहे व “रथ उपयोगांत नसतांना तो ज्या उंचवटयावर किंवा तिवईवर ठेवतात ती” असा ग्रिफिथनें अर्थ दिला आहे. अथर्ववेद ३.१७.३ याठिकाणीं येणा-या रथवाहन शब्दाचा अर्थ ग्रिफिथनें “रथ ओढणारा” असा दिला आहे.
१६रथसंग- ॠग्वेदांत रथांचा सामना असा अर्थ आहे. ग्रिफिथनें याच्या विरुद्ध रथांची भेट असा अर्थ दिला आहे. व हा अर्थ वरील अर्थास जुळेल असाच आहे.
१७अक्ष- अक्ष म्हणजे कणा.या रथाच्या भागाचा उल्लेख ॠग्वेदात व नंतरच्या ग्रंथांत वरचेवर आला आहे.तो पट्टयांनी अगर दो-यांनीं रथाच्या मुख्य भागाला बांधलेला असतो. त्या पट्टयाला अक्षानह म्हणजे “आंसाला बांधलेला” म्हणतात. हा मूळ अर्थ असून शिवाय याचा घोडा असाहि अर्थ करितात. आंसाला तापविणें व तो मोडण्याची भीति याबद्दलची माहिती त्याकाळीं होती असें दिसतें.
१८आणि- हा शब्द ॠग्वेदांत आहे परंतु तदुत्तर ग्रंथांत क्वचितच सांपडतो आणि रॉथ व झिमर यांच्या मतें कण्याचा जो भाग चाकाच्या तुंब्यांत येतो. त्याचा या शब्दानें बोध होतो. सायणाचार्यांनीं याचा अर्थ (चाकाची) कुणां असा केला असून तो निरुक्तकारांनां व ल्युमनला संमत आहे. ॠग्वेदांत एका ठिकाणीं याचा अर्थ लक्षणेनें सर्व रथ असा दर्शविला आहे. परंतु गेल्डनेरच्या मतानें तो सर्व उतारा संदिग्ध आहे.
१९ईषा- ईषा म्हणजे रथाच्या जुंवाचा दांडा. बहुतकरून रथ एका दांडयानाच (एकेषः) असे,कधीं कधीं दोन दांडयांचाहि उल्लेख केला आहे. हा शब्द बहुतेक युग (जूं) शब्दाशीं समासानें जोडलेला असतो. दांडा जुवांत बसवून दोरखंडानें बाधलेला असे, रथाशी तो बराबर कसा जोडला आहे हे सांगता येत नाहीं.
२०उपधि- हा शब्द एकदां ॠग्वेदांत आणि एकदां अथर्व वेदांत प्रधि यांच्या बरोबर आढळत असून याचा अर्थ चाकाचा एक भाग असा आहे. बरोबर हा भाग कोणता हें नेमकें सांगतां येत नाहीं. रॉथ, झिमर आणि ब्लूमफील्ड हें म्हणतात कीं चाकाच्या सर्व आ-यांनां मिळून हा शब्द लावला आहे व्हिटनें हें अशक्य आहें असें ठरवून म्हणतो कीं भरीव चाकाचा द्यातक हा शब्द आहे. प्रधि म्हणजे धांव आणि पीध म्हणजे बाकीचा सर्व भाग. उपधि म्हणजे वांकाचा खालचा कांठ किंवा प्रत्यक्ष वांकच असा अर्थ असावा.
२१उपह्वर- ॠग्वेदांतील एका उता-यांत हा शब्द असून गेल्डनेर त्याचा अर्थ रथाचा मुख्य भाग (उपस्थ) असा करितो.
२२ककुह- ॠग्वेदांत ब-याच वेळां हा शब्द आला असून रॉथच्या मताप्रमाणें याचा अर्थ रथाचा एक भाग कदाचित बसण्याची जागा असा आहे. पुन्हां लुडविग म्हणतो कीं, एका उता-यात पर्शु तिरिंदिर ह्याच्यापासूनच्या ज्या याद्व राजानें लूट नेली त्याचें हें नांव आहे. परंतु हा अर्थ संभवनीय दिसत नाहीं. सर्व बाजूंनीं विचार करिता ह्या शब्दाचा अर्थ मुख प्रमुख असा असून घोडे, रथ राजे वगैरेनां हें विशेषण योजतात ग्रासमन ह्यानें फक्त हाच अर्थ दिला आहे आणि नंतर रॉथनें तो अर्थ स्वीकारला आहे.
२३- ॠग्वेदांत आणि नंतरच्या ग्रंथांत चाकाचा तुंबा असा याचा अर्थ आहे. गाडी (अनस्) आणि रथ यांच्या तुंब्यांत फरक असे.
