प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
असुर
असुर विशेषनामें व विशेषणें [ॠग्वेद] |
१करंज :- ॠग्वेदांत इंद्राचा शत्रु या अर्थानें दोन वेळ आला आहे. परंतु हा मनुष्य की राक्षस होता हें सांगतां येत नाही. सूत्रग्रंथांत हा शब्द एका झाडाचा दर्शक म्हणून आला आहे
२चुमुरि:- हें दभीतीच्या शत्रूचें नांव आहे. याचें व याचा मित्र धुनि अशा दोघांची नावें ॠग्वेदांत इन्द्रानें त्यांचा पराभवं केला म्हणून आली आहेत. इतर ठिकाणी या जोडीचा शंबर, पिप्रु आणि शुष्ण या तीन नांवांबरोबर (इंद्राने त्यांचा पराभव करुन त्यांचे किल्ले नष्ट केले म्हणून) उल्लेख आला आहे. हे लोक खरीं माणसें आहेत किंवा दानव आहेत हें ठरविणें अशक्य आहे. पण मनुष्याबद्लच ही नांवे असावी अशाबद्ल एकच अनुकूल पुरावा आहे तो हा की चुमुरि हें रुप अनार्य मनुष्यांच्या नांवाचें द्योतक आहे.
३जरुथ:- ॠग्वेदामध्यें हा शब्द तीन वेळा आला आहे व त्याचा अर्थ ४अग्नीनें पराभूत केलेला एक राक्षस' असा आहे. लुडविग्ली व ग्रिफिथला हें मत ग्राह्य आहे. हा एक शत्रु असून तो लढाईंत मेलेला आहे. या लढाईंत ॠग्वेदाच्या सातव्या मंडलाचा कर्ता वसिष्ठ हा पुरोहित होता.
४दुर्णामन् :- 'ज्याचें नांव वाईट झालेलें आहे' असा याचा अर्थ असून ॠग्वेदांत व अथर्व वेदांत रोग उत्पन्न करणा-या एका राक्षसाचें किंवा एका रोगाचें हें नांव आहे. निरुक्ताप्रमाणें याचा अर्थ किडा असा असावा व हा अर्थ किडे अनेक रोग उत्पन्न करतात अशी जी समजूत आहे तिला धरुनच आहे. सुश्रुतादि वैद्यक ग्रंथांत दुर्णामन्चा मूळव्याध असा अर्थ आहे.
५दृभीक:-हें नांव एका माणसाचें किंवा राक्षसाचें असून याला इन्द्रानें ठार मारलें अशी हकीकत ॠग्वेदांत आली आहे.
६धुनि:- इंद्राच्या शत्रूंचें हे नांव आहे. याचें नांव चुमुरिबरोबर ॠग्वेदांत आलें आहे. हे दोघे दभीतीच्या उलट होते असें दिसतें. एतद्देशीय मूळ लोकांच्या मुख्याचें बहुतेक हें नांव असावें.
७पणि :- ॠग्वेदांत देवास हवि न देणारा व ब्राह्मणास दक्षिणा न देणारा पण श्रीमंत मनुष्य असा या शब्दाचा अर्थ आहे. अशा त-हेचा मनुष्य मंत्रकर्त्या ॠषीनां प्रिय होणें कधींहिं शक्य नव्हतें म्हणून देवांनां पणी लोकांवर हल्ला करण्यासाठीं विनंति केल्याचा व त्यांची कत्तल होऊन पराभव झाल्याचाहि उल्लेख आलेला आहे. पणि हा यज्ञ करणा-यांच्या उलट, पक्का कवडीचुंबक व द्वेष करण्यास योग्य अशा अर्थानें त्याला वृक म्हटलें आहे. कांही ठिकाणीं पणी हे काल्पनिक पुरुष दिसतात. हे राक्षस असून यांनीं आकाशांतील पाणी व गाई यांना अडवून ठेविलें म्हणून इन्द्राकडून सरमा त्यांच्याकडे गेली अशी कथा ॠग्वेदांत आहे. पणींमध्यें बृबु हा श्रेष्ठ होता.
८पर्णय:- ॠग्वेदांत दोन ठिकाणीं हें नांव आलें असून तें लुडविग म्हणतो त्याप्रमाणें एकाद्या वीर पुरुषाचें किंवा इन्द्रानें पराभव केलेल्या राक्षसाचें असावें.
