प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि. 

गुरुशिष्यसंबंध (संहितेतर)

अंशुधानंजय्य- अमावास्य शांडिल्यायनाचा हा शिष्य असें वंश ब्राह्मणांत म्हटलें आहे.
अग्निभूकाश्यप-इंद्रभू काश्यपाचा शिष्य म्हणून याचा वंश ब्राह्मणांत उल्लेख आहे.
अमवास्यशांडिल्यायन- अंशुधानंजय्य याचा हा गुरू होता असा वंश ब्राह्मणांत उल्लेख आहे.
अराडदात्रेयशौनक - दृतिऐन्द्रोतशौनक- दृतिऐन्द्रोतशौनक याचा शिष्य म्हणून याचा वंश ब्राह्मणांत उल्लेख आहे.
असितवार्षगण- हरित कश्यपाचा हा शिष्य होता असें बृहदारण्यकांतील वंशावरून (६.५.३) दिसतें.
आग्निवेश्य- बृहदारण्यकाच्या वंशांत या नांवाच्या ब-याच अध्यापकांचा उल्लेख आला आहे. माध्यंदिन प्रतींत आग्निवेश्य हा सैतवाचा शिष्य असल्याचें व काण्व प्रतींतील एका वंशांत हा शांडिल्य व आनभिम्लात यांचा शिष्य, आणि  दुस-या वंशांत हा गार्ग्याचा शिष्य असल्याचें आढळतें.
आनभिम्लात - बृहदारण्यक काण्व प्रत (२.६,२) उपनिषदांतील वंशांत हा दुस-या एका आनभिम्लाताचा शिष्य असल्याचें लिहिलें आहे.
आनन्दज चांधनायन- हा शाम्बाचा शिष्य असल्याचें वंशब्राह्मणावरून दिसतें.
आभूतित्वाष्ट्र- हा विश्वरूप त्वाष्ट्राचा शिष्य असल्याचें बृहदारण्यकाच्या दोन वंशांत (२.६,३,४,६,३) दिलें आहे. हें दोघेंहि आचार्य, मॅकडोनेलच्या मतानें सारखेच प्राचीनकल्पित आहेत.
१०आसुरायण- बृहदारण्यकोउपनिषदांती दोन वंशाप्रमाणें हा त्रैवणीचा शिष्य असून तिस-या वंशांत
(६,५,२) हा असुरीचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे.
११आसुरि- बृहदारण्यकोपनिषांदातील पहिल्या दोन वंशांत हा भारद्वाजाचा शिष्य आणि औपजंधनीचा गुरू असून तिस-या वंशांत याज्ञवल्क्याचा शिष्य व आसुरायणाचा गुरू असल्याचें म्हटले आहे. शतपथाच्या पहिल्या चार कांडांत कांही यज्ञविधीवर तो प्रमाणभूत मानला जातो. चवदाव्या काण्डांवरून (१४.१,१,३३) तो अनिर्बध मताबद्दल विशेषतः सत्तत्वाच्या आग्रहाबद्दल प्रमाणभूत होतासें दिसतें.
१२इंद्रभूकाश्यप- मित्रभू काश्यपाचा हा शिष्य होता असें वंश ब्राह्मणांत म्हटलें आहे.
१३इपश्यावाश्वि- अगस्त्याचा हा शिष्य असल्याचें जैमिनीय उपनिषद्  ब्राह्मण (४,१६,१) येथें म्हटलें आहे.
१४उदरशाण्डिल्य- छान्दोग्य उपनिषदांत (१.९,३) अतिधन्वा शौनकानें ह्याला उद्गीथ शिकविलें असें आहे (उद्गीथ याचा वाच्यार्थ जो ‘सामन्’ तो येथें अभिप्रेत नसून लक्षणेनें ब्रह्माचें ज्ञान असा अर्थ घेतला आहे.) वंश ब्राह्मणांतहि हेंच गुरुशिष्यनातें दिलें आहे.
१५उद्दालकायन- बृहदारण्यकांत (काण्वप्रत ४.६.२) हा जाबालायन याचा शिष्य होता असा उल्लेख आहे.
