प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.  

 औषधिनामें ( अथर्ववेद )

आबयु -- अथर्ववेदांत हें एका झाडाचें नांव आहे. कदाचित् हें मोहरीचेंहि झाड असेल परंतु हा अर्थ खात्रीलायक नाहीं.
कुष्ठ -- अथर्ववेदांतील एका प्रमुख रोपाचें ( वनस्पतीचें ) हें नांव आहें. पर्वतावर, सोमवल्लीबरोबर, जेंथें गरूड पक्षी आपलीं घरटीं करून राहतात अशा हिमालयाच्या उंच शिखरावर ह्या वनस्पतीची वाढ होत असे आणि तेथून ती पूर्वेकडे मनुष्यांच्या उपयोगाकरिंतां आणली जात असें. असें म्हणतात की, ही वनस्पती प्रथम द्युलोकांत प्रसिद्ध अश्वत्थ वृक्षाच्या खालीं, जेंथें देव जमत असत तेथें उगवली आणि तेथून ती सुवर्णनौकेंतून आणली. ह्या वनस्पतीच्या नद्य-मार आणि नद्या-रिष ह्या शुभ नांवांवरून ही वनस्पतीमध्यें अतिशय उपयोगी वनस्पति होती असें वाटतें. आणि तिला जीवल आणि जीवला ( चैतन्य पदार्थ ) यांचा मुलगा असें म्हटलें आहे. ही वनस्पति डोंकें दुखणें ( शीर्षामय ), नेत्ररोग, शारीरिक दु:ख, व मुख्यत्वेंकरून ताप ( म्हणून तक्म-नाशन म्हणतात ) आणि यक्ष्म ( क्षयरोग ) ह्या रोगांवर उपाय आहे. ह्या वनस्पतीच्या सामान्य गुणधर्मावरून हिला विश्व-भेषज् असें नांव दिलें आहे. अजन आणि जटामांसी ( नलद ) या वर्गांत हिला घालतात यावरून हिचे सौगंधिक गुण माहित असावेत असें दिसतें.
क्षिप्त -- 'जखम' ( गोळींनें झालेली ), अथवा 'दुखापत' ( पडल्यानें झालेली ). अथर्ववेदांत याच्यावर उंपाय म्हणून पिप्पली हेहिं लिहिलें आहे. क्षिप्त याचा अर्थ आचके असा असावा. कारण क्षिप् धातूचा अर्थ पसरणें असा असून वैद्यकांत विक्षेप वगैरेचा अर्थ आचके असा करितात. पिप्पली हें औषध यावर सांगितलें आहे यावरून या विधानास पुष्टि येते. कारण याच विकारावर पिंपली वेदांत व वैद्यकांत पुष्कळ ठिकांणी सांगितली आहे. जखमेवर पिप्पलीचा उपयोग कोठेंहि नाहीं.
चीपुद्रु -- ह्या नांवावरून अथर्ववेदामध्यें उल्लेखिलेल्या व दु:ख बरें करणा-या औषधीवस्तूचा बोध होतो. सायणाचार्याच्या मतें चीपुद्रु हा शब्द असून तो एका झाडाचा बोधक आहे. सायणाचार्याच्या ह्या अर्थाला दुसरा एक असा पुरावा आहे की, कौशिक सूत्रांत ह्या सूक्तांचा धार्मिक कृत्याचें वेळीं उपयोग करतांना पलाश लाकडाचें तुकडे वापरल्याचा उल्लेख आहे. व्हिटनेच्या मतें ह्या शब्दाचें रूप् चिपुडु असें असावें.
जलाष भेषज -- ज्याला जलाष हेंच औषध किंवा उपाय आहे असा. ऋग्वेद व अथर्ववेद यांमध्यें रूद्राला हें नांव दिलेलें आहे. जलाष हा शब्द अथर्ववेदामध्यें एका स्तोत्रांत आलेला आहे व त्या जलाषाचा उपयोग गळूं बरें करण्यास होतो असें म्हटलेलें आहे. ह्या अथर्ववेदांतल्या लेखावरचा टीकाकार व त्याचप्रमाणें कौशिक सूत्र त्यांच्या मतें जलाष ह्याचा अर्थ मूत्र असा असून तोच अर्थ बरा दिसतो. पण गेल्डनेरच्या मतें मूत्ररूपानें पावसाचें पाणी हा अर्थ गर्भित असावा. निघटूच्या मतें जलाष व उदक हें समानार्थी शब्द होत. जलाष हा शब्द वैद्यकांत नाहीं. व विषारावर प्रामुख्यानें पाणी या औषधाचा उपयोगहि केलेला नाहीं.
नितत्नि -- हा शब्द अथर्ववेदामध्यें आलेला असून एकदां टक्कल पडलें असतां पुन्हां केंस वाढविणा-या एका वनस्पतीचें हें नांव आहें. ही वनस्पति कोणती आहे हें ठाऊक नाहीं.
बज -- रोगाच्या राक्षसांवर उपयोगांत आणावयाच्या एका वल्लीचें अथर्ववेदांतील हें एक नांव आहे. याचा अर्थ कदाचित मोहरीच्या झाडाच्या एखादा प्रकार असा असावा.
भेषज -- हा अनेकवचनी उपयोगांत आणलेला शब्द अथर्ववेदांत आणि सूत्रांत आला आहे व त्याचा अर्थ अथर्ववेदांतील ऋचांत ( जेवढं सांगितलें आहें तेवढें ) बरें करण्याचें सामर्थ्य असा आहे. वैद्यकांतहि भेषज शब्दाचा अर्थ अथर्ववेदांप्रमाणेच आहें.
विलिष्ट भेषज -- अथर्ववेदामध्यें ( पैप्पलाद ) सांधा उखळला असल्यास किंवा कोठें मुरगळलें असल्यास हा इलाज सांगितलेला आहे. ह्याचाहि निश्चित अर्थ समजत नाहीं.
१०भैषज्य -- भेषजाप्रमाणे याचा शतपथब्राह्मण आणि निरूक्त यांत 'औषध' किंवा 'बरा करणारा इलाज' असा अर्थ होतो.