९पिप्रु :- ॠग्वेदांत इन्द्राच्या शत्रूचें हें नांव आलेलें आहे. ॠजिश्वनाकरितां इंद्रानें याचा वारंवार पराजय केलेला आहे. याच्या ताब्यांत बरेच किल्ले होते व हा असुर असून दास होता. याचा संबंध नेहमी काळया लोकांशीं असल्यामुळें याची प्रजा काळी होती असें याचें वर्णन आलें आहे. रॉथ म्हणतो त्या प्रमाणें (पिप्रूला असुर हें नांव असल्यामुळें रॉथला असें म्हणण्यास आधार आहे) हा राक्षस होता किंवा लुडविग, ओल्डेनबर्ग व हिलेब्रँट म्हणतात त्याप्रमाणें मानवी शत्रु होता हें निश्चयानें सांगतां येणें शक्य नाही. पृ या धातूपासून हा शब्द आला असल्यामुळें याचा अर्थ प्रतिरोध करणारा असा होऊं शकेल.
१०मृगय :- ॠग्वेदांत अनेक उता-यांत याचा उल्लेख आला आहे. व त्याचा इन्द्रानें पराभव केला असेंहि त्यांत म्हटलें आहे. तो मनुष्यद्रोही होता हें लुडविगचें मत चुकीचें आहे. तो मृगाप्रमाणें राक्षस होता हें मात्र खरें.
११रौहिण :- याचें नांव ॠग्वेद व अथर्ववेद यांमध्यें इन्द्राचा शत्रु दानव म्हणून आलें आहे. हिलेब्रँटच्या मतें या शब्दावरुन रोहिणी नक्षत्राचा बोध होतो. पण असें मानण्यास चांगलासा आधार नाही.
१२वंगृद:- ॠग्वेदांत मानवशत्रु किंवा राक्षस याचें हें नांव आहे.
११वर्चिन् :-ॠग्वेदांत इन्द्राच्या शत्रूचें हें नांव आलेलें आहे. या शत्रूला दास असें म्हटले आहे व त्याचें नांव शंबराबरोबर आलेलें आहे म्हणून त्याला जरी असुर म्हटलें आहे तरी तो या पृथ्वीवरील शत्रु असावा असें वाटतें. याचा वृचीवंताशींहि संबंध असावा.
१४वेतसु:- ॠग्वेदांत दोन ठिकाणीं एकवचनीं व एके ठिकाणीं अनेकवचनीं हा शब्द एका माणसाचें नांव म्हणून आला आहे. याचा इन्द्रानें एकदा पराभव केला असें म्हटलें आहे पण तो राक्षस होता असें मानण्यास कारण नाही. झिमरच्या मतें वेतसु हीं एक जात होती व दशद्यु हा या जांतीतीलच एक मनुष्य होता व त्यांनीं तुग्रांचा पराभव केला. परंतु हे उल्लेख असलेल्या ॠचा इतक्या दुर्बोध आहेत कीं त्यावरुन कांहीएक अर्थ निश्चित होत नाहीं.
१५वेश :- ॠग्वेदांत दोन अर्थी हें विशेषनाम आलें आहे. हें जर खरें असेल तर हें विशेषनाम राक्षसाचें आहे किंवा दुस-या कोणाचें आहे हें सांगणें कठीण आहे.
१६शंबर:-ॠग्वेदांत इन्द्राच्या शत्रूचें हे नांव आलेले आहे. याच्या बरोबर शुष्ण, पिप्रु, वर्चिन् ही नांवे आलीं आहेत. शंबराला एका ठिकाणी कुलितराचा मुलगा दास असें म्हटलें आहे. दुस-या एका स्थलीं आपण देवक (जवळ जवळ देवाप्रमाणें) झालों असें त्याला वाटल्याचा उल्लेख आहे. त्याचीं ९०,९९ किंवा १०० नगरें होतीं असें वर्णन आहे. हा शंबर शब्दच नपुंसकलिंगी अनेकवचनीं शंबराचे किल्लें अशा अर्थानें वापरला आहे. याचा मुख्य शत्रु आतिथिग्व दिवोदास हा होय, कारण या दिवोदासानें इन्द्राच्या मदतीनें शंबराचा पराभव केला. शंबर हा कोणी खरा पुरुष होऊन गेला कीं नाहीं याबद्ल शंकाच आहे. हिलेब्रँटचें असें मत आहे कीं, दिवोदासाचा शत्रु म्हणून हा एक सरदार होता. तयाची मदार शंबराच्या नांवाच्या आंकड्यावर आहे आणि तो म्हणतो कीं, दिवोदासाचे वेळीं ॠग्वेदीय सूक्तांत तो खराखुरा शत्रु मानला आहे. पण मागाहून झालेल्या सूक्तांमध्यें उदाहरणार्थ सातव्या मंडलांत त्याला राक्षस बनवलें आहे. कारण वैदिक काळचे लोक अरेकोशिया देश सोडून हिंदूस्थानांत आले होते ही विचारसरणी जरी सोडून दिली तरी हिंदुस्थानांतल्या डोगरांत राहणा-या लोकांचा हा नायक असून शत्रु असावा हें शक्य आहे.
