प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

यज्ञ पात्रें ( ऋग्वेद )

अमत्र -- गाळलेला सोमरस ज्या भांडयांत ओतीत व ज्यांतून देवतेला भाग देत असत तें भांडे.
उखा -- ऋग्वेदापासून पुढें याचा अर्थ पाकनिष्पत्तीचें ( विशेषत:यज्ञसंबंधी ) भांडें असा आहे. हें मातीचें बनविलेंलें असे.
चमस -- चमस म्हणजे पेयपात्र. यज्ञाच्या वेळीं सोम ठेवण्यास याचा उपयोग करीत. ऋग्वेदापासून पुढें याचा उल्लेख वेळां आला आहे. तें लांकडांचे असल्यामुळें त्याला द्रु असें म्हणत. तें उदुम्बरलांकडाचें करीत असत असें शतपथ ब्राह्मणांत म्हटलें आहे.
चमू -- ऋग्वेदांतील हा शब्द जरासा अनिश्चित अर्थाचा असून त्याचा संबंध सोम तयार करण्याकडे दाखविला आहे. झिमर म्हणतो कीं, द्विवचनांत उपयोग केला म्हणजे त्याचा अर्थ ज्या दोन फळयांत सोम दाबतात त्या दाबून झाल्यावर सोमाचा रस ज्या भांडयांत ओततात तें भांडे असा जो रॉथचा अर्थ आहे तो साधारण बरोबर आहे. अनेकवचनी हा शब्द येतो त्या वेळीं असाच अर्थ होतो असें हिलेब्रँटचें म्हणणें आहे. कारण तो मागाहूनच्या विधींतील ग्रहपात्रें ह्यांच्याशी जुळता आहे; आणि कधीं कधीं ह्याच अर्थी तो एक वचनीहि उपयोगांत आणितात. कांही ठिकाणीं तो म्हणतो कीं ह्याचा अर्थ उखळ, ज्यांत सोम कांडतात तो खल हा अर्थ बरोबर असेल. कारण इण्डो-इराणि-यांची सोम काढण्याची हीच रीत होती. शतपथ ब्राह्मणांत साधित शब्द या रूपांत हा शब्द आला असून तेथें त्याचा अर्थ प्रेतें ठेवण्याकरितां दगडांचे किंवा विटांचे केलेलें स्थान असा आहे.
जुहू -- हा शब्द ऋग्वेदांत व पुढील ग्रंथांत जिभेच्या आकाराची पळी-जिच्यांतून देवास तूप दिलें जात असे-- अशा अर्थानें आला आहे.
६दर्वि अथवा दर्वी -- ह्याचा खरा अर्थ पळी असा असून ह्याच अर्थी ऋग्वेदांत व पुढेंहि हा शब्द आला आहे. परंतु अथर्ववेदामध्यें ह्याचा 'सापाची फणा' अशा अर्थी उपयोग आलेला आहे. झिमरच्या मतें ह्याचा अर्थ साप असा आहे.
द्रु -- ह्याचा अर्थ लांकडाचें बनविलेंलें भांडे, विशेषत: सोमयज्ञाचे वेळीं उपयोगांत आणिलेंलें भांडे, व कदाचित् हिलेब्रँटच्या म्हणण्याप्रमाणें चाळणींतून ओततांना ज्यांत सोमरस धरतां येईल असें भांडे असा आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत ह्या शब्दाचा अर्थ लांकूड असा आहे.
द्रोण -- ऋग्वेदांत लांकडी द्रोण अशा अर्थानें व विशेषत: अनेकवचनीं हा शब्द आला असतांना सोमरस धरून ठेवण्याकरितां केलेंलीं भांडी असा त्याचा अर्थ आहे. सोमरस सांठवून ठेवण्याकरितां जें मोठें लांकडी भांडे असे, त्याला द्रोणकलश असें नांव असे. कधीं कधीं द्रोणाच्या आकाराची वेदीहि केलेली असे.
महाकुल -- म्हणजे मोठया कुलांत जन्मलेला. हें पेल्याचें ( चमस ) नांव ऋग्वेदात आलें आहे. या शब्दाच्या अलंकारिक उपयोगावरून कांही कुलांचे श्रेष्ठत्व ऋग्वेदकांळी मान्य झालें होतें असें दिसतें.
१०शुक्र -- कै. लोकमान्य टिळकांच्या मताप्रमाणें ऋग्वेदांत दोन ठिकांणी ह्याचा अर्थ ग्रह असा आहे. मॅकडोनेलच्या मतें हा अर्थ अगदीं असंभाव्य आहे ( तैत्तिरीय संहितेंपासून पुढे या शब्दाचा सोमाचें पात्र या अर्थी उपयोग होऊं लागला.
११स्त्रुच -- स्त्रुच् मोठी म्हणजे लांकडी पळी ( हिचा उपयोग अग्नीत तूप ओतण्याकडे असे. ) असा अर्थ ऋग्वेद व मागाहून झालेलें ग्रंथ ह्यांमध्यें आहे. हिचा दांडा एक कांख-हात-लांब असून माथळा हाताच्या पंजा एवढा व पळींतून धार पडण्याचें ठिकाण चोचींच्या आकाराचें असे.
१२स्त्रुव -- स्त्रुच् ह्याच्या उलट स्थालींतून मोढ्या पळींकडे ( जुहू ) नेण्याकरितां उपयोगी पडणारी लहान पळी असा सूत्रग्रंथांत अर्थ आलेला आहे. उलटपक्षीं ऋग्वेदामध्यें सोमद्रव्य देण्याकरिंतां हिचा उपयोग होत असें.