१६उपकोसल कामलायन- छांदोग्य उपनिषदांत (४.१०,१) याच्या सुंदर कथेला आरंभ झाला आहे. कमलपुत्र उपकोसल हा सत्यकाम जाबालाच्या घरी अध्ययन करण्याकरितां ब्रह्मचर्याने राहिला. त्यानें सत्यकामाच्या अग्नीची बारा वर्षे सेवा केली. बारा वर्षानंतर सत्यकामानें इतर शिष्यांनां समावर्तनसंस्कार करून स्वगृही जाण्यास  परवानगी दिली. परंतु उपकोसलाचें समावर्तन केलें नाहीं. तेव्हां सत्यकामाची भार्या त्याला म्हणाली कीं या ब्रह्मचा-यानें अग्नीची सेवा उत्तमप्रकारें केली आहे करितां अग्नीनें आपल्याला दोष देऊं नये म्हणून आपण याला ब्रह्मज्ञान सांगा. पण तें न सांगतांच तो प्रवासाला निघून गेला तेव्हा उपकोसलानें मानसिक दुःखाच्या भरांत अन्न वर्जिलें. तेव्हां आचार्यपत्नी म्हणाली, “बाळा, तूं अन्न कां वर्ज्य केलेंस? तो म्हणाला कीं, नाना मार्गांनीं जाणा-या अनेक इच्छा मनुष्याला असतात. अशा इच्छारूप व्याधींनीं मी ग्रस्त आहे, म्हणून मी कांही खात नाहीं. त्या ब्रह्मचा-यानें आचरलेलें तप व आपली केलेली सेवा लक्ष्यांत आणून त्याला ज्ञान सांगण्याच्या उद्दे्शानें तीन अग्नी प्रकट होऊन त्यास म्हणाले कीं, प्राण हें ब्रह्म,सुख हें ब्रळ आणि आकाश हें ब्रह्म  होय. उपकोसल म्हणाला, “प्राण हे ब्रह्म कसें हें मला समजलें, पण पुढील दोन्हींबद्दल मला समजत नाहीं”. नंतर त्या अग्नींनीं त्यांचीहि उत्तरें दिली, व प्रत्येक अग्नीनें आपल्या स्वरूपाचें ज्ञान त्याला करून दिलें. मागाहून ते अग्नी म्हणाले बाळा उपकोसला ही आमची विद्या आणि आत्मविद्या आम्ही तुला सांगितली. ब्रह्मवेत्याचा पुढील मार्ग तुझ्या आचार्याकडून तुला कळेल”. काळांतरानें त्याचा आचार्य परत आला व शिष्याचें मुखावलोकन करून तो म्हणाला, “बाळा, ब्रह्मज्ञानाच्या मुखाप्रमाणें तुझें मुख दिसत आहे. तुला कोणी ज्ञान सांगितलें?” उपकोसल म्हणाला, “दुसरें कोण सांगणार? ह्या कंप पावणा-या अग्नीसारखेच दुसरे अग्नी होते,त्यानी सांगितलें”. पुढें गुरूनें विचारल्यावरून अग्नींनीं सांगितलेले ज्ञान त्यानें त्याला सांगितलें. नंतर आचार्य सत्यकाम म्हणाला, बाळा, त्यांनीं तुला लोक सांगितले, पण संपूर्ण ब्रह्मज्ञान सांगितलें नाहीं; तर मीं सांगतो. ज्याप्रमाणे कमलपत्राला उदक स्पर्श करीत नाहीं, त्याप्रमाणें हें ब्रह्म जाणणा-याला पापकर्म स्पर्श करीत नाहीं. उपकोसलानें प्रार्थना केली कीं, “भगवन् तें ब्रह्म मला सांगा”, आचार्य म्हणाले, “या चक्षूच्या ठिकाणीं जो पुरुष दिसतो तो आत्मा. हा मरणरहित व भयरहित आहे हाच ब्रह्म होय. ह्या चक्षूवर घृत अथवा उदक पडलें तर तें बाजूलाच जातें. या पुरुषाला संयद्वाम असें म्हणतात. कारण सर्व शोभनवस्तू ह्याच्या ठिकाणीं एकत्र होतात. हाच ‘वामनी’ होय. कारण हाच प्राण्यांनां त्यांच्या पुण्यकर्माची सर्व फलें प्राप्त करून देतो. हाच ‘भामनी’ होय. कारण हा सर्व लोकांमध्यें प्रकाश पावतो. हें जो जाणतो, तो सर्व लोकांमध्ये प्रकाशमान होतो. असे ब्रह्मवेत्ते मरण पावल्यावर त्यांचें उत्तर कार्य कोणी करोत अथवा न करोत. ते आर्चिष देवतेप्रत जातात. तेथून दिवसाप्रत (दिवसाभिमानिनी देवतेप्रत) जातात. तेथून शुक्ल पक्षाप्रत, तेथून उत्तरायणाप्रत व मग संवत्सराप्रत जातात. तेथून आदित्याप्रत, पुढें चंद्राप्रत, नंतर विद्युल्लतेप्रत पोहोंचतात, तेथें कोणी ब्रह्मलोकीचा अमानव पुरुष येऊन त्यांनां ब्रह्माप्रत नेतो. दे देवपथ, तोच ब्रह्मपथ. या मार्गानें जाणारे पुनः या मानवी भोव-यांत सांपडत नाहींत.”
