प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

 अश्वमेध यज्ञांतील पशू [ तै. सं. ] / पुरुषमेध यज्ञांतील पशू [ सं. वा. ]

अजगर - (अजभक्षक). हें नांव अथर्ववेद आणि यजुर्वेदसंहितांमध्ये अश्वमेधांत बळी दिल्या जाणा-या प्राण्यांच्या यादींत आहे. दुस-या ग्रंथांत त्याला वाहस् असें म्हटलेलें आढळतें. पंचविंश ब्राह्मणांत सर्पाच्या सत्राचें वर्णन आहे, तेथें याला मनुष्य असे म्हटलें आहे.
अन्यवाप - (''दुस-याकरितां पेरणें''). दुस-या पक्ष्यांच्या घरट्यांत आपली अंडी ठेवण्याच्या संवयीमुळे कोकिल पक्ष्याला हा शब्द योजितात. तैत्तिरीय संहितेंत अश्वमेधाच्या पशूमध्यें हा शब्द आला आहे.
अति - पाण्यांतील पक्षी पुरूरवस् आणि उर्वशी यांची जी दंतकथा आहे, तीतीतंल अप्सरा आति म्हणजे बहुतकरून राजहंसाप्रमाणें पुरूरव्यास वाटल्या. अश्वमेधांत जी प्राण्यांची यादी आहे तीत या पक्ष्याचाहि उल्लेख आहे. आणि तेंथे टीकाकार महीधर त्याचा अर्थ नंतर ज्यांनां आडी म्हणतात ते पक्षी, असा करितो, आणि सायण एक उतारा देऊन म्हणतो की त्याचा अर्थ चाष असा होतो.
उद्र - यजुर्वेद संहितेंत अश्वमेधीय प्राण्यांच्या यादींत याचें नांव आहे. याचा अर्थ महीधर खेंकडा असा देतो व सायण पाणमांजर असा देतो.
ककर - यजुर्वेदाच्या कठ, मैत्रायणी व वाजसनेयिं संहिता, यांत अश्वमेधीय बळींचे यादींत हें नांव आहे. टीकाकार महीधर याच्या भाष्यावरून हा एक पक्षी असावा असें वाटतें.
 ६कालका -- अश्वमेधीय बलींचे यादीत एक पक्षी अथवा सरडा, अशा अर्थानें उल्लेख आहे.
 ७कुण्ड् ऋणाची (घूस) -- अश्वमेधीय बळीचें यादीत या अज्ञात स्वभावाच्या प्राण्याचें नांव आलें आहे. याचा ऋग्वेदांत एका ठिकाणी उल्लेख असून त्याचा पक्षी असा अर्थ असावा. सायण ऋग्वेदभाष्यामध्यें ' वांकडया तिकडया गतीचा (कुटिलगति) असें त्याचें भाषांतर करितो व तैत्तिरीय संहितेवरील टीकेंत गृह-गोधिका असा अर्थ करतो.
कुम्भीनस -- ( 'घट-नासी' ) अश्वमेधीय बळींच्या यादींत या प्राण्याचा उल्लेख आहे. बहुतकरून, नंतरच्या वाड्:मयाप्रमाणे, एक प्रकारचा सर्प असाहि याचा अर्थ असावा.
कुलीका, कुलीकय -- अश्वमेधीय बळीच्या यादींत हें एका पक्ष्यांचें नांव आहें. मैत्रायणी संहितेंत याचें पुलीका असें रूप् आढळतें.
१०कुलुंग -- अश्वमेधीय बळींच्या यादींत याचा उल्लेख आहे. हें एका पशूचें बहुतकरून काळवीटाचें नांव आहे.