२४चक्र- ॠग्वेदापासूनच्या सर्व ग्रंथांत लक्षणेनें रथाचें किंवा गाडीचे चाक असा याचा अर्थ आहे. जेव्हां रथ चालू करावयाचा असेल त्यावेळीं कण्याला चाके मजबूत बसवीत आणि त्याकामी अतिशय बळ लागत असे असें अथर्ववेदावरून ११९,४ दिसतें. चाकाला अरे असून तुंबा असे आणि ह्या तुंब्याच्या छिद्रात कण्याचें टोंक बसविलेले असें पूषन्  ह्या देवतेच्या गाडीचें चाक कधींच खराब होत नसल्याच्या उल्लेखावरून चाकाच्या शक्तीचे महत्त्व किंती होते हे सिद्ध होते. चाकांची सख्या साधारणपणें कोणत्याहि व हनाच्या बाबतीत दोनच असे, परंतु ॠग्वेदांत कांही जागी तीनचाकी व सातचाकी रथाचा उल्लेख असून अथर्ववेदांत आठ चाकाच्या रथाचा उल्लेख आहे. झिमर म्हणतो कीं, हीं विशषणें खरोखरीच्या रथाची नाहींत त्रिचक म्हणून जेथे जेथे उल्लेख आहे तेथे असा काल्पनिक अर्थ असावा. दुस-या पक्षी वेबर म्हणतो की, तीनचाकी रथ असावेत, एक चाक मध्यवर दोघा बसणारांच्या मध्ये असावे. कसेंहि असो सात किंवा आठ चाकी रथ खरोखरच असतील असें वाटत नाहीं शतपथांत कुंभाराच्या चाकाचा (कौलाल-चक्र) उल्लेख आला आहे.
२५दारू- दारू म्हणजे लांकूड. ॠग्वेदामध्यें व इतरत्र हा शब्द अनेकदा आला आहे व त्याचे अर्थ रथाचा दांडा जळणास योग्य असा ओंडा किंवा लांकडी सामान इत्यादि आहेत.
२६धूर्- ॠग्वेद व तदुत्तरकालीन ग्रंथ ह्यामध्यें हा शब्द आला असून पीटर्सबर्गकोशाप्रमाणें रथ किंवा गाडी ओढणा-या प्राण्याच्या खांद्यावर ठेवला जाणारा जुवाचा भाग असा याचा अर्थ आहे आणि म्हणूनच या जनावरांना वाजसनेयि संहितेंत धूषीः म्हणजे जूं धारण करणारे असें नांव दिले आहे. ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं ह्या शब्दाचा अर्थ अनिश्चित आहे.  रॉथच्या मतें चाकाच्या तुंब्यांतून जाणा-या कण्याच्या कोठल्याहि एका टोकांस असलेली कुणी असा याचा अर्थ आहे म्हणजे धुर ह्याचा अर्थ जवळ जवळ आणि असाच झाला. ओल्डेनबर्गनें हेंत मत स्वीकारलें आहे. मोनियर विल्यम्सच्या मतानें धुर ह्याचा अर्थ ओझें असा असावा; पण हें शक्य दिसत नाहीं, धुर ह्याचा गाडीचा दाडा असा अर्थ होणें शक्य आहे. नंतर आंस व दांडा मिळून ज्यायोगानें रथ ओढला जातो तो भाग असा सामान्यपणें अर्थ झाला. हा अर्थ स्वीकारला तर ॠग्वेदांतल्या संदिग्ध लेखाचा उलगडा होईल.
२७नाभि- चाकाचा तुंबा असा अर्थानें ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें हा शब्द आलेला आहे. याचा मूळ अर्थ बेंबी; पुढें लक्षणेनें नात किंवा नातलग असा अर्थ होतो.
२८नेमि- ॠग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें रथाच्या चक्राचा वांक (धाव) असा याचा अर्थ आहे. हा चांगल्या लाकडाचा (सुटू) केलेला असे व त्याला वाकवून चांगला आकार दिलेला असे.  