१७उपवेशि- बृहदारण्यकोपनिषद्  (६.५,३) मधील वंशांत हा कुश्रि याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे.
१८ॠष्यशृंग- जैमिनीय उपनिषद ब्राह्मण (३.४,१) आणि वंशब्राह्मण ह्यांत हा काश्यपाचा शिष्य असून काश्यप हें पैतृक नांवहि ह्यानें धारण केल्याचा उल्लेख दिसतो.
१९कक्ष- जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांतील (३.४१,१) वंशांत ह्या नांवाच्या दोन व्यक्ती आहेत. एक प्रौष्टपदवारक्य ह्याचा शिष्य कक्षवारक्य  आणि दुसरा दक्ष कात्यायनि आत्रेय ह्याचा शिष्य कक्षवारकि, अथवा (जै. उ. ब्रा. ४.१७,१, प्रमाणें) कक्षवारक्य हे होत.
२०कापट व सुनीथ- सुतेमनस्  शाण्डिल्यायनाचा हा शिष्य असें वंशब्राह्मणांत म्हटलें आहे.
२१काषायण- बृहदारण्यकोपनिषदांतील दुस-या वंशांत ह्याचें नांव आढळतें. काण्वप्रतीप्रमाणें (४.६,२) हा सायकायन याचा शिष्य आणि माध्यंदिन प्रतीप्रमाणें (४.५,२७) सौकरायणाचा शिष्य होय.
२२कुमार हारित- गालवाचा हा शिष्य होता अस बृहदारण्यक उपनिषदांतील वंशांत (माध्यंदिन प्रत (२.५,२२) आणि काण्व प्रत (२.६,३) म्हटलें आहे.
२३कुश्रिवाजश्रवस्- शतपथ ब्राह्मण १०.५,५,१ येथें पवित्र अग्नीसंबंधीच्या ज्ञानाशी या आचार्याचा संबंध आहे. बृहदारण्यकांतील शेवटच्या वंशांत (६.४,३३) हा वाजश्रव्याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे. बृहदारण्यक काण्व प्रतीच्या शेवटच्या वंशांत (६.५,४) आलेला कुश्रि शतपथाच्या दहाव्या काण्डाच्या वंशांत याज्ञवचस् राजस्तंबायनाचा शिष्य म्हणून ज्याचा उल्लेख आहे, असे दोघे ह्या कुश्रीहून भिन्न कीं, काय हें स्पष्ट नाहीं.
२४कौण्डिन्य- बृहदारण्यकांतील पहिल्या दोन वंशांत हा शाण्डिल्याचा शिष्य असल्याचें म्हटलें आहे.
२५गालव- बृहदारण्यक उपनिषदातील पहिल्या दोन वंशात हा विदर्भी कौण्डिन्याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे. ऐतरेय आरण्यक (५.३,३) येथें गालवाचा उल्लेख आहे. महाव्रताचें अध्ययन एका दिवसांत संपवावें असें गालवमत आहे. तो गालव आणि हा एकच असणे संभवनीय आहे. निरुक्तांत (४.३) एका वैय्याकरणी गालवाचा उल्लेख आहे.
२६गौश्रुतिवैयाघ्रपद्य- छांदोग्य उपनिषदांत (५,२,३) ह्याची थोडी हकीकत आली आहे. जाबाल सत्यकामानें ह्याला वाणी, श्रोत्र, मन व प्राण ह्या पंचप्राणाबद्दलचें महत्त्व तारतम्यपूर्वक सांगून सर्वात प्राणाचें महत्त्व कसें अधिक आहे; इतर इंद्रियापैकी कोणतेहि नाहीसें झाल्यास विशेषसा अपाय शरीरास घडत नाही, पण प्राण जाऊं लागल्यास सर्व व्यवहार कसे खुंटतात हें सर्व ज्ञान एका आख्यायिकेच्या द्वारें त्याला सांगितलें. नंतर सत्यकाम त्याला म्हणाला, “हें ज्ञान जरी एखाद्या शुष्क खांबाला सांगितले तरी त्याला पालवी फुटेल, मग जिवंत व बुद्धियुक्त माणसाबद्दल तर बोलावयास नको”. पुढें त्यानें त्याला महत्त्व प्राप्त करून घेण्याबद्दल एक व्रत सांगितलें.