११कृकवाकु -- अथर्ववेदांत बक-या, मेंढया आणि इतर माणसाळलेले प्राणी यांच्या बरोबर हें कोंबडयांचें नांव आलें आहे. म्हणून तोहि प्राणी माणसाळलेला असावा. अश्वमेधीय बळींच्या यादींत तो सवितृ याला अर्पण केला आहे व यास्काचार्यांनीहि तसेंच स्पष्टीकरण केलें आहे. भाष्यकार महीधर ताम्र-चूड, 'लाल शेंडीचा' असें स्पष्टीकरण करतो. अर्थातच तो ध्वन्यनुकरण शब्द ( कृक = ओरडणारा ) आहे.
१२कृकलास -- अश्वमेधीय बळींच्या यादींत आणि नंतरच्या वाड्:मयांत 'सरडा' या अर्थी हा शब्द आलेला आहे. ब्राह्मणांत कृकलासी म्हणजे सरडी असा पाठ आहे.
१३क्कयि -- अश्वमेधीय बळींचें यादीत, हें एका जातींच्या पक्ष्यांचें नांव आहें. मैत्रायणी संहितेतील पाठ कुवय असा आहे. सायणाच्या मतें पशु असा याचा अर्थ आहें.
१४गोमृग -- अश्वमेधीय बळींचें यादींत याचा एका बैलाची जात म्हणून उल्लेख आहे. तैत्तिरीय संहितेंत तो जंगली असावा असें दर्शित होतें. यावरून तो अर्धवट माणसाळलेला असावा किंवा प्रथम जंगली असून नंतर त्याला माणसाळवीत असत. या प्राण्याच्या नांवाशी ऋग्वेदांतील जंगली मृगमहिषाची तुलना होण्यासारखी आहे.
१५जहका -- या शब्दाचा अर्थ केंसाळ मांजर असा आहे; व याचा अश्वमेधीय बलीमध्यें उल्लेख आहे. सायणाचार्यांच्या मतें याचा अर्थ बिळांत राहणारा कोल्हा असा आहे.
१६नकुल -- 'मुंगूस' अथर्ववेदामध्यें सर्पाचे दोन तुकडे करून पुन: जोडणारा असें याचें वर्णन आलेलें आहे. सर्पदंषावर असणा-या उपायांचे त्याला ज्ञान आहे ही गोष्ट उल्लेखिलेली आहे. अश्वमेधीय बलींचें यादींत याचें नांव आलेलें आहे.
१७पित्व किंवा पिद्व -- यजुर्वेद संहितेमध्यें अश्वमेधीय बलीचें यादींत एका प्राण्याचें हें नांव आलेलें आहें. तैत्तिरीय संहितेंवरील टीकेत टीकाकाराच्या मतानें या शब्दाचा अर्थ सिंह असा आहे. कदाचित् पित्व व पेत्व हें दोन्ही शब्द एकच असूं शकतील.
१८पुरूषमृग -- मानवी रानटी पशु. यजुर्वेदांत अश्वमेधीय बळींच्या यादींत याचा उल्लेख होतो. झिमरच्या मताप्रमाणे तो वानर असावा. आणि तेंच मत शक्य दिसतें. त्याच्याच मताप्रमाणे अथर्ववेदांतील दोन उता-यांत पुरूष हा शब्द वानर आणि त्याचा आवाज ( मायु ) यांनां उद्देशून उपयोगांत आणलेला आहे; परंतु हा अर्थ बरोबर दिसत नाहीं. शिवाय ब्लूमफील्डने हा अर्थ घेतलाहि नाही. व्हिटनेच्या मतें या शब्दाचा अर्थ मनुष्याच्या आवाजाला नीटपणे लागू पडत नाही.
१९पुष्करसाद -- ( कमळावर बसणारा ) अश्वमेधीय बळींच्या यादीत हें एका प्राण्याचें नांव आढळतें. हा प्राणी साप असणें शक्य दिसत नाही. परंतु रॉथच्या मताप्रमाणे हा एकतर पक्षी असावा, अथवा तैत्तिरीय संहितेंवरील भाष्यकाराच्या मताप्रमाणें भृंग असावा.
