प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि

गति

 गंतिवाचक नामें [ॠग्वेद]  / गतिवाचक कियापदें [ ॠग्वेद ]
 गतिवाचक विशेषणें [ॠग्वेद] /  त्वरावाचक [ॠग्वेद].


गतिवाचक शब्दांमध्यें आपणांस गतीचे अनेक प्रकार निरनिराळया पृथक शब्दांनी व्यक्त केलेले दिसतात. सामान्यत: जाणें, येणे, वसणें, उठणें, वर जाणें, खालीं जाणें वगैरे क्रिया दाखविण्यास अनेक शब्द आहेतच पण शीघ्रगति, कुटिलगति, मंदगति, वगैरे गतीचे प्रकारवाचक व वाढणें, वाटोळे फिरणें, सरपटत चालणें, स्पन्दन पावणें, मनोवेगानें जाणें, व जोरानें जाणें वगैरे अनेक प्रकारच्या गती आपणांस निरनिराळया शब्दांनीं व्यक्त केलेल्या आढळतात. यावरुन वैदिक समाजांतहि विविध क्रिया चालू होत्या याचे ते शब्द बोधक आहेत. विशिष्ट गतिवाचक शब्द घेऊन त्यास उपसर्ग लावून अनेक क्रिया व्यक्त करण्यास भाषेस समर्थ करण्याची युक्ति वेदपूर्वकालीन-निदान वेदकालीन-लोकांस परिचित असावी. केवल गमनार्थी शब्द देखील पुष्कळ दिसतात. गम, या, इ, चर्, तक्, इष्, क्रम्, व्रज, क्षर्, सर्, स्वर, ॠच्छ्, ॠ, चत् इत्यादि. वैदिक कालापासून अर्वाचीन कालाकडे दृष्टी फेंकली असतां असें दिसतें कीं भाषेमध्यें एका क्रियेस अनेक शब्द न ठेवतां एकच शब्द ठेवावा असा संस्कार होत आहे. सामान्य गतिवाचक शब्द अनेक असतील. त्यांपैकी कांही विशिष्ट गतीचे बोधक होतात आणि कांहीं अनुपयोगामुळें नष्ट होत जातात. शिवाय एकाच शब्दास उपसर्ग लावून अनेक अर्थ उत्पन्न करण्याची प्रवृत्ति वाढतांना दिसते.