प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
योध्दे ( ऋगवेद )
योध्दे ( ऋगवेद )/ युद्धकरणें ( क्रियापदें) (ऋग्वेद) |
अस्तृ - (बाणादि शस्त्रास्त्रें सोडणारा) रथांमधून जो धनुर्धारी लढत असे त्याच्याबद्दल ॠग्वेद आणि अथर्ववेद ह्यांत हा शब्द योजिला आहे.
२आस्थातृ- ॠग्वेदांत रथामधील योध्याचें हें नांव आहे. परंतु त्याला रथिन् अथवा रथेष्ठ असें म्हणतात.
३निषंगिन् - ॠग्वेदांत तीन वेळां हा शब्द आलेला आहे. व त्याठिकाणी सुधन्वान् इषुमंतो (चांगली धनुष्ये व बाण असलेले) ह्या शब्दांमागून असल्यामुळें निषंगिनः ह्याचा अर्थ उत्तम बाणाचे भाते असलेला हा निश्चित आहे. वाजसेनयि संहितेमध्यें महीधराचार्याच्या मतानें तरवार असलेला असा त्याचा अर्थ आहे; आणि हा अर्थ त्या ठिकाणीं पूर्णपणें संभावतो. पण भाता असलेला हाच अर्थ बरा दिसतो. कारण वैदिककाळीं लोकांचे शस्त्र धनुष्य होतें, तरवार हें नव्हतें, असें मॅकेडोनेल म्हणतो.
४महावीर- (मोठा योद्धा)- ॠग्वेदांत हा शब्द आला आहे परंतु मागाहूनच्या संहिता व ब्राह्मण ग्रंथ ह्यांत आलेलें हें एक यज्ञियपात्राचें (मडक्याचें)नाव आहे. हें विस्तवार ठेवीत असत व प्रवग्य नावाच्या सुरुवातीच्या सोमसमारंभप्रसंगीच्या अनुष्ठानांत याचा उपयोग करीत असत.
५मुष्टिहन् , मुष्टिहत्या- ॠग्वेद व अथर्ववेद ह्यांत यांचा अर्थ अनुक्रमें हाताहातीची लढाई (मुष्टियुद्ध) करणारा व हाताहाताची लढाई (मुष्टियुद्ध) असाहि आहे. (मुष्टिहन्) म्हणजे पादचारी योद्धा- रथी नव्हे तो असा अर्थ होतो. त्याचप्रमाणें अथर्ववेदांत रथी आणि त्यापासून भिन्न असा पत्ति (पादचारी शिपाई) व ॠग्वेदांत रथ व त्याहून निराळें पायदळ (ग्राम), असें दाखविलें आहे.
६योध- ॠग्वेदांत योद्धा लढवय्या, या अर्थी हा शब्द आला आहे.
७रथिन् आणि रथी- ॠग्वेदांत आणि नंतरच्या ग्रंथात रथांतून जाणार- यांत रथी व सारथी या दोहोंचाहि समावेश होतो- असा याचा मॅकडोनेल अर्थ करितो. ॠ. ५.८३,३ याठिकाणीं सायणभाष्याप्रमाणें यांचा अर्थ रथी, रथाचा स्वामी असा असून सारथी असा नाहीं.
८रथेष्ठा- रथावर उभा राहणारा, रथांतून लढणारा असा याचा ॠग्वेदांत अर्थ आहे.
९शूर- ॠग्वेदांमध्यें नेहमी येणारा व नंतरच्या वाङमयांत केव्हां केव्हां येणारा हा शब्द असून याचा अर्थ वीर, शूर योद्धा असा आहे.
१०सत्वन् - ॠग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत कधीं कधीं योद्धा या अर्थानें हा शब्द आला आहे.
११महारथ- (मोठा रथ असलेला्) रथांतील मोठा योद्धा. यजुवर्देसंहितेंत अश्वमेधप्रसंगी विशिष्ट कर्माच्या वेळीं प्रार्थिलेल्या एका मोठया योध्याचें नांव. महीधरभाष्यांत एकः सहस्त्रंजयति महारथः म्हणजे हजार योध्यांनां जिंकणारा तो महारथ असा अर्थ दिला आहे.
१२रथगृत्स- तैत्तिरीय व वाजसनेयि संहितेंत आणि ऐतरेय ब्राह्मणांत हा शब्द आला असून मॅकडोनेल त्याचा अर्थ हुशार सारथी असा करितो. परंतु वाजसनेयि संहितेंत उवटभाष्य व महीधरभाष्य यामध्यें याचा अर्थ रथयुद्धकुशल असा दिलेला आहे. हुशार सारथी असा नाहीं. त्याचप्रमाणें ऐतरेय ब्राह्मणांत सायणभाष्याप्रमाणें राजपुत्र (रथगृत्सो राजपुत्रः) असा अर्थ असून एम. हॉगनेंहि असाच अर्थ केला आहे.
१३सव्यष्ठा, सव्यष्टृ, सव्येष्ठ, सव्यस्थ- मॅकडोनेल म्हणतो ह्या सर्व शब्दांचा अर्थ रथांतून युद्ध करणारा असा आहे. हा सारथ्याच्या डाव्या बाजूस असे. टीकाकारांच्या मतानें सव्यष्ठाचा अर्थ नुसता सारथी असा आहे. पण हा अर्थ चुकीचा आहे. ह्या शब्दाचा असा अर्थ करण्याचें कारण शुद्र सारथ्याबद्दल पुढें उत्पन्न झालेला जातिद्वेष हें होय (मॅकडोनेल्डनें हा शेवटीं केलेला तर्क काय आधारानें केला तें समजत नाहीं) शतपथ ५.२,४,९ या ठिकाणीं सव्यष्ठ असा शब्द आहे. सायणभाष्यांत त्याचा अर्थ रथाच्या डाव्या भागांत बसणारा (सारथी) असा दिला आहे; रथांतील योद्धा असा दिला नाहीं.
१४सादिन्- अथर्ववेदांत याचा अर्थ घोडेस्वार - असाद म्हणजे पदाती याहून भिन्न अर्थी - असा आहे. अश्वसादी(घोडेस्वार) हा शब्द वाजसनेयि संहितेंत आला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत आणि खुद्द ॠग्वेदांतहि अश्वारोहणाबद्दल स्पष्ट उल्लेख आहेत. ऐतरेय आरण्यकांत (नेहमी) घोडयाच्या बगलेच्या बाजूनें घोडयावर बसतात (मागून किंवा पुढून बसत नाहींत) असें म्हटलें आहे. अश्वलायना सूत्रांत साद्य म्हणजे बसण्याचा घोडा- असा शब्द आला आहे.