प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
युद्धनामें ( ऋगवेद )
युद्धनामें ( ऋगवेद ) |
१गविष्टि -- याचा शब्दश: अर्थ गाईची इच्छा. ऋग्वेदांत पुष्कळ ठिकाणीं गाई (गो) नेण्याकरितां केलेंलें युद्ध अथवा तंटा असा अर्थ आहे. गव्या ह्या शब्दाचाहि तसाच उपयोग केला आहे.
२दाशराज्ञ -- हें ऋग्वेदांमध्ये व अथर्ववेदांत उल्लेखिलेल्या सुदासाच्या दहा राजांशी झालेल्या प्रसिद्ध युद्धाचे नांव आहे. हें दहा राजे कोण होते हें नक्की सांगणे जरा कठिण आहे पण दहा हा शब्द म्हणजे अदमासाचा असावा, नक्की दहाच राजे होते असें म्हणतां येत नाहीं. खुद्द या युद्धासंबंधीं जें सूक्त आहे त्यांत हा शब्द आलेला नाहीं. ज्यांत हा आलेला आहे तीं सूक्तें मागाहून झालेंली असा समज आहे. ऋ. ७.८३,८ या ठिकाणीं दाशराज्ञ हा शब्द सुदास ह्या शब्दाचे विशेषण आहे असे सायणाचार्य म्हणतात.
३पृत्; पृतना -- याचा अर्थ युद्ध, रंथांचा सामना, शर्यत किंवा सशस्त्र सामना. ह्याचा कांही ठिकाणीं सेना असाहि अर्थ आहे. महाकाव्यांतील युद्धवर्णनांत याचा अर्थ मनुष्य, हस्ति, रथ, पृतनाज्य यांचा केवळ सामना असाच अर्थ मॅकडोनेल देतो, परंतु सायणभाष्यांत त्याचा संग्राम असा अर्थ आहे.
४प्रधन -- ऋग्वेदांत हा शब्द आला असून याचा अर्थ 'लढा' असा आहे; मग तो ख-या युद्धांतील असो, किंवा साध्या रथांच्या शर्यतींतींल चुरशीचा असो. सायणभाष्याप्रमाणें कित्येंक ठिाकाणीं याचा अर्थ 'पुष्कळ धनाने युक्त असा' होतो.
५महाधन -- ऋग्वेदांत याचा अर्थ 'मोठी लढाई' किंवा लढाई जिंकल्यानंतर दिलेंलें 'मोठें बक्षीस' असा किंवा कित्येक ठिकाणीं झुंज' रथांची शर्यत असा अर्थ मॅकडोनेल करितो. सायणभाष्याप्रमाणें 'पुष्कळ धन ज्यांत प्राप्त होईल असा याचा व्यापक अर्थ होतो.
६यामन् -- ऋग्वेदांत चाल, लढाई किंवा हल्ला या अर्थी हा शब्द आला आहे.
७युद्ध -- ऋग्वेदांत आणि नंतर लढाई या अर्थी हा शब्द आलेला आहे.
८रण -- ऋग्वेदांत या शब्दाचा अर्थ 'युद्ध' असा सायणभाष्यांत आहे. मॅकडोनेल येथें याचा 'युद्धाचा आनंद' असा अर्थ करितो, पुढें याचा 'संग्राम, असाच अर्थ आहे.
९द्विराज -- हा शब्द नपुंसकलिंगी असून अथर्ववेदामध्यें त्याचा अर्थ दोन राजांमधील युद्ध किंवा झगडा असा आहे.