२९पवि- ऋग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यामध्ये रथचक्राची धांव ह्या अर्थानें हा शब्द आलेला आहे. ही धांव चांगली घट्ट बसवावी लागते असा उल्लेख आलेला आहे व सुपवि हें विशेषण सुनाभि आणि सुचक ह्यांच्याबरोबर आलेलें अथर्ववेदांत सांपडते. ह्या धांवा धातूच्या बनविलेल्या असत व त्या तीक्ष्ण असल्यामुळें त्यांचा शस्त्राप्रमाणें उपयोग होत असे. वाजसनेयि संहितेमध्यें एके ठिकाणीं पीटर्सबर्ग कोशाप्रमाणें पवि याचा अर्थ सोमवल्ली कुटण्याकरितां असेलल्या मुसळाभोवतीचे लोखंडी वेढणें असा आहे. पण हा अर्थ असंभाव्य दिसतो. कारण असें वेढणें मुसळाच्या टोकांस लावित असल्याचा इतरत्र कोठें उल्लेख नाहीं. हिलेब्रँट ह्या वाजसनेयि संहितेमधल्या उता-यांत तीक्ष्ण धार असा अर्थ घेतो व तो अर्थ बरा दिसतो. कारण ॠग्वेदांत मुसळें फिरवितात म्हणून त्याचें वर्णन ‘अनश्वाः पवयोऽरथाः’ असे केलेले आहे. निरुक्तामध्यें पवीचा अर्थ बाण असा केला आहे. हा अर्थ बरोबर आहे हे दर्शविण्यासाठी पीटर्सबर्ग कोशांत ऋग्वेदातील दोन उता-यांचा निर्देश केला आहे. पण एका उता-यांत इंद्राच्या वज्रासंबंधानें तीक्ष्ण धारचें शस्त्र हा दुय्यम अर्थच लागू पडतो व दुस-या उता-यांत बाणस्य पवि असा शब्द आला आहे त्याठिकाणीं वेताचें तीक्ष्ण धारेंचें मुसळ म्हणजे सोमवल्लीचा देंठ असा अर्थ होईल. हिलेब्रँटच्या मतें सोमवल्लीच्या आकाराचा याठिकाणीं उल्लेख असावा. ‘पवीनस’ असें एका राक्षसाचें नांव अथर्ववेदांत आलेले आहे. परंतु त्यावरून ह्या वादग्रस्त मुद्दयावर कांही एक प्रकाश पडत नाहीं. ह्या पवीनस शब्दाचा अर्थ पीटर्सबर्ग कोशाप्रमाणें भाल्याच्या टोंकाप्रमाणें ज्याचें नाक आहे तो, असा आहे; व्हिटनें ह्या शब्दाचें भाषांतर कांठासारखें किंवा कडयासारखें नाक असें करितो. (ह्यामुळे नाकाच्या वक्राकृतीचा बोध होत असावा)
३०पातल्य- ॠग्वेदांत एका ठिकाणीं हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ रथाचा कांही भाग असा आहे. हा कोणचा भाग होता हें अनिश्चित आहे. हॉपकिन्स म्हणतो कीं, महाभारतांत म्हटल्याप्रमाणें रथाचा दांडा धरून ठेवण्याकरितां कण्यावरील लांकडाचा तुकडा (खीळ) असा अर्थ असावा. ॠग्वेद ३.५३.१७ याठिकाणीं येणा-या पातल्य शब्दाचा अर्थ सायणाचार्यांनीं चाकाला लाविलेली खीळ (कीलक) असा केला आहे.
३१प्रतिधि- याचा ॠग्वेदांत सूर्याच्या नांवाच्या ॠचेंत उल्लेख येतो. हा रथाचा एक भाग असून यावर घालून वधूला घरीं नेत. याचा काय अर्थ असावा हें निश्चित ठरविणें अशक्य आहे. रॉथच्या मतानें हा एक लांकडाला आडवा बांधलेला लांकडाचा तुकडा असावा.
३२प्रधि- हें रथचक्राच्या कोणत्या तरी भागाचें नांव आहे. बहुधा वांक किंवा अढेकड हा याचा अर्थ असावा. अथर्ववेद व ॠग्वेद यांत एका ठिकाणीं ‘नाभ्य’ आणि ‘प्रधि’ यांचा उल्लेख उपधि ह्या शब्दाबरोबर झाला आहे. यावरून पाहतां हें कदाचित् सर्व आ-यांचें समुच्चयवायक नांव असावें किंवा हें नाभीच्या आंतील कोरेचे किंवा कडयाचें नांव असावें. ॠग्वेदांतील कूट ॠचेंत बारा प्रधींचा उल्लेख तीन नाभीबरोबर आला आहे. तेथेच एक चाक व तीनशे साठ आरे दिलेले आहेत. या शब्दाचा अर्थनिर्णय करण्याचा प्रयत्न करणें बहुतेक व्यर्थ होय. परंतु ही गोष्ट अगदीं स्पष्ट आहे कीं या ॠचेंत वर्ष, तीन ॠतू, बारा महिने, तीनशेसाठ दिवस, यांच्यावर रूपक आहे. इतर ठिकाणी नाभ्य आणखी प्रधि येवढेच शब्द येतात. किंवा नुसता प्रधि हाच शब्द येतो. ॠग्वेदांत सायण भाष्याप्रमाणें याचा अर्थ ‘चक्रबाह्यवलयः।‘ म्हणजे चाकाच्या बाहेरील घेर व अथर्ववेदांत त्याच भाष्याप्रमाणें चाकाची धांव असा केला आहे.
