प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

अन्न

अन्ननामें [ ऋग्वेद ]

अपूप -- हा शब्द ऋग्वेदांत आणि तदुत्तर ग्रंथांत पोळीला-मग ती तूप मिश्रित असा, तांदुळाची असो किंवा यवाची असो-सर्व साधारणपणें उपयोगांत आणिला आहें. छांदोग्य उपनिषदांत अर्थामध्यें थोडासा फरक केला आहें. मॅक्स मुल्लर ' मधमाशांचें पोळें ' बोथलिंग ''मधशित्या'' आणि लिटल 'पोळी' असा अर्थ करितात.
उर्वारूक -- उर्वारू ( स्त्रीलिंगी ), उर्वारूक ( नपुसकलिंगी ), 'कांकडी', ह्या दोन शब्दापैकीं पहिला शब्द वेलाचा दर्शक आणि दुसरा फळवाचक परंतु दोनहि शब्द क्वचितच: उपयोगांत असतात. बहुतेक सर्व उता-यांवरून असें अनुमान निघतें की, जेव्हां फळ होतें त्यावेळेसं वेलाचा देंठ जरा ठिसूळ होतो. पंचविश ब्राह्मणांत फळालाच उर्वारू असें म्हटलें आहें.
ओदन -- सामान्य अन्न या अर्थी हा शब्द वापरलेला आढळतो. हा शब्द बहुतकरून दुधामध्यें शिजवलेल्या धान्यास लावतात ( क्षीरपाकम् ओदनम् ). याच्या निरनिराळया प्रकारांचा उल्लेख आहे; उ. क्षीरौदन, दघ्यौदन, मुद्गौदन, तिलौदन, उदौदन, मांसौदन घृतौदन इत्यादी
क्रव्य -- कच्चे मांस मनुष्य खात, असें वैदिक वाङमयांत कोठेंच नाहीं. राक्षस फक्त त्याचें भक्षण करीत, आणि अग्नीला क्रव्याद ' कच्चे मांस खाणारा ' असें म्हणत, कारण तो शवांचा फडशा पाडी. ऋग्वेदांत ज्या मनुष्याला दुष्काळामुळें कुत्र्यांचें मांस खावें लागल्याचा, उल्लेख आहे त्यानें देखील तें शिजविलें होतें.
क्षीर -- याचा ऋग्वेदांत उल्लेख असून त्याला गो ( दूध ) पयस् देखील म्हणतात. हा वैदिक आर्यलोकांचा अतिशय उपयोगाचा गृहव्यवस्थेंतील पदार्थ होय. तें धारोष्ण दूध ( पक्व ) सेवन करीत असत अथवा ओदन 'दूधांत शिजविलेला पदार्थ' [क्षीरपाकम् ओदनम्] तयार करीत. त्याचें सोमांतहि मिश्रण करीत (अभिश्री, आशिर), त्याच्या पासून सूप [ घृत ] तयार करीत. दूध विरजण्याकरितां दुस-या कित्येक वनस्पतीबरोबर पूतीका आणि क्वल वनस्पतीहि उपयोगांत आणीत. दह्याचा उपयोग अन्नासारखा करीत असत. आणि ऋग्वेदांत एका ठिकाणी चक्क्याचाहि उल्लेख आला आहें. अजक्षीर ह्याचाहि उल्लेख आला आहे.
घृत -- हा नेंहमीच्या आणि यज्ञाच्या वेळीं उपयोगीं  असलेंलें अर्वाचीन तूप याचा वाचक शब्द ऋग्वेदांत आणि तदुत्तर आलेला आहे. ऐतरेय ब्राह्मणावरील सायण भाष्यांत घृत म्हणजे घट्टतूप [घनी-भूत] आणि सर्पिस् म्हणजें पातळ तूप असा फरक दाखविला आहें अग्नीत तूप टाकींत, त्यामुळें अग्नीला घृतप्रतीक, घृतपृष्ठ, घृतप्रसत्त आणि घृतप्रीं असें म्हणत. घृताला शुद्ध करण्याकरिंतां पाण्याचा उपयोग करीत म्हणून पाण्याला घृतपू असें म्हणत. ऐतरेय ब्राह्मणांत आज्य, घृत, आयुत आणि नवनीत हें क्रमश: देव मनुष्य पितर आणि गर्भ ह्यांना देत.