१७सृविंद:- ॠग्वेदामध्यें इन्द्राच्या शत्रूचें हें नांव आलेलें आहे. याचा अर्थ खराखुरा शत्रु असा असावा, कारण त्याची संस्कृत व्युत्पत्ति उपलब्ध नाहीं.
१८स्वर्भानु:- ॠग्वेद व मागाहून झालेल्या ग्रंथांत सूर्याला ग्रासणा-या राक्षसाचें म्हणून हें नांव आलेलें आहे.
१९मर्क:- तैत्तिरीय, वाजसनेयी, मैत्रायणी वगैरे संहिता ग्रंथांत शण्डाप्रमाणेंच असुरांचा हा पुरोहित होता असें वर्णन आलें आहे. मर्काचा उल्लेख ब्र्राह्मण ग्रंथांतूनहि आला आहे. हिलेब्रँट व हापकिन्स यांचें म्हणणें मर्क हा शब्द बहुधा इराणियन वळणावर असावा. तसेंच ॠग्वेद व इतरत्र आलेल्या गृध्र आणि मर्क या शब्दांत पूर्ण ऐक्य असावें असेंहि हिलेब्रँटचें मत आहे. याला महीधरानें (वा.सं. ७.१६ वरील टीका) शुकपुत्र म्हटलें आहे. परंतु त्याला सबळ पुरावा नाहीं.
२०ॠक्षीका :- अथर्ववेद, वाजसनेयी संहिता आणि शतपथ ब्राह्मण यांत हा शब्द आला असून त्याचा अर्थ राक्षस असा आहे. तथापि हरिस्वामी शतपथ ब्राह्मणावरील टीकेंत ॠक्ष या शब्दाशीं याचा संबंध जोडून त्याचा अर्थ अस्वल असा करतो.
२१तिरीटिन् :- अथर्ववेदांत हा शब्द आला आहे व तो एका राक्षसाला लाविलेल्या तिरीटिन् या विशेषणापासून बनला आहे. झिमर, व्हिटने वगैरे पंडित व एतद्देशीय कोशकार यांच्या मतें याचा अर्थ मुकुटानें शोमलेला अथवा शिरोभूषण असा आहे.
२२तौविलिका :-अथर्ववेदांत हा शब्द आला असून त्याचा अर्थ अनिश्चित आहे. रॉथच्या मतें याचा अर्थ पशुविशेष असा असावा. झिमर व व्हिटने यांच्या मतें हें एक लहान झाड असावें. सायणाचार्याच्यामतें याचा अर्थ रोगोत्पादक राक्षस असा असावा. ब्लूमफील्ड यानें याचा अर्थ संदिग्ध ठेवला आहे.
२३राहु:- सूर्याला ग्रासणारा एक राक्षस. अथर्ववेदांत याचा उल्लेख आला आहे. पाठ जरा अनिश्चित आहे परंतु तेथें तो उल्लेख राहूस उद्देशूनच आला आहे.
२४जंभक:- हें एका राक्षसाचें नांव असून तो व जंभ रोग उत्पन्न करणारा हे दोघे एकच. याचा वाजसनेयी संहिता व शांखायन आरण्यक या ग्रंथांतून उल्लेख आलेला आहे.
२५देवमलिम्लुच:- 'देवांचा चार' हा शब्द रहस्याचें विशेषण आहे. पंचविंशब्राह्मणांत मुनिमरणनामक स्थलीं वैखानस नांवाच्या पवित्र ब्राह्मणाला त्यानें ठार मारिलें असा उल्लेख आलेला आहे. तो राक्षस होता असें उघड दिसतें. पण तो मनुष्यहि कदाचित् असावा.
२६पार्थश्रवस् :- 'पृथुश्रवस् चा वंशज' जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत एका राक्षसाचें म्हणून हें नांव आलें आहे.
२७विभिंदुक:- पंचविंशब्राह्मणांत एका राक्षसाचें किंवा माणसाचें म्हणून हें नांव आलें आहे. याच नांवाच्या माणसापासून मेघातिथीनें गाई हांकून नेल्या अशी कथा आहे. हॉपकिन्सच्या मतें हा शब्द मेघातिथीचें पितृप्राप्त नांव वैभिंदुक असें असावें.
२८सनक:- जैमिनीय ब्राह्मणांत उल्लेखिलेल्या विभिंदुकीयांच्या यज्ञामध्यें भाग घेणा-या दोन काप्यांपैकीं (यांपैकी एक नवक होता) एकाचें हें नांव आहे. लुडविगच्यामतें ॠग्वेदांतील (१.३३,५) एका ठिकाणीं या सनकांचा अयाज्ञिक म्हणून उल्लेख आला आहे. पण त्याबद्ल बराच संशय आहे.