३३भग- हिलेब्रँटच्या मताप्रमाणें ॠग्वेदाच्या एका वचनांत याचा ‘रथाचा एक भाग’ या अर्थानें उपयोग झाला आहे. परंतु सायणाचार्य याचा अर्थ धुर म्हणजे जूं किंवा जोखड असा करितात.
३४युग- ॠग्वेदांत आणि नंतरच्या ग्रंथांत जूं या अर्थी हा शब्द आलेला आहे.
३५रभि- ॠग्वेदांत एकदां या शब्दाचा रथाचा भाग या अर्थी उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ टेकू देणारा दांडा असाहि होतो.
३६वंधुर- ॠग्वेदांत व पुढील ग्रंथांत हा शब्द असून याचा मॅकडोनेल रथांतील आसन असा अर्थ करितो वेदार्थ यत्नग्रंथांत वंधुर म्हणजे ईषा अर्थात रथाच्या दोन्ही धुरा रथापासून निघून जुंवापर्यंत जातात त्या असा अर्थ आहे. सायणभाष्यांत असा अर्थ शिवाय कांही ठिकाणीं सर्व रथ असाहि अर्थ दिला आहे.
३७वर्तनि- वर्तनि म्हणजे रथाचा भाग. ॠग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत याचा अर्थ रथचक्राचा वांक असा होतो.
३८शम्या- ॠग्वेद व तदुत्तर ग्रंथ ह्यांमध्यें ह्याचा अर्थ खुंटी, शिवळ असा आहे विशेषतः जात्याचा खुंटा किंवा जुंवाची खुंटी आहे. ही जुंवाची खुंटी जुंवाच्या दोन्ही टोकांस मारलेली असे; कारण त्यामुळें जूं बैलाच्या मानेवर सारखें बसे. शम्या हें लांबी मोजण्याचें साधनहि होतें.
३९शघ्य- ॠग्वेदांतील एका उता-यांत रॉथच्या मतानें कदाचित् रथाचा एक भाग असा याचा अर्थ असावा. पण हा अर्थ बिलकुल निश्चित नाहीं.
४०अंक- दोन अंक आणि न्यंक असे रथाचे भाग असतात असे तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण ह्यांच्यांत वर्णन आहे. ह्या शब्दांचा अर्थ स्पष्ट होत नाहीं. टीकाकार म्हणतात कीं रथाच्या बाजू आणि चाकें यांचे निदर्शक हे शब्द आहेत. झिमर हा ग्रीक शब्द ‘अंतुगीझ’ याच्याशीं त्याची तुलना करितो आणि त्याचें मत असें आहे कीं रथाच्या मुख्य भागाची जी वरची बाजू तिला अंकौ असें म्हणत आणि जास्त सुरक्षितपणा किंवा मजबूतपणा यावा म्हणून खालील बाजू ज्या असत त्यांनां न्यंकौ असें म्हणत. ह्या शब्दाचे बरोबर अर्थ करणें अशक्य आहे असें. ओल्डेनबर्ग कबूल करितो. पंरतु त्याला वाटते कीं ह्या शब्दांचा द्वयर्थी उपयोग करीत, एक अर्थ रथाचे भाग,आणि दुसरा अर्थ देवपण. परंतु बोथलिंक हा फक्त देवपण, ईश्वरी सत्ता ह्यालाच हे शब्द लावितो, किंवा ह्या अर्थीच हे शब्द उपयोगांत आणितो. तैत्तिरीय संहिता २.७,८-१ येथ अंक आणि न्यंक यांचा रथाचे दोन भाग असा अर्थ नसून रथाची दोन चाकें असा आहे.
४१नाडी- यजुर्वेदात ह्या शब्दाचा अर्थ रथाच्या चाकाचा वर्तुलाकर तुंबा असा दिसतो.
४२न्यंकः- तैत्तिरीय संहिता व ब्राह्मण या ग्रंथांमध्यें हा शब्द अंकाला सदृश अशा रथाच्या कांही तरी भागाच्या अर्थी आला आहे. पंचविंश ब्राह्मणांत न्यंकु ह्या शब्दाचें न्यंकू असे द्विवचनी रूप आले आहे.