चरू -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथांत या शब्दाचा प्रथम 'कढई' अथवा 'भांडे' असा अर्थ आहें. त्याला झांकण [ अपिधान ] असून विस्तवावर टांगून ठेवण्याकरितां त्याला आंकडे ( अंक ) असत. तें भांडे लोखंडाचें किंवा कांस्य धातूचें ( अयस्मय ) केलेंलें असें. लाक्षणिक अर्थानें कधीं कधीं त्या भांडयांत जें अन्न शिजवीत असत तें अन्न दर्शविण्याकरितांहि हा शब्द योजीत.
त्र्याशिर -- तीन मिश्रणांनी युक्त असा ह्याचा अर्थ असून हें सोमाचें विशेषण ऋग्वेदांमध्यें आलेंलें आहें. सायणाचार्याच्या मतें हीं तीन मिश्रणें म्हणजें दहीं, सक्तु व दूध हीं होत. अधिक बिनचूक रींतीनें सांगावयाचें तर हें व्याशिर म्हणजें दूध [ गवाशिर ] सातु [ यवाशिर ] व दहीं ( दध्याशिर ) हें तीन पदार्थ सोम रसांत मिसळण्याची चाल होती.
दधि -- 'नासकें दूध' अशा अर्थानें हा शब्द वारंवार ऋग्वेदामध्यें व पुढील ग्रंथांत आलेला आहें. शतपथ ब्राह्मणांत घृत, दधि, मस्तु ( दह्याचें पाणी ) व आमीक्षा ( दही ) असें शब्द क्रमानें आलेंलें आहेंत. दधि ह्याचा अर्थ अनेकदां दही असाहि आहे, व तें सोमरसांत मिसळीत असत.
१०धाना -- हा शब्द नेहमी अनेक वचनीं आलेला आहे व ऋग्वेदांत व उत्तरकालीन ग्रंथांत धान्याचें दाणे अशा अर्थानें ह्या शब्दाचा अनेकदां उल्लेख आलेला आहें. हें दाणें कधीं कधीं भाजून ( भ्रज्ज ) सोमरसांत मिसळीत.
११पक्ति -- संहितामध्यें याचा अर्थ शिजविलेला पदार्थ ( एका प्रकारची पोळी ) असा आहे. जो अन्न शिजवतो त्याला पक्त असें म्हटलेंलें आहें.
१२पक्व -- शिजविलेलें दूध किंवा अन्न अशा अर्थी सामान्यनाम म्हणून हा शब्द आलेला आहे. भाजलेल्या विटा असाहि ह्याचा अर्थ होतो.
१३पचन -- पक्ति प्रमाणें ह्याहि शब्दाचा अर्थ ऋग्वेद व मागाहून झालेंलें ग्रंथ ह्यामध्यें शिजविलेलें अन्न असा आहें.
१४पयस् -- या शब्दाचा अर्थ ऋग्वेद व मागाहून झालेले ग्रंथ ह्यामध्यें गायींचें दूध असा आहे. अधिक व्यापक अर्थ म्हणजे वनस्पतीत सांपडणारा रस ( ज्याचें योगानें झाडें झुडें वाढतात तो ) असा आहे. एका ठिकाणी स्वर्गांतलें पाणी असा ह्याचा अर्थ आहें. शतपथ ब्राह्मणांत कांही वेळ दुधावर राहण्याच्या व्रताचा उल्लेख आलेला आहें.
१५पान्त -- ऋग्वेदामध्यें अनेक वेळां हा शब्द आलेला असून त्याचा उघड अर्थ पिण्याचा पदार्थ असा आहे. पण गेल्डनेर म्हणतो कीं, एके ठिकाणी पान्त हें एका राजाचें नांवच आहें.
१६पितु -- ऋग्वेद व मागाहून झालेलें ग्रंथ ह्यामध्यें ह्या शब्दाचा अर्थ पुष्टिकारक अन्न किंवा पेय असा आहे.