२०पृदाकु -- अथर्ववेदांत हें एका नागाचें नांव आहे. याचा अश्वमेधीय बळींच्या यादीत उल्लेख येतो. याचे चामडें विशेषत: फार महत्वाचें होतें असें अथर्ववेदांत म्हटलें आहे.
२१पृषत् – अश्वमेधीय बळींच्या यादींत या प्राण्याचा नामनिर्देश झाला आहे. याचा अर्थ ठिपके ठिपके असलेला हरिण असा आहें.
२२पैङ्गराज – अश्वमेधीय बळींच्या यादींत हें एक नांव सापडतें. हें पक्ष्यांचें नांव आहे यांत शंकाच नाहीं. परंतु कोणत्या पक्ष्याचे, हें मात्र निश्चयात्मक सांगतां येणार नाही. हा तांबडया डोळयाचा भारद्वाज पक्षी असावा असें सायण म्हणतात.
२३मन्यु -- अश्वमेधप्रसंगी दिलेल्या बळींच्या यादींत याचा उल्लेख येतों. तैत्तिरीय संहितेंवरील टीकाकार याचा अर्थ वानर (किं पुरूष) अथवा जंगली मोर ( अरण्य मयूर ). असा करितात. पहिला अर्थ वाजसनेयि संहितेंतील मनुष्य याच्याबद्दल या अर्थी केलेल्या मन्यु या शब्दाच्या उपयोगावरून बराच साधार वाटतो. कारण मनुष्याच्या बदलीं किंवा ऐवजी वानरच असला पाहिजें. हा अर्थ दुस-या ठिकाणच्या उता-यांतुनहि चांगला लांगू पडतो.
२४मर्कट -- अश्वमेधांतील बळींच्या यादींत याची गणना केली आहें. याचा अर्थ 'माकड' 'वानर' असा आहे. याच संहितेंत याचें मनुष्य आणि हत्ती यांच्यांत वर्गीकरण केलें आहे. कारण मनुष्याप्रमाणेच हाहि आपल्या हातांनी वस्तू उचलून घेतो, पशुप्रमाणें तोंडाने घेत नाहीं. ( हस्तादान व मुखादान ). दुसरीकडेहि याचा अनेक वेळां उल्लेख येतों.
२५ मान्थालव, मान्थीलव -- यजुर्वेदसंहितांत अश्वमेध प्रसंगीच्या बळींची हीं नांवे आलीं आहेतं. हें प्राणी कोण होतें हें समजत नाहीं. महीधराच्या मतें ते ' एक प्रकारचे उंदीर ' होते. सायणाचार्योनां ते पाणकोंबडे [जलकुक्कट] असावेत असें वाटतें.
२६वार्ध्राणस, वार्ध्रीनस -- अश्वमेधांत बळी दिले जाणा-या पशूंच्या यादींत आलेले एका पशूंचे नांवे आहे. सायण म्हणतात त्याप्रमाणें याचा अर्थ गेंडा असा असावा. बोथलिंगच्या मतें पांढरा बकरा किंवा बगळा असे अर्थ होतात.
२७शारि -- अश्वमेधाचे वेळीं बळीं दिलें जाणा-यांचे यादींत हें नांव आहे. ज्या अर्थी या प्रण्याला मनुष्याची वाणी आहे असें म्हटलेलें आहे. त्या अर्थी हा एक प्रकारचा पक्षी आहे. कदाचित् पुढे ज्याला सारिका म्हणजे मैना म्हणू लागले तोच हा असावा असें झिमर म्हणतो व हें स्पष्ट दिसतें.
२८सृजय -- अश्वमेधाचे वेळी बळी दिलें जाणा-यांपैकी एकाचें हें नांव आहें. हा कोण होता हें समजत नाहीं. वाजसनेयि संहितेंवरील महीधराच्या टीकेत याला एक प्रकारचा पक्षी म्हटलेलें आहे. तैत्तिरीय संहितेंवरील भाष्यांत सायण सृजया असा शब्द घेऊन त्याचे अर्थ ' काळी माशी, ' किंवा शुभ्र सर्प अथवा काळा महिश असे देतात.
