प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.               

युद्ध पराभव (ॠग्वेद)

युद्ध पराभव (ॠग्वेद) / युद्धविषयक किरकोळ ( ऋग्वेद)

ऊर्जयन्ती- लुडविग् म्हणतो कीं ॠग्वेदांतील एका उता-यांत हें नार्मर ह्याच्या किल्याचें नांव आहे. तथापि त्या ॠचेपासून कांहीच अर्थबोध होत नाहीं. निश्चित अर्थबोध होत नाहीं हें जरी खरें असलें तरी लुडविगचा अर्थ चूक असें म्हणतां येत नाहीं, हेंहि तितकेंच खरें आहे.
दुर्ग- ज्याच्याजवळ जाणें कठिण असतें तो असा ह्याचा अर्थ असून ॠग्वेदांत हा शब्द नपुंसकलिंगी आलेला असून त्याचा अर्थ कधीं कधीं किल्ला किंवा मा-याचें ठिकाण असा होतो. सायणाचार्यांनीं पहिल्या ठिकाणीं संकट, व दुस-या ठिकाणीं युद्ध, असा अर्थ केला आहे. परंतु दोन्ही ठिकाणीं किल्ला असा अर्थ असणें संभवनीय आहे.
देहि- ॠग्वेदामध्यें दोन ठिकाणीं शत्रूच्या प्रतिकारार्थ बांधिलेली रक्षणाची जागा म्हणजे मातीची कामचलाऊ भिंत किंवा बांध अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे. सायणांत एका ठिकाणीं देही याचा अर्थ पुरी असा केला असून ७.६,५ येथें (आसुरी) विद्या असा केला आहे व ग्रिफिथ कोट असा अर्थ करतो.
पाष्य- ॠग्वेदामध्यें एके ठिकाणीं वृत्राच्या पराभवासंबंधानें हा शब्द आलेला आहे. दगडी व तट असा ह्याचा अर्थ आहे. दुस-या एका लेखांत ह्या शब्दाचा अर्थ सोमवल्ली ठेचण्याकरितां उपयोगी पडणारे दगड असा आहे.
सिच् - हा शब्द द्विवचनी आलेला असून ह्याचा अर्थ सैन्याच्या बगला व अनेकवचनी सैन्याच्या रांगा असा अर्थ आहे. सायणभाष्यांत सिच्यौ याचा अर्थ सिचमानौ भटौ म्हणजे अभिषेक केले जाणारे दोन राजे असा दिला आहे. ग्रिफिथ साहेबानें त्याचा अर्थ सैन्याचे दोन पंख असा केला आहे. अथर्ववेदांत असलेल्या या शब्दावर भाष्य लिहितांनां सायणांनीं तो शब्द शुचः असा घेऊन त्याचा अर्थ शोचमानाः असा केला आहे.
कवच- अथर्ववेद आणि त्यानंतरच्या वाङ्मयांत हा शब्द उरस्त्राण या अर्थानें आला आहे. हें उरस्त्राण धातूचें करीत असत हें म्हणण्यास मात्र कांहीच आधार सांपडत नाहीं. परंतु ते धातूचेंच केलेलें असणें संभवनीय आहे. अथर्ववेदांत कवचपाश असा शब्द आला आहे त्या अर्थी तागाच्या उरस्त्राणाचा (जें हिरोडोटस्ला माहित होतें त्याचा) व त्या शब्दाचा संबंध असावा असें वाटतें.
वप्र- ह्याचा अर्थ तट कल्पनेनें बसविण्यासारख पाठ अथर्ववेदामध्यें आलेला आहे.