१७पीयूष -- ऋग्वेद व उत्तरकालीन ग्रंथ ह्यांमध्यें गाय प्रसवल्यावर तिचें जें पहिलें दूध निघतें त्याला हा शब्द लाविलेला आहे. सामान्यपणें सोमरसालाहि हा शब्द लावितात.
१८प्रतिधा -- याचा अर्थ अवर्षण किंवा आकर्षण ( घोट ) असा दिसतो. ऋग्वेदाच्या एका वचनांत इंद्र एका प्रतिधेसरशीं तीस सरोवरांचें पाणी प्याला असें आलें आहे.
१९फल -- याचा सामन्यत: अर्थ फळ, विशेषत: झाडाचें फळ असा असून ऋग्वेद आणि तदनंतरच्या वाङमयांत याचा उल्लेख येतो.
२०मधु -- याचा अर्थ कोणतीहि खाण्याची गोड वस्तु व ऋग्वेदांत बहुधा एक प्रकारचें पेय ( मध व पाणी यापासून केलेली जालीम दारू ) असा होतो. मध व पाणी मिश्रित दारू असाहि होतो. कांही ठिकाणी 'सोम' किंवा 'दूध' अथवा 'मध' हा या शब्दाचा निश्चित अर्थ आहे. परंतु 'मध' ह्याच अर्थी हा शब्द वेदानंतरच्या वाङमयांत विशेष येतो. परंतु या मधाच्या उपयोगाविरूद्ध निषेध प्रदर्शित केलेला दिसतो.
२१मन्थ -- याचा अर्थ ऋग्वेद व तदनंतरच्या ग्रंथांत एक प्रकारचें पेय असा आहे. हें एक द्रव पदार्थ व इतर कांही घट्ट पदार्थ यांच्या संमिश्रणाने करितात. बहुधा हें सक्तु व दूध याचेंहि असतें. ह्या प्रकारची सर्व संमिश्रात पेयें शांखायन आरण्यकांत आली आहेत.
२२मांस -- वेदांत मांस खाणें अगदी सामान्य असावें असें दिसतें. त्यांत कोठेंहि 'अहिसेचा' उल्लेख येत नाहीं. धार्मिक विविधप्रसंगी मांसाच्या आहुती देव खावोत असें म्हणतांत. शिवाय ब्राह्मण तो पदार्थ स्वत: खात असत. आणि पाहुण्यांच्या पाहुणचाराप्रीत्यर्थ एक 'मोठा बैल' (महोक्ष) किंवा बोकड (महोज) मारावा असें स्पष्ट म्हटलेंलें आहे. शिवाय अतिथिग्व याचा अर्थ अतिथिसत्कारार्थ गोहनन करणें हाच असावा. महर्षि याज्ञवल्वय हा दुभत्या गायींचें किंवा बैलाचें ( धेन्वनडुह ) अस्सल मांस खात असें. यज्ञांत अगरत्यांनी १०० बैल मारले म्हणून त्यांच्या नांवाचा गौरव केला आहे. लग्नप्रसंगी खाण्याप्रीत्यर्थ म्हणून बैलांना मारीत असत. उलटपक्षी ऋग्वेदांत गाईला हळू हळू पावित्र्य येत चाललें होतें असें ब-याच उता-यांवरून दिसून येते. कारण तिला अघ्न्या असें पुष्कळ ठिकाणीं म्हटलें आहें. परंतु एवढयावरून मांसभक्षण मना होतें असें समजतां येत नाहीं. पौराणिक गोष्टींचा विचार बाजुला सारला असतां (गो हीच पृथ्वी किंवा अदिती. ही गायीसंबंधी-पृथ्वि किंवा अदिति आढळून अशी-कल्पना सर्वथैव ब्राम्हणांनी आपल्या बुद्धिबलानें निर्माण केली असें म्हणतां येत नाहीं. याला दुसरीहि कांही कारणें असावीत. ) आपणांस असें आढळून येईल कीं खाण्याव्यतिरिक्त गाईचें दुसरें पुष्कळ महत्वाचें उपयोग होते, व त्यामुळें तिला