२९सौरी-- अश्वमेधाचे वेळी उल्लेखिलेल्या एका पशूचे हें नांव असावें असें झिमरने म्हटलेलें आहें. पण ही चूक आहें. सौरी म्हणजे सूर्याला अर्पण केलेला असा याचा अर्थ आहे असें मॅकडोनेल म्हणतो व तोच अर्थ योग्य आहे.
३०धृणीवंत -- वाजसनेयि संहितेंत अश्वमेधीय बलींच्या यादीतील एका पशूंचे नांव. मैत्रायणी संहितेंत घृणावंत असा पाठ आहे. इतरत्र हा शब्द विशेषणार्थी आहे.
३१धुंक्षा -- वाजसनेयि संहितेतील अश्वमेधीय बलींच्या यादींत एक पक्षी या अर्थी हें नांव आलें आहें.
३२भृंगा -- वाजसनेयि संहिता व अथर्ववेद यांमध्ये हा आकारानें मोठा असून काळया रंगाचा असतो असा उल्लेख आहे. अश्वमेधीय, बलींच्या यादींत याची गणना केली आहे.
३३अनुक्षत्तृ -- पुरूषमेधाच्या वेळी बळी दिल्या जाणा-यांच्या यादींत हा शब्द असून महीधराप्रमाणे त्याचा अर्थ द्वारपालाचा सेवक असा आहे, आणि सायणाप्रमाणें त्याचा अर्थ सारथि असा आहे. वाजसनेयि संहितेंत    (३०. ११) ' अनुक्षत्तृ ' चा अर्थ ' सारथ्याला अनुसरणारा ' असा केला आहे. तैत्तिरीय ब्राह्मण (३०. ४, ९, १) येथें ' सारथ्याचा अनुचर ' असा सायणानें अर्थ केला आहे. वाजसनेयि संहिता (३०.१३) या ठिकाणी महोधराने ' प्रतिहार सेवक ' असा अर्थ घेतला आहे, तर वा. सं. ३०. ११ येथें तो सारथ्यनुसारी असा त्याचा अर्थ करतो.
३४अभिप्रश्निन् -- हा शब्द प्रश्निन् आणि प्रश्नविवाक यांच्यामध्यें तैत्तिरीय ब्राह्मण आणि वाजसनेयि संहिता यांत पुरूषमेधांतील बळीच्या यादींत आढळतो. त्यावरून फक्त ' शोधक मनुष्याचाच बोध होतो ' असें सायण व महीधर हे टीकाकार म्हणतात. परंतु या शब्दाशी कांही तरी कायद्याचा संबंध असला पाहिजे. बहुधा वादी आणि न्यायाधीश यांच्या विरूद्ध प्रतिवादी असा अर्थ घेण्याला कांही हरकत नाहीं.
३५अयोगू -- हा अनिश्चित अर्थाचा शब्द वाजसनेयि संहितेंत जी बळीं दिलें जाणा-यांची यादी आहे तीत आहें. याचा अर्थ आधुनिक ' आयोगाव प्रमाणेच मिश्र जातींतील मनुष्य ( वैश्य बायको आणि शूद्र नवरा यांच्यापासून उत्पन्न झालेला ) असा असावा. वेबर याचा अर्थ 'व्यभिचारिणी स्त्री असा करतो. झिमर म्हणतों की, जी स्वैरिणी ही याचा संभव आहे अशी भ्रातृहीन कन्या असा या शब्दाचा अर्थ असावा.
