प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

युध्दांतील हत्यारें ( ऋग्वेद )

 युध्दांतील हत्यारें ( ऋग्वेद )

असि -- यज्ञाच्या वेळीं ज्या सूरीचा उपयोग करतात तिला हा शब्द नेहमीं लावतात. परंतु कधीं कधीं लढाईतील सुरी असाहि या शब्दाचा उपयोग होतो. ज्याला कमरपट्टा ( वाल ) अडकविलेला आहे अशा म्यानाचाहि ( वव्रि ) उल्लेख केला आहे. असिधारा या शब्दाचा अर्थहि म्यान असा होतो.
आयुध -- आयुध म्हणजे शस्त्र. व्यापक अर्थानें क्षत्रियाच्या युद्धसामुग्रीचाहि यांत अंतर्भाव होतो. ऐतरेय ब्राह्मणांत ही युद्धसामुग्री अश्वरथ, इषुधन्व व कवच अशीं एकत्रित दिली आहे. ऋग्वेदांत लिहिल्याप्रमाणें वेदकालीन योद्धयाला जरूर असलेल्या इषु व धन्वन् ह्यांचा शस्त्र या अर्थानें आलेल्या आयुध शब्दांत अंतर्भाव होत असला पाहिजे. ऋग्वेदांतील युद्धसुक्तावरूनहि हेंच मत सिद्ध होतें. कारण त्यांत योद्धयाचें वर्णन धनुष्यबाण घेऊन रथारूढ झालेला, अंगांत चिलखत घातलेला, धनुष्याची दोरी घासूं नये म्हणून डाव्या हातावर हस्तघ्न     ( हाताचें संरक्षण ) असलेला असें केलें आहे. उरस्त्राण हें धातूच्या एका तुकडयाचें केलेंलें नसून पुष्कळसे तुकडे एकत्रित ( स्यूत ) करून तयार केलेंलें असें. तें धातूच्या तुकडयाचें किंवा बहुतेक धातूनें मढविलेल्या कसल्यातरी कडकडीत पदार्थाचें बनविलेंलें असावे. योध्दे शिरस्त्राणहि ( शिप्रा ) वापरीत असत. ढाल वापरण्याबद्दल अगर पादत्राणाच्या उपयोगाबद्दल कोठेंहि उल्लेख सांपडत नाहीं. शस्त्रें उपयोगांत आणण्याच्या कौशल्याबद्दल ऋग्वेदांत उल्लेख आहे. गोफणगुंडयांचा ( अद्रि, अशनि ) उपयोग नेहमी करीत कीं काय याबद्दल निश्चय नाहीं. अंकुश हें दैवी अस्त्र समजलें जात असून कु-हाड ( स्वधिति, वाशी, परशु ) हीं देखील मानवी द्वंद्वांत आढळून येत नाहींत. लढाईत शस्त्रांचा सामान्य उपयोग अगर वज्राचा उपयोग होत नसे.
आरा -- ऋग्वेदांत 'पूषन्' चें शस्त्र असा या शब्दाचा अर्थ आहे. परंतु उत्तरकालीन वाङमयात 'आर' 'टोपण' असा झाला आहे. 'पूषन्' च्या मेंढपाळासारख्या राहणीवरून या शस्त्राचा कातडयाला भोंकें पाडण्याकरितां उपयोग केला जात असावा.
इषुधि -- इषुधि म्हणजे बाणाचा भाता. ऋग्वेद व तदुत्तरकालीन ग्रंथांत हा शब्द प्रचारांत आहे. दोन भाते घेण्याची जी अलीकडील पद्धति होती तिचा वैदिक वाङमयात उल्लेख केलेला सांपडत नाहीं. ऋग्वेदं १.१८४,३ या ठिकांणीं असलेल्या 'इषुकृत्' शब्दाचा अर्थ पिशेल म्हणतो त्याप्रमाणें भाता असा मुळींच होत नाहीं. तेथें त्याचा अर्थ 'बाणवत् शीघ्रीकृत्, असा आहे व असाच अर्थ वेदार्थयत्न ग्रंथांत व सायणभाष्यांत दिलेला आहे.