पावित्र्य येणें अगदी रास्त होतें व गाईच्याहि पावित्र्याचा उगम पाहू गेलं असतां आपणांला तो शोधण्यासाठी इंडोइराणियन, आर्यन लोक ( म्हणजे हिंदुस्थानातील आर्यन् व इराणातींल आर्यन हें जेव्हां एकेठिकाणी रहात असतं तेव्हां ) यांच्या कालाकडें धांव घेतली पाहिजें इतका तो जुना आहें. शिवाय प्रेतदहनप्रसंगी तर गोमसि अवश्य लागत असें; कारण तेव्हां प्रेत मांसानें आच्छादण्याचा ( अनुस्तरणी ) प्रघात  ( परिपाठ ) होता. वेदकालीन हिंदूचें अन्न निदान यज्ञप्रसंगीच्या बलींच्या यादीवरून तरी काय असावें हें सहज ताडतां येतें. कारण जें मनुष्य खाई ते ती देवास अर्पण करी:- म्हणजे बोकड, मेंढ्या, बैल यांचे मांस खाण्यात येत असे. अश्वमेध यज्ञ मात्र घोड्याचे मांस भक्षण करीत असत याचे द्योतक समजता येत नाही. तरी पण कदाचित ते अश्वभक्षकही असतील. कारण निरनिराळ्या काळी आणि निरनिरिळ्या देशात प्रचलित असलेल्या अश्वमांसभक्षणाच्या चालीकडे आपणास अगदीच कानाडोळा करुन चालतां यावयाचे नाही. ओल्डेनबर्ग या ठिकाणी असा युक्तिवाद लढवितो की, अश्वमेध करण्याच्या योगाने काही मांत्रिक सामथ्य, त्याचप्रमाणे घोड्याची गति आणि स्फुरण देव आणि त्याचे याज्ञक-भक्त यांनां प्राप्त होत असावे. या मांसाशनास कोणत्याहि प्रकारचा सार्वत्रिक निषेध केला होता असे वाटत नाही. कधी कधी मांसाहाराचा निषेध आहे. उदाहरणार्थ, जेव्हां एखादा  एखादे व्रत करीत असेल तर किंवा जेव्हा मांस त्याज्य मानले असले तर कारण अथर्ववेदांत एका ठिकाणी मांसाला सुरेच्या दावणीत बांधले आहे व तेथे त्याला मादक दारु प्रमाणे वाईट मानले आहे. ऋग्वेदांत गोहनन अघाच्या वेळी होते असे दिले आहे. ( हा अघा शब्द मघाचे बुध्या केलेले रूपांतर आहे.) आणि ज्या वेळी केवळ गायींचे बळी देत असत त्या प्रसंगीहि मृत्यु आणि अंधार यांच्या स्वाभाविक सहवासामुळेच ही गोष्ट होत असावी. शिवाय ब्राह्मण जो या लोकी दुस-यास खातो, त्याला दुस-या लोकात खातात असे तत्व आले आहे. पण येवढ्यावरुनच काही मांस खाण्यास धार्मिक अथवा नैतिक अमान्यता आहे असे म्हणता येणार नाही. आता ही गोष्ट खरी की, वरील मतहि यांत द्दग्गोचर होते व ब्राह्मणग्रंथात विशदपण दिसणा-या ‘सर्व जग हे एक आहे’ “अखिलमिदम्ब्रह्म” या तत्वाशी वरील मत बरेच जुळते आहे. परंतु अहिंसा तत्व उत्पन्न होण्यास पुनर्जन्माचे तत्वाचा जन्म ब्राह्मणांच्या मागाहुन झालेला आहे.

२३यवाशिर -- हा शब्द ऋग्वेदांत सोमाचें विशेषण म्हणून वापरला आहें. याचा धान्यामश्रित असाहि अर्थ आहें.
२४रसाशिर -- हा शब्द ऋग्वेदांत सोमाचें विशेषण, या अर्थी आहें. दुग्धमिश्रित अशा अर्थानेहि येतो.