४३प्रऊग- हें वरवर तरी प्रायुग सारखें दिसतें ‘गाडीच्या धुरीचा पुढील भाग’ असा याचा अर्थ आहे. याचा उल्लेख यजुःसंहितेंत व शतपथांत आला  आहे. व तेथें ‘कस्तंभीच्या मागील धुराचा भाग’ अथवा ‘ज्यावर धुर असते तें लांकूड’ असा याचा अर्थ दिला आहे.
४४रथमुख- तैत्तिरीय संहितेंत याचा अर्थ ‘रथाचा पुढील भाग’ असा आहे.
४५रथाक्ष- तैत्तिरीय संहितेंत रथाचा कणा या अर्थी हा शब्द आलेला आहे. कात्यायन श्रौतसूत्राप्रमाणें कण्याची लांबी एकशें चार अंगुळें दिलेली आहे. आपस्तंब शुल्बसूत्रामध्येंहि इतकीच दिलेली आहे.
४६उद्धि- उद्धि म्हमजे रथाचा एक भाग; बहुतकरून आसन असा अर्थ असावा. रॉथच्या मतानें याचा अर्थ
कण्यावरील चौकट असा आहे. हा शब्द अथर्ववेदांत येतो ऐतरेय आरण्यकांतील २.३,८ येथील सायणभाष्यांत याचा अर्थ रथाच्या दांडयाचें पुढील तोंड असा आहे अथर्ववेदांतील ८.८,२२ येथील भाषांतरांत ग्रिफिथ याचा अर्थ शरीर असा करितो.
४७उपानस- अक्षाहून निराळया अर्थानें हा शब्द अथर्ववेदांत सांपडतो. आणि याचा अर्थ गाडीचा मुख्य भाग असा आहे. परंतु सायणभाष्याप्रमाणें त्याचा अर्थ ‘धान्याचें कोठार’ किंवा ‘धान्यानें भरलेली गाडी’ असा आहे. ॠग्वेदांत जेथें फक्त वेळ हा शब्द आलेला आहे तेथें त्याचा अर्थ अनिश्चित आहे. पिशल म्हणतो कीं, तो शब्द विशेषणरूपानें योजिला नसून सामान्यनामरूपांत योजिलेला आहे.
४८तर्दमन्- अथर्ववेदामध्यें जुंवा (युगा) मधलें जें भोंक असतें त्याला हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांत. कातडींतील रंध्राला हा शब्द लाविला आहे.
४९पक्षस्- अथर्ववेद व कौषीतकी ब्राह्मण ह्यांमध्यें हा शब्द आलेला असून याचा अर्थ रथाच्या बाजू असा आहे. काठक संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण ह्यामध्यें कुटीर किंवा शाला ह्याच्या बाजूंनां हा शब्द लावलेला आहे. वाजसनेयि संहितेमध्यें ह्याचा अर्थ दरवाज्याची बाजू असा असून कौषीतकी ब्राह्मणांत सैन्याच्या एका भागाला हे नाव आहे. पंचविश ब्राह्मणांत याचा अर्थ महिन्याचा अर्धा भाग किंवा पंधरवडा असा आहे.
५०योग- अथर्ववेदांत आणि बृहदारण्यकोपनिषदांत गाडी ओढणा-या घोडयाचें अगर बैलाचें जूं असा ह्या शब्दाचा अर्थ आहे.
५१रथोपस्थ- रथोपस्थ म्हणजे सारथी बसत असे ती जागा. हा शब्द अथर्ववेदांत आणि ब्राह्मणांत आला आहे.
५२अपालम्ब- गाडीचा वेग कमी करण्याकरितां जा दांडा खाली सोडीत त्याचा द्योतक हा शब्द आहे. हा शब्द शतपथ ब्राह्मणात (२.४,३,१३) आला आहे.
५३कस्तम्भी- शतपथांत याचा अर्थ गाडयाच्या दांडयाला आधारभूत असा एक लांकडांचा तुकडा असा आहे.
५४कुबर, कूबरी- मैत्रायणी संहितेंत, शतपथ व कौषीतकी ब्राह्मणांत ह्यांचा गाडीचा दांडा अशा अर्थाने उपयोग केला आहे.
५५युक्त- शतपथांत बैलाचें जूं या अर्थी हा शब्द आला आहे.
५६रथचक्र- याचा अर्थ रथाचें चाक. ब्राह्मणांत याचा वारंवार  उल्लेख आला आहे.
५७रथशीर्ष- रथशीर्ष म्हणजे रथाचा वरचा भाग. याचा शतपंथांत उल्लेख आला आहे.