कुलिश -- कुलिश म्हणजे कु-हाड. ऋग्वेदांत याचा उपयोग रथ करण्याकडे व युद्धांत करीत असत असा उल्लेख आहे आणि अथर्ववेदांत यानें झाडें तोडींत असत असें म्हटलें आहे.
कृति -- ऋग्वेदांत ज्या ठिकाणीं मरूत् यांच्याजवळ कृति होत्या असें वर्णन आहे. त्यावरून झिमर म्हणतो कीं, या शब्दाचा अर्थ लढाईतील खंजीर हा होय. परंतु कृति हें आयुध मनुष्याकरितां हातें याबद्दल कांहीं आधार नाहीं.
क्षुर -- हा शब्द ऋग्वेदांत तीन वेळ आला आहे. पहिल्या ठिकाणीं याचा अर्थ पान, पातें असा आहे.   दुस-या ठिकाणींहि हाच अर्थ योग्य दिसतो. कारण तेथें सशानें क्षुर गिळलें असें म्हटलें आहे. तिस-या ठिकाणी धार लावण्याच्या धोंडयावर वस्तरा लावल्याचा किंवा पाजळल्याचा उल्लेख आहे ( भुरिजो: या द्विवचनी शब्दाचा अर्थ पिशेलच्या मताप्रमाणें हल्लींच्या चक्कीसारख्या ज्या यंत्राच्या दोन बाजूंमध्ये तो दगड फिरत असतो त्या दोन बाजू असा आहे ). म्यूर आणि रॉथ हे याचा कात्रीची धार असा अर्थ करितात. परंतु हा अर्थ दुस-या एका ठिकाणीं अथर्ववेदांत दिसत नाहीं. कारण तेथें ओठांवर जशी जीभ फिरते तसें क्षुर भुरिजांवर ( भुरिजो: ) फिरत असते असें म्हटलें आहे. अथर्ववेदांत वस्तरा असा स्पष्ट अर्थ आहे. कारण त्याचा हजामत करण्याकडे उपयोग होई असा उल्लेख आहे. दुस-या पुष्कळ ठिकाणीं दोन्ही अर्थ लांगू पडतात. यजुर्वेदांत 'क्षुरो भृज्वान' असा शब्दसमुच्चय आला आहे. ब्लूमफील्डच्या मतानें त्याचा अर्थ 'वस्तरा व चटपटणें' असा आहे. क्षुरधारा किंवा क्षुरस्य धारा म्हणजे वस्त-याची धार. उपनिषदांत क्षुरधार = ( वस्त-याची डबी अगर पेटी ) हा शब्द आला आहे.
तोद -- ऋग्वेदांत एकदां याचा अर्थ पराणी, टोंचणी असा आलेला असून नेहमींचा याचा अर्थ टोंचणारा, असा आहे. गेल्डनेरच्या मतें एकेठिकाणीं याचा अर्थ शिक्षा देण्यास योग्य असा दंड करणारा ( दण्डधर=राजा ) असा आहे.
दात्र -- ( कापणारा ). याचा अर्थ कोयता असा ऋग्वेदांत आला आहे. मैत्रायणी संहितेंत दात्रकर्ण्य =     ( ज्यांच्या कानावर कोयत्यासारख्या खुणा आहेत अशा ) धेनू असा उल्लेख आलेला आहे. यानंतर फक्त सूत्रें, व महाकाव्यें या उत्तरकालीन वाङ्मयातच हा शब्द आढळतो.
१०दिद्यु, दिद्युत् -- ऋग्वेदांत या दोनहि शब्दांचा अर्थ दैवी किंवा मानवी अस्त्र किंवा बाण असा आहे.
११द्रुघण -- हा शब्द ऋग्वेदांतील मुद्रलसूक्तांत व अथर्ववेदांत आलेला आहे. यास्काचार्य याचा अर्थ लांकडी सोटा असा करितो. गेल्डनेरचें असें मत आहें कीं, द्रुघण हा लांकडी बैल होता व मुद्रलास जेव्हां शर्यतींत भाग घ्यावासा वाटे त्यावेंळीं दुस-या जिवंत बैलाचे ऐवजीं ह्या लांकडी बैलाचा तो उपयोग करी. पण अशा त-हेचा या दन्तकथेचा अर्थ बराच असंभाव्य दिसतो. ह्यानें झाडें तोडलीं जातात म्हणून सायणाचार्य याचा 'तोडण्याचें हत्यार' असा अर्थ करितात. या आधारानेंच अथर्ववेदांत व्हिटनें या शब्दाचा अर्थ लांकडांवर प्रहार करणारा असा करितो.