२५सर्पिस् -- याचा अर्थ वितळलेलें लोणी असा आहे. मग लोणी द्रव स्थितीत असो किंवा घन स्थितींत असो. सेंट पीटर्सबर्गकोशाच मतानें सर्पि: व घृत यांत फारसा फरक नाहीं. ऐतरेयब्राम्हणांवरील भाष्यांतील सायणांचा 'सर्पिस् हें द्रव स्थितींत असतें व घृत हें घन स्थितीत असते' हा भेद रॉथला मान्य नाहीं. हा शब्द ऋग्वेद व मागाहून झालेल्या ग्रंथांत वारंवार आलेला आहें.
२६सुरा -- उन्मादक अशा पेयाचें हें नांव आहें. हा शब्द ऋग्वेद व तदुत्तर वैदिक वाङमयात नेंहमी येतों. कांही ठिकाणीं या पेयाचा निषेध केलेला आहें. अथर्ववेदांमध्यें मांसभक्षण घृत या महापातकांबरोबर याची गणना केलेली आहे व घृताबरोबर वारंवार याचा उल्लेख आलेला आहे. सोम याच्या उलट सुरा ही नित्य पिण्यापैकी एक पेय गणली गेली होती. सभेतंल्या लोकाचें हे एक पेय होते व त्यामुळें नेहमीं भांडणें होत. ही सुरा कशा प्रकारची होती हें सांगणें कठिण आहे. एगलिंग म्हणतो त्याप्रमाणें ही सुरा धान्य किंवा वनस्पति कुजवून बनलेली असें किंवा व्हिटनें म्हणतो त्याप्रमाणें एक प्रकारच्या सातपासून तयार केलेली ही दारू किंवा 'एल' दारूसारखी ही दारू असावी. गेल्टनेरच्या मतानें हीं ब्रँडीसारखी असावी . ह्या सुरेंचा उल्लेख मधुबरोबर कधीं कधीं येतो. ही चामडयांत ठेवीत असत व ही निरनिराळें लोक पीत. ( विभाग २ पृष्ठ १२१ पहा. )
२७कनक्रक -- हा शब्द अथर्ववेदांत आहे. ह्याचा अर्थ एक तर विप असा असावा, किंवा अथर्वांतीलच काण्डविष नांवाच्या एका विषाच्या जातीचें तें विष असावें. पिवळया धोत-याला कनक असें नांव आहे व तो विषारीहि आहें. कनाक्रक म्हणजे पिवळया धोत-याचें विष असण्याचा संभव आहें.
२८कीलाल -- 'मधुर पेय'. हा शब्द अथर्व व इतर संहितांत आहे; पण ऋग्वेदांत मात्र नाहीं. ज्या अर्थी सुराकार ( सुरा करणारा ) हा पुरूषमेधातील बळींच्या यादींत कीलाल ह्याला अर्पण केला आहे त्या अर्थी सुरेच्या सारखेच तें काहीं तरी पेय असलें पाहिजें. बहुतकरून झिमरच्या म्हणण्याप्रमाणें ही एक प्रकारची दारू असावी.
२९गर -- म्हणजे विष. अथर्ववेदांत 'गरगीर्ण' ( विष दिलेला ) या समासात गर हा शब्द आहें. शतपथब्राह्मणामध्यें त्याचा अर्थ पातळ पदार्थ असा आहे. गर म्हणजे कोणतेहिं जालिम विष मंद करून तयार करितात तें किंवा कृत्रिम विष होय.
३०तिर्य, तिरिय -- अथर्ववेदांमध्यें करंभाचें ( पेज ) नांव म्हणून हा शब्द आलेला आहें. हा शब्द बहुतेक तिल्य ( तिळांपासून झालेलें ) ह्याचा समानार्थवाचक असावा असें रॉथ व व्हिटने यांचे मत आहे. पण तिरिथ ह्याचा अर्थ रॉथच्या मतें एका प्रकारचा तांदूळ असा आहे. हा तिरिय शब्द राजनिघंटूमध्यें आलेला आहें.
३१तैल -- ( तिळाचें तेल ) हा शब्द अथर्ववेदांत आला आहे व त्या ठिकाणी हें तेल घटामध्यें ठेविलें असल्याचा उल्लेख आहे. शांखायन आरण्यकामध्यें तैलाभ्यग करण्याबद्दल उल्लेख आलेला आहें.