संग्राम- ह्याचा मूळ अर्थ शांततेचे वेळीं किंवा युद्धाचे वेळीं भरलेली सभा. लढाईचे वेळची सभा सशस्त्र लोकांची असे. अथर्ववेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यांत ह्याचा नेहमीचा अर्थ युद्ध किंवा लढाई असा आहे. वैदिक कालच्या युद्धाविषयीं फारशी माहिती उपलब्ध नाहीं पण त्या वेळचीं युद्धे साधीं होतीं. प्रत्येक सैन्यांत पायदळ व रथी हे असत. हे दोघे एकत्र असत व पदाति लोकांचा पाडाव नेहमीं रथी लोकांकडून होई. हे रथी लोक क्षत्रिय किंवा त्यांचे पहिल्या प्रतीचे उत्तम अनुयायी असत. पदाति लोकांजवळ चिलखत फारसें नसे व लढाईचें वेळीं धनुष्याचाच ते उपयोग करीत. हें वर्णन झरझीसनें ज्या हिंदुस्तानांतल्या सैन्याच्या मदतीनें ग्रीसवर चाल केली अशा ज्या सैन्याचें हिरोडोटसनें वर्णन केलें आहे त्या वर्णनाशीं जुळतें. जे सरदार असत त्यांच्या जवळ उरस्राण असे, शिरस्त्राण (शिप्रा) व हस्तघ्र (हे धनुष्याच्या दोरीच्या घर्षणापासून रक्षण करण्याकरितां) असत. रथावर सारथी बसे व त्याच्या डाव्या बाजूस योद्धा (सारथि, सव्यष्ठा) बसे. लढाईत घोडयावर बसण्याची चाल नव्हती व ही घोडयावर बसण्याची कल्पना वैदिक काळच्या कल्पनेला विसंगतच झाली असती. कारण त्या वेळचे वीर धनुष्यावरच सर्व मदार ठेवीत, व घोडयावर बसून धनुष्यांचा उपयोग करणें सोयिस्कर नसे. त्या वेळचें लढण्याचें साधन म्हणजे धनुष्य. भाला, तरवार व परशु ह्यांचा क्वचितच उपयोग केला जाई. अथर्व ४. २४, ७ या ठिकाणीं जो संग्राम शब्द द्वितीयेचे अनेकवचनांत आला आहे त्याचा अर्थ युद्धाच्या वेळीं भरलेली सभा असा नाहीं. ग्रिफिथचें मतें संग्रामान् म्हणजे सैन्यें. सायण संग्रामान् याबद्दल संग्रामम्  असा पाठ घेऊन त्याचा अर्थ युद्ध असा देतो तै.सं. ४.७,१५,२ या ठिकाणीं जो संग्राम शब्द आहे त्याचा अर्थ युद्ध असाच दिसतो. ॠ. २,१२, ८ या ठिकाणीं यंक्रन्दसीसंयती विहूवयेते। असे शब्द आहेत. येथें संयती म्हणजे परस्परं सङ्गच्छन्त्यौ असा अर्थ आहे. याचा अर्थ एकमेकांशी मिळून चालणा-या असा धरला तर पदाति व रथी असें सैन्याचे दोन विभाग कल्पितां येण्यासारखे आहेत; परंतु परस्परविरुद्ध दोन सेना एकमेकींशी भिडणा-या असा अर्थ केल्यास हीं भिडणारी विरुद्ध सैन्यें पदाति व रथी अशीं द्विविध होतींच असें खात्रीलायक म्हणतां येणार नाहीं. अथर्व ७.६४, १ याठिकाणीं रथीव पत्तीन जयत्। असे शब्द आहेत; त्या ऐवजी सायण रथीव पत्नीन जयत्। असा पाठ घेतो व त्याचा अर्थ रथवान्  पुरुषः पत्तीम्  प्रजाम् अन्यदीयी स्वीयां वा नारीं यथा जयति एवम् असा करतो. सैन्याची जातवार संघटित व्यवस्था होती कीं, नाहीं (जी व्यवस्था होमरच्या कवितेंत वर्णन केलेली आहे व जिचें अस्तित्व जर्मनीमध्यें टेसिटसनें आहे असें म्हटलेलें आहे ती) हें सांगणें कठीण आहे पण महाभारतांत ज्ञाती एकत्र लढत असत व हीच स्थिती वैदिक काळांतहि कमीजास्त प्रमाणांत होती हें निश्चित आहे. शहरांनां वेढा पडत असे व लष्करी चौकी बसवून नाकेबंदी केली जाई असें ऐतरेय ब्राह्मणावरून दिसते.  (उपसद् , प्रभिद्ः) कारण त्या वेळची हल्ला करण्याची जीं साधनें होतीं त्यांच्या योगाने छापा  घालून व हल्ला करून एखादें शहर घेणें हें त्रासदायक व खर्चाचें होतें. हिलेब्रेंट आपल्या उपनिषद्ग्रंथ पुस्तकांत म्हणतो कीं, ॠग्वेदांतला पुरचरिष्णु हा एक प्रकरचा रथ होता. ट्रोजन घोडयाप्रमाणें हा रथ म्हणजे ज्या साधनांनी एखाद्या शहरावर रोमन लोक हल्ला चढवीत त्या साधनांची पूर्वतयारीच होय. नेहमींची संरक्षणार्थ व नवीन देश जिंकण्याकरितां जीं युद्धें होत त्याशिवाय शेजारच्या मुलखावर भुरटे हल्ले नेहमींचे व वारंवार होत. ह्या हल्ल्यांचा हेतु जी लूट मिळेल (उदाज, निराज) ती राजानें व लोकांनीं आपसांत वाटून घ्यावी हा होय. लढाईत ध्वजांचा प्रचार असे व लढवय्ये लोक दुंदुभि व बकुर ह्या वाद्यांचा उपयोग करीत असत. ऐ. ब्रा. १.२३.२ या ठिकाणी जो उपसद्  शब्द आहे त्याचा अर्थ तेथें उपसद्  नांवाचा होम असा आहे; सायण हा अर्थ करितो. शहरालो दिलेला वेढा असा तेथें अर्थ नाहीं. ॠ. ८.१.२-८ या ठिकाणीं पुरचरिष्णु याचा अर्थ सायणानें रथ असा केलेला नाहीं; व तो तेथें तसा संयुक्तिक दिसत नाहीं.सायणानें पुर याचा अर्थ निवासस्थान असा केला आहे. चरिष्णव याचा अर्थ ‘चरणशील असा’ म्हणजे हिंडण्याचा शोकी असा दिला आहे.
ज्या-होद- पंचविंश ब्राह्मणांत व्रात्याच्या शस्त्राचें जें वर्णन आहे त्यांत व सूत्रग्रंथांत हा शब्द आला आहे. याचा अर्थ कांहीसा संदिग्ध आहे कारण एका सूत्रग्रंथांत ‘अयोग्य धनुः’ असें याच्याबद्दल म्हटलें आहे व दुस-या एका सूत्रांत धनुष्क अनिषु (बाणाशिवाय धनुष्य) असाहि उल्लेख आहे तेव्हां याचा कोणत्या तरी प्रकारचें धनुष्य असाच अर्थ असावा.
१०पताका- हा शब्द अद्भुत ब्राह्मणापूर्वी कोणत्याहि ग्रंथांत येत नाहीं. याचा वैदिक पर्याय शब्द ध्वज असा आहे.
११प्युक्ष्ण- शतपथ ब्राह्मणांत धनुष्याचें आच्छादन या अर्थी हा शब्द आला  आहे. हें आच्छादन बहुतेक कातडयाचें केलेलें असावें.
१२प्रशास- ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द आला असून सेंटपीटर्सकोशाप्रमाणें त्याचा कु-हाड किंवा त्यासारखें तोडण्याचें हत्यार असा अर्थ आहे.
१३बाणवन्त- बृहदारण्यकोपनिषदांत बाण अथवा बाणाप्रमाणे (तीर) अशा अर्थानें हा शब्द आला आहे. वाजसनेयि संहितेंतहि हा शब्द बाणवान्  असा असून याचा टीकाकारांनीं भाता असा अर्थ केला आहे.
१४समर- लढाई या अर्थी हा शब्द कौषीतकी ब्राह्मणांत आला आहे.  गेल्डनेरच्या मतें ॠग्वेदांतहि या शब्दाचा हाच अर्थ असावा.