३६एदिधिषुपति -- हा शब्द वाजसनेयि संहितेंत आला असून त्याचा अर्थ ' मोठया बहिणीच्या अगोदर लग्न झालेल्या लहान बहिणीचा नवरा ' असा आहे अर्थ टीकाकार महीधर म्हणतो. हा अर्थ बरोबर आहे असें जरी मानलें तरी या शब्दाचें रूप् संशयास्पद आहे; कारण डेलब्रुक म्हणतो की हा शब्द अपभ्रष्ट असावा.
३७कंण्टकीकारी -- 'कांटयाचें काम करणारे ' पुरूष मेधांतील हस एक बळी आहे असें वाजसनेयि संहितेंत म्हटलें आहे. हें लोक कांट्यांचा चटया विणण्याकडे किंवा उशा भरण्याकडे उपयोग करीत असत असें दिसते.
३८कारि -- वाजसनेयि संहितेंत पुरूषमेधांतील हें एका बळींचें नांव असून तेथें हा ' हास्य ' देवतेला अपर्ण केला आहे. टीकाकार महीधर म्हणतो की, या शब्दाचा अर्थ ' काम करणारा ' ( कारणशील ) असा आहे; परंतु सें. पी. कोशांत असें म्हटलें आहे की, या शब्दाचा अर्थ 'हर्ष-भरित' मनुष्य असा आहे ( कारण तो शब्द कृ = स्तुति करणें यापासून निघाला आहें. )
३९किरात -- वाजसनेयिसंहितेप्रमाणें किरात हें दरींत (गुहांत) रहात असत; आणि पर्वताच्या दरडीवर किराताची मुलगी (कैरातिका) औषधी खणीत आहे अशा अथर्ववेदांतील उल्लेखावरून किरात हे लोक गिरिकंदरांत रहात असत असें दिसतें. तदनंतर किरात हे लोक पूर्वनेपाळांत वस्ती करूं लागले, पण हें नांव कोणत्याहि डोंगरी लोकांना, नि:संशय मूळ रहिवाशांनां लावीत असत, आणि मानवधर्मशास्त्र कमी योग्यतेच्या क्षत्रियांनां हा शब्द लावतें.
४०कवर्त, कैवर्त -- वाजसनेयि संहिता आणि तैत्तिरीय ब्राह्मण यांमध्ये पुरूषमेधांतील बळींच्या यादींत हीं दोन नांवे 'कोळी' किंवा 'धीवर' या अर्थी आलीं आहेत.
४१कौलाल -- वाजसनेयि संहितेंवरील टीकाकार महीधर प्रमाणें पिढीजाद कुंभार ( कुलालपुत्र ) असा या शब्दाचा अर्थ आहे. दुस-या संहितेंमध्यें कुलाल असा शब्द आहे.
४२क्रोश -- पुरूषमेधांत क्रोशकारी हें एका स्त्रीवाचक बळीचें नांव आहे व त्यावरून क्रोश या शब्दाचा अर्थ निश्चित होत नाहीं कदाचित ( तरवारींचे ) 'म्यान' असा असावा.
४३चरक -- बृहदारण्यक उपनिषदांत या शब्दाचा अर्थ फिरता ब्रह्मचारी असा आहे. मुख्यत्वेंकरून कृष्णयजुर्वेदपंथाचे अनुयायी यांचा शतपथब्राह्मणांत नापसंतीनें उल्लेख केला आहे. वाजसनेयिसंहितेंत पुरूषमेधीय बळींमध्यें चरकाचा उल्लेख असून त्यांत अशुभ कृत्याला त्याचें अर्पण करणें या विधीबद्दल वाद होता असें स्पष्टपणें सूचित होतें.
४४नक्षत्रदर्श -- ' नक्षत्रांकडे निरखून पाहणारा म्हणजे पत्रिका पाहून भविष्य सांगणारा ज्योतिषी ' असा या शब्दाचा अर्थ आहे. यजुर्वेदामध्यें पुरूषमेधाचे वेळी बळी दिलें जाणा-यांचे यादींत हा आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांत एक उल्लेख आलेला आहे त्यावरून असें दिसतें की, या ब्राह्मण ग्रंथांच्या मतानें अग्निहोत्राच्या अग्नीस सिद्ध करण्यास कोणत्या नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरूवात करावी हें पाहण्याची जरूर नाहीं. कारण या ग्रंथांचे मत सूर्यालाच नक्षत्र समजून कोणत्याहि दिवशीं याग सुरू करणें चांगलें असें आहें.