३२तौल -- हा पाठ अथर्ववेदांच्या मूळांत आहे. हें रूप कसे झालें व ह्याचा अर्थ काय हे निश्चित समजणें शक्य नसल्यामुळें हा तौल शब्द म्हणजें तैलच असावेसें वाटतें.
३३पंचौदन -- अथर्ववेदामध्यें हें विशेषण आलेंलें आहें. पांच प्रकारच्या तांदुळाचें शिजवून अन्न करण्याचा उल्लेख त्याच संहितेंत आलेला आहें.
३४परिसृत -- अथर्ववेदांत प्रथमच उल्लेखिलेल्या एका पेयाचें हे नांव असून ते सुरा व सोम यांपेक्षा निराळें असून शिवाय मादक असें होतें. महीधराचार्याच्या मतानें हें पेय फुलांपासून करीत असत. झिमर महणतो की हें कौटुबिंक पेय होतें व हें खरेहि वाटतें; कारण अथर्ववेदामध्यें हें घरगुती पेय होते असें दोनदां म्हटलें आहें. हिलेंब्रँटचें मतें हें पेय व सुरा यांत फारसा फरक नाहीं.
३५पिशित -- अथर्ववेद व उत्तरकालीन ग्रंथ यांमध्यें कच्चें मांस अशा अर्थानें हा शब्द आलेला आहें. अथर्ववेदांत एके ठिकाणी याचा अर्थ लहान तुकडा असा आहे. पण पीटर्सबर्गकोशांत असें सुचविलें आहे की, पिशित हा शब्द पिषित म्हणजे पिष्ट ( कुटलेंलें कण ) याबद्दल आलेला असावा.
३६पूल्यअ. पूल्प -- याचा अर्थ अथर्ववेदांत भाजलेंलें धान्य ( लाजा ), लाह्या असा असावा.
३७प्रतिदुह् -- ह्याचा विशेष अर्थ ताजें दूध असा आहें. पुढील संहिता व ब्राह्मण यांतून धारोष्ण दूध हा याचा अर्थ आढळतों.
३८लवण -- मीठ या अर्थानें हा शब्द ऋग्वेदांत मुळींच आलेला नाहीं. अथर्ववेदांमध्यें फक्त एकदांच आलेला आहें. उत्तरकालीन ब्राह्मणग्रंथांत हा आलेला आहे व तों अत्यंत किमतीचा आहे असें म्हटलें आहें. आर्य लोक प्रथम जेंथें आलें तीं ठिकाणें जर पंजाब व सिंधु नदीची थडी अशीं मानली-- व तेंथें तर मिठाच्या खाणी आहेत -- तर मिठाचा उल्लेख पूर्वीच्या ग्रंथांत बिलकूल कसा नाहीं याचें आश्चर्य वाटतें. तेव्हां प्रथम आलेल्या आर्याचें वसतिस्थान कुरूक्षेंत्र मानलें तर तें कांही निखाल्स चूक होईल असें वाटत नाहीं. तथापि अशीहि कल्पना करणें शक्य आहें की, मिटासारख्या नित्याच्या वस्तूचा उल्लेख ज्या ठिकाणी ती फार उपलब्ध आहें त्या ठिकाणी ग्रंथांत नाहीं झाला तर त्यांत फारसें नवल नाहीं. साधारण अशींच रीति दिसून येते की, जेंथें जी वस्तु दुष्प्राप्य असते त्या ठिकाणी तिचें महत्व पराकाष्ठेंचें असून तिचा नामनिर्देश होत असतो.
३९विष्टारिन -- अथर्ववेदांत ओदनाच्या एका विशिष्ट प्रकाराचा या नांवावरून बोध होतो.
४०व्रत -- उत्तरकालीन संहिताग्रंथांत व ब्राह्मणंग्रंथांत एखाद्या व्रत अथवा तप आचरणा-या माणसानें इतर कांही खावयाचें नसल्यानें वापरावयाचें दूध असा याचा विशिष्ट अर्थ आहें.