१२धारा -- एखाद्या शस्त्राची, उदाहरणार्थ कु-हाड ( स्वधिति ) किंवा वस्तरा ( क्षुर ) याची धार असा या शब्दाचा अर्थ आहे.
१३परशु -- ऋग्वेद व मागाहून झालेलें ग्रंथ ह्यांमध्ये लांकूडतोडयाची कु-हाड असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. ही कशी होती हें आपणांस ठाऊक नाहीं. चोरीचा ज्याच्यावर आरोप असेल त्यानें आपलें निरपराधित्व तापलेली कु-हाड हातीं धरण्याच्या दिव्याच्या योगानें सिद्ध करावें असें वर्णन आलेंलें आहे.
१४भुरिज -- हा शब्द द्विवचनी मात्र उपयोगांत आणिला आहे. ह्याचा अर्थ जरा शंकास्पद आहे. रॉथ याचा अर्थ कोंठें कोठें 'कात्री' असा करितो परंतु कांही ठिकाणीं रथकाराची लांकूड पक्कें पकडून धरण्यासाठी पक्कड, शेगडा असाहि अर्थ तो करितो.
१५वाशी -- ऋग्वेदांत व इतर काल्पनिक दंतकंथांत याचा मरूतांचे व त्वष्ट्याचें हत्यार असा अर्थ आहे. परंतु अथर्ववेदांत ह्याचा 'सुताराचें हत्यार' अशा अर्थी उपयोग केला आहे. येथें सायणाचार्याच्या म्हणण्याप्रमाणे आरी हा अर्थी होईल. वेदार्थयत्नग्रंथांत वाशी ह्याचा अर्थ सर्व ठिकाणीं कु-हाड असा दिला आहे. सायणभाष्यांत   ( ऋ. १०.३७,२ या ठिकाणीं ) किंकाळीं किंवा शत्रूच्या सेनेला भिवविण्याकरितां ठोकलेली आरोळी असा वाशी याचा अर्थ दिला आहे. याचा शब्दाविषयीं ऋ. १.८८.३ या ठिाकणीं सायणभाष्यांत 'शत्रूणामा क्रोशकमाराख्यमायुधम' म्हणजे 'शत्रूंना रडविणारें आर नांवाचे शस्त्र' असा अर्थ दिला आहे.
१६शरू -- ऋग्वेद व अथर्ववेद ह्यांत हा शब्द आला आहे. याचा अर्थ बाण, भाला, असा आहे. ऋ. १.१००,१८ या ठिकाणीं या शब्दाचा अर्थ सायणभाष्यांत व वेदार्थयत्न ग्रंथांत वज्र असा आहे. ऋ. ४.३,७ येथें याचा अर्थ 'ऋष्टि नांवाचे जें भाल्यासारखें मरूतांचें ढग फोडून टाकण्याचे अस्त्र तें' असें सायणाचार्य म्हणतात. ऋ. ४.३,७ या ठिकाणीं शरू याचा अर्थ निश्चितपणे कोणासहि सांगतां येत नाहीं. सायणाचार्यानीं संवत्सर अथवा निर्ऋति असे दोंन अर्थ केले आहेत. वेदार्थयत्न ग्रंथांत शरू हें विशेषनाम कल्पिलें असून ती कोणी विशिष्ट देवता असावी असें मानलें आहे. ऋ. १०.१२५,६ या ठिाकणीं हा शब्द विशेषण असून त्याचा अर्थ हिंसक असा आहे असें सायणाचार्य म्हणतात.
१७स्त्रक्ति -- ऋग्वेदांत दाशराज्ञयुद्धवर्णनांत हा शब्द आलेला आहे. हॉपकिन्सच्या मतें याचा भाला असा अर्थ घेणें अवश्यक आहे. ऋ. ७.१८,१७ या ठिाकणीं स्त्रक्ति या शब्दाचा अर्थ ग्रिफिथ 'खांबाचे कोपरे' असा करितो. सायणभाष्यांतहि असलाच अर्थ दिला आहे.