४५पर्णक -- हें एका माणसाचें नांव असून तें वाजसनेयि संहिता व तैत्तिरीय ब्राह्मण यामध्यें पुरूषमेधाचे वेळीं बळी दिले जाणा-यांचे यादींत आलें आहे. महीधराच्यामतानें या शबदावरून भिल्ल असा बोध होतो. हा भिल्ल डोंगरात राहणारा एक मनुष्य असावा. कारण निषादांचेंहि तो असेंच वर्णन करतो. सायणाच्या मतें या पर्णकाचा अर्थ पाण्यावर विषसिंचित पान टाकून मासे धरणारा मनुष्य असा आहे. पण ही व्युत्पत्तिदृष्टीने बसविलेली कल्पना आहें. वेबर याचा अर्थ पिसें धारण करणारा मनुष्य असा करतो. हा अर्थ खुबीचा आहे खरा पण त्याबद्दल नक्की कांही सांगतां येत नाहीं.
४६पाणिघ्र -- यजुर्वेदसंहितेमध्यें पुरूषमेधाचें वेळीं बळी दिले जाणा-यांचे यादींत याचें नांव आलेले आहे. गोगांट करून शेतांतून पक्षी हांकणारा मनुष्य असा या शब्दाचा अर्थ असावा किंवा नृत्याच्या वेळी 'ताल धरणारा' असाहि अर्थ असण्याचा संभव आहे.
४७पीठसर्पिन् -- सूत्रग्रंथाच्या पूर्वी समासरहित असा हा शब्द येत नाहीं. पण वाजसनेयि संहितेंमध्ये (३०. २१) आणि तैत्तिरीय ब्राह्मणामध्यें ( ३.४,१७,१ ) पुरूषमेधाचे वेळीं बळी दिले जाणा-यांचे यादींत एका प्राण्याचेहि नांव पीठसर्पिन् ( लहानशा गाडींत हिंडणारा ) या समासांत आणलें आहे.
४८पुरूषहस्तिन् -- हात असलेला मनुष्य. यजुर्वेदांतील अश्वमेधाच्या बळींच्या यादींत हा शब्द सांपडतो. याचा अर्थ वानर हाच असला पाहिजे.
४९पेशितृ -- यजुर्वेदांतील पुरूषमेधप्रसंगी दिले जाणा-या बळींच्या यादींत हें एका बळींचे नांव आहे. याचा अर्थ अगदी अनिश्चित आहे. वेबर व सें. पी. कोश यांचे मतानें याचा अर्थ 'तुकडे करणारा' , 'नक्षी करणारा' असा आहें. परंतु सायणाचे मतानें 'एकदां वैर नष्ट केलें असतां जो पुन: तें खाजवून काढतो तो' असा याचा अर्थ आहे.
५०पौल्कस -- यजुर्वेदांतील पुरूषमेधप्रसंगी बळी दिले जाणा-यांपैकी हें एकाचें नांव आहे. या शब्दाचा उल्लेख चांडाळाबरोबर बृहदारण्यकोपनिषदामध्यें येतो. तेथें याचा अर्थ खालच्या दर्जाचीं नीच जात असा आहे. मैत्रायणी संहितेंत पुक्लक आणि पुल्कक अशी वेगवेगळी रूपें आहेत व तीं पुष्कळशीं अगदी सारखीं आहेत. या पुल्कस शब्दाचेंच पौल्कस हें रूप् असून त्याचा उद्देश जाति दाखविण्यासाठींच बहुतेक असावा असें दिसतें. स्मृतींप्रमाणे पुल्कस हा क्षत्रिय झालेल्या निषादाचा किंवा शूद्राचा मुलगा आहे. परंतु हा सर्व तर्काचा बाजार दिसतो. पौल्कस ही एक काम करणारी जात असावी. अथवा फिकच्या समजूतीप्रमाणें ही एक हिंस्त्र पशूंवर उपजिविका करणारी जात होती व तिच्याकडून कधी कधीं मजूर लोंकांचे काम करून घेत असत.