४१शालूक -- अथर्ववेदांमध्यें याचा अर्थ कमळाची ( खाण्याची ) फळें असा आहें.
४२उपवाक -- वाजसनेयि संहितेंत व ब्राह्मणांत एक प्रकारचें धान्य असें याचें वर्णन आहें. नंतर त्याचा अर्थ इंद्रयव असा करितात -- टीकाकार महीधर सर्वसाधारण यव असाच अर्थ करितों. वाजसनेयि संहितेप्रमाणें करंभामधील मुख्य अंश किंवा भाग उपवाककणांचा ( सक्तव: ) उल्लेख शतपथांत आहें.
४३बदर -- कुवल आणि कर्वेधूप्रमाणें हा एक बोरांचा प्रकार आहें. याचा यजु:संहिता व ब्राह्मण यांमध्यें संबंध आलेला आहें.
४४मासर -- वाजसनेयिसंहितेंत मादक पेय या अर्थी या शब्दाचा उल्लेख केला आहें. कास्यायन श्रौतसृत्रामध्यें हें तयार करण्याच्या रीतीचें वर्णन आलें आहें. हे पेय तांदूळ व तृण भाजून ते जव व श्यामक यांत मिसळून तयार करीत असत असें दिसतें.
४५लाजि -- वाजसनेयि संहितेमध्यें ( २३.८ ) व तैत्तिरीय ब्रह्मणांत हा अनिश्चित अर्थाचा शब्द आढळतो. सायणाचार्याच्या मतें हीं लाजिनची संबोधनविभक्ति आहें. ( लाजिन = तव्यावर भाजलेले धान्य ) महीधराचार्याच्या मतें ह्याचा अर्थ तव्यांवर भाजलेल्या धान्याची राख असा आहें.
४६लाज -- वाजसनेयिसंहिता व ब्राह्मणग्रंथ यांत हा शब्द पुलिंगी अनेकवचनी व तव्यावर भाजलेले धान्य  ( लाह्या ) या अर्थानें आला आहें.
४७कृसर -- तांदूळ आणि तीळ यांच्या मिश्रणानें केलेंलें अन्न अशा अर्थानें हा शब्द पंचविशब्राह्मण व सूत्रग्रंथांत आलेला आढळतो.
४८क्षीरौदन -- दुधांत शिजवलेलां भात असा याचा अर्थ असून हा शब्द शतपथ ब्राह्मणांत आढळतों.
४९तिरश्चीनवंश -- ( आडवीं दांडी ) हा शब्द छांदोग्योपनिषदांत मधाचें पोळें हा अर्थ सुचवितो.
५०पान -- शतपथब्राह्मण व उपनिषद्ग्रंथांत एक प्रकारचें पेय या अर्थानें हा शब्द आला आहें.
५१तिष्ट -- हा शब्द नपुंसकलिगीं असून ब्राह्मणग्रंथांत पीठ किंवा अन्न अशा अर्थानें आलेला आहे व अथर्ववेदांत कुटलेलें माष या अर्थानें आलेला आहें.
५२फाण्ट -- याचा अर्थ शतपथब्राह्मणांत लोणी घुसळतांनां त्याचें प्रथम तयार होणारे परमाणू किंवा विस्कळित झालेलें [ शितडलेंलें ] लोणी असा आहें
५३बल्कस -- शतपथ ब्राह्मणांत याचा अर्थ फसफसणा-या स्थितींत असलेलें अशुद्ध द्रव्य असा आहे. याचा खरा अर्थ कदाचित् पापुद्रा, साय, गाळ असा किंवा कोंडा, भुसा असा जो धान्यांतील टाकाऊ भाग तोहि असावा.
५४मद्य -- मादक दारू. हा शब्द छांदोग्योपनिषदापर्यंत कोठेंहि आढळत नाहीं. तेंथें मात्र 'मद्यपी' मद्य पिणारा या शब्दांत प्रथम आढळतों.
५५मांसौदन -- हा एक मांसमिश्रित भाताचा प्रकार असून या पक्कान्नाचा शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आढळतों.
५६वृक्ष्य -- शतपथ ब्राह्मणांत झाडांचें फळ या अर्थानें हा शब्द आला आहें.