१८हस्तध्न -- ऋग्वेदांत धनुष्याच्या दोरीच्या आघातापासून रक्षण व्हावें म्हणून हात व बाहु ह्यांचेवरील आच्छादनास हें नांव आहे. ह्या शब्दाचें रूप लक्षांत ठेवण्यासारखे आहे. तितंकेचं तें समजण्यास कठिण आहे. लाटयायनांत 'इस्तत्र' व महाभारतांत 'हस्तवाप' हे शब्द याच अर्थानें आलेंलें आहेत.
१९तिसृधन्वा -- ( तीन बाणांचे धनुष्य ) हा शब्द तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये यज्ञाच्या वेळीं उपाध्यायास देणगीं ( दक्षिणा ) अशा अर्थानें आलेला आहे.
२०निषंगदि, निषंगधि -- यजु:संहितेंत हा शब्द आलेला आहे. ह्या शब्दाचें दुसरें रूप् जर बरोबर असेल तर पीटर्सबर्गकोशाप्रमाणें याचा अर्थ तरवारीचें ( निषंग ) म्यान असा होईल. पण पहिलें रूपच बरोबर आहे व त्याचा अर्थ 'निषंगी' म्हणजे 'चांगले धनुष्यबाण असलेला' असा आहे.
२१पवीरव -- निरूक्ताच्या मतानें ह्याचा अर्थ भाला असा आहे. ह्या शब्दापासून बनलेंलें पवीरवंत किंवा पवीरव रूप् अथर्ववेदांत आलेंलें आहे. त्याचप्रमाणें यजुर्वेदसंहितांमध्यें दिसून येत असून त्याचा अर्थ नांगराचा लोखंडी फाळ असा आहे. हेंच विशेषण ऋग्वेदांमध्यें एका माणसाला लाविलें असून त्याचा अर्थ 'अंकुश किंवा भाला असलेला' असा आहे.
२२अपस्कम्भ -- अथर्ववेदांत फक्त एका उता-यांतच हा शब्द आढळतो आणि त्या ठिकाणीं त्याचें टोंक विषारी असतें असा उल्लेख आहे. रॉथ म्हणतो कीं भाल्याला जें फळ मजबूत बसवितात तो अर्थ ह्या शब्दावरून निघतो. व्हिटनेंचें जरी हेंच मत आहे तरी तो चुकीचा पाठ आहे असें सुचवितो. व्युत्पत्तीवरून त्याचा बाण असा अर्थ ब्लूमफील्ड करितो.
२३आजनि -- अथर्ववेदांत अंकुश, बोंचणी, पराणी या अर्थी हा शब्द योजिला आहे.
२४जाल -- हें नांव अथर्ववेद व सूत्रें ह्यांमध्यें जाळें अशा अर्थी आलेंलें आहे. बृहदारण्यकोपनिषदांमध्ये विणलेल्या आच्छादनासारख्या जालाकार त्वचेला जालक असें म्हटलेंलें आहे.
२५पर्शु -- एक जात कांही लेखांत ह्याचा अर्थ विळा असा दिसतो. कारण हा परशु शब्दाचा पर्याय दिसतो.
२६पिनाक -- अथर्ववेदांत याचा अर्थ सोटा किंवा गदा असा असून पुढें शिवाच्या गदेला हा शब्द लावूं लागले असें मॅकडोनेंल म्हणतो. परंतु तैत्तिरीय संहिता, वाजसनेयि संहिता व अथर्वसंहिता ह्यांमध्ये सायणभाष्याप्रमाणें गदा किंवा सोटा असा अर्थ नसून धनुष्य, कोदंड, अंकुश असा अर्थ निघतो.
२७प्रसिति -- वाजसनेयि संहितेंत आणि तैत्तिरीय ब्राह्मणांत याचा अर्थ 'दैवी अस्त्र' असा आहे असें मॅकडोनेल म्हणतो पण सायणभाष्याप्रमाणें त्याचा तसा अर्थ नसून एका ठिाकणीं 'जाळे' असा अर्थ व दुस-या ठिकाणीं तो विशेषण असून त्याचा अर्थ 'प्रकृष्टबंधना' असा आहे.