५१बिदलकारी -- बांस चिरणारी बुरडीण. यजुर्वेदांतील पुरूषमेधप्रसंगी बळी दिलेल्यांच्या यादीत इचा उल्लेख आहें. एगलिंग याचा अर्थ 'टोपली विणणारी' असा करतों.
५२बैद -- हें यजुर्वेदांत पुरूषमेधप्रसंगी बळी दिलेल्यांच्या पैकी एकाचें नांव आहें. महीधराच्या टीकेप्रमाणें या शब्दाचा अर्थ निषाद असा आहे तर सायणाप्रमाणें याचा अर्थ कोळी असा आहें.
५३मार्गर -- यजुर्वेदांतील पुरूषमेधप्रसंगींच्या बळींच्या यादींत हा शब्द आढळतो. याचा अर्थ 'पारधी' किंवा 'कोळीं' असा असावा कारण हें पितृवंशिक नांव मृगारी 'वन्य पशु मारणारा' यापासून झालेंलें आहें.
५४मैनाल -- यजुर्वेदांतील पुरूषमेधाचे वेळीं बळीं देण्यांत येणा-या प्राण्यांच्या यादींत हें नांव आलेलें आहे. सायण आणि महीधर यांच्या मताप्रमाणें मीन म्हणजे मासा या शब्दापासून निघालेल्या या शब्दाचा कोळी हा अर्थ स्पष्ट निघतो.
५५व्यच -- हा शब्द गोव्यच या रूपांत आलेलां आहें. याचा अर्थ अनिश्चित आहे. सायणाचार्योच्या मतें या गोव्यच समासाचा अर्थ गायी हांकणारा असा आहें. कदाचित् सें. पी. कोश म्हणतो त्याप्रमाणें याचा अर्थ गायींस पीडा देणारा असाहि असूं शकेल. वेबरच्या मतें याचा अर्थ गायीचें मांस काढून विकणारा असा आहे. एगलिंग म्हणतो की, याचा अर्थ गायीचे जवळ जाणारा असा होईल.
५६सभाचर -- यजुर्वेदामध्यें पुरूषमेधाचे वेळीं बली दिले जाणा-यांपैकी एकाचें हें नांव आहे. से. पी. कोशाच्या मतानें हें विशेषण असून तें 'सभाग' सभेला जाणारा अशा अर्थाचें आहें. ज्या अर्थी तो बलि धर्म या देवतेला अर्पिलेला आहे त्याअर्थी या शब्दाचा अर्थ सभेचा एक सभासद असा असावा. कदाचित् तो खटल्यांचा निकाल करणा-या न्यायाधिशांपैकीहि एक असावा. आतां सभेंतील सर्वच लोक न्याय करीत किंवा कांही निवडक लोक न्याय देण्याकरिंता न्यायासनावर बसत हें सांगणें कठिण आहे. सभाचराच्या विशिष्ट अर्थावरून कांही निवडक लोकच न्याय देत असत असें मानणें बरें. वा. सं. ३०.६ 'येथें धर्माय सभाचरम्' असा पाठ आहे व 'सभायांचरतीति ती' असें भाष्यांत सभाचराचें विवेचन दिलें आहे आणि 'सभायां नित्यं चरन्तं धर्मस्य प्रवक्तारम् ।' असा भाष्यांत अर्थ दिला आहे. यावरून सभाचराचा अर्थ 'धर्माचें प्रवचन करणारा सभासद' असा दिसतो.