२७गौपवन- गोपवनाचा वंशज. बृहदारण्यकोपनिषदाच्या पहिल्या दोन वंशांत हा पौतिमाष्याचा शिष्य असल्याचें लिहिले आहे.
२८घृतकौशिक- बृहदरण्यकाच्या पहिल्या दोन वंशांवरून हा पारशर्यायणाचा शिष्य दिसतो.
२९घोरआंगिरस- ह्या प्राचीन आचार्याचे नांव कौषीतकी ब्राह्मणांत (३०.६) आणि छांदोग्योपनिषदांत आलें आहे. छांदोग्यांत, ह्यानें देवकीपुत्र कृष्ण ह्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्याचें नमुद आहे. मॅक्डोनेलच्या मतें हें नांव अंगिरसापैकी घोर म्हणजे भयंकर वंशज हा  भिषज्  आथर्वण अथर्वणाचा रोगघ्न वंशज ह्या प्रमाणेंच निवळ काल्पनिक आहे. ॠग्वेदाच्या आश्वलायन श्रौतसूत्रांत (१०.७) व शांखायन श्रौतसूत्रांत (१६.२) ‘अथर्वण’ वेदाचा ‘भिषज्’ शी संबंध असून ‘आंगिरस’ वेदाचा ‘घोर’ याशीं संबंध आहे. म्हणून घोर अंगिरस हा अथर्ववेदांतील जारणादि कृत्याचें मूर्तस्वरूप होय असें मॅकडोनेल म्हणतो. काठक संहितेंतील अश्वमेधाच्या भागांत (१.१) ह्याचा उल्लेख आहे.
३०चाक्र- हें एका व्यक्तीचे नांव असून फक्त शतपथांत. ‘रेवोत्तरस्  स्थपति पाटव चाक्र’ १२.८ १; १७, व रेवोत्तरस्  पाटव चाक्र स्थपति, (१२.९,३,१) असा निरनिराळया त-हेचा उल्लेख आला आहे. तेथें ह्याच्याविषयीं असें म्हटलें आहे कीं, ह्याला सृंजयानीं हाकून दिलें पण ह्यानें, कौरव्य राजा बल्हिक प्रातिपीय ह्याच्या अडथळयाला न जुमानता, त्याचा जो दुष्टरीतु राजा, त्याला परत आणून त्याच्या स्वाधीन केले. पहिल्यानें दिलेल्या शतपथांतील उता-यावरून ह्याला योद्धा म्हणण्यापेक्षा ॠषी म्हटलेलेंच  अधिक योगय होय, कारण तेथें फक्त आचार्य म्हणूनच त्याचा उल्लेख केला आहे.
३१जनश्रुतकाण्डविथ- जनश्रुत म्हणजे लोकप्रसिद्ध. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणाच्या वंशावरून (३.४०, २) हा हृत्सवाशयाचा शिष्य दिसतो. त्याच ब्राह्मणांत (३.४१,१;४.१७,१) जनश्रुत वारक्य हा जयंताचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे.
३२जिह्वावत्बाध्योग- हा असित वार्षागणाचा शिष्य असल्याचें बृहदारण्यकातील शेवटच्या वंशावरून (६.५,३) दिसतें.
३३ताण्डि - सामविधान ब्राह्मणाच्या शेवटी असलेल्या वंशावरून हा बादरायणाचा शिष्य दिसतो.
३४त्रिवेद कृष्णरात लौहित्य- हा श्यामजयन्त लौहित्याचा शिष्य असल्याचें जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांतील वंशावरून (३.४२,१) दिसतें.
३५त्रैवणि- बृहदारण्यकांतील पहिल्या दोन वंशांत हा औपचंधनि किंवा औपजंधनि ह्याचा शिष्य असल्याचें दिसतें. माध्यंदिन प्रतींत (४५.२७) ह्याचें नांव दोन वेळ आढळतें व दोन्ही ठिकाणीं हा औपजंधनीचा शिष्य आहे.
३६दक्षकात्यायनी आत्रेय- हा शंख बाभ्रव्याचा शिष्य असल्याचा उल्लेख जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांतील वंशात (३.४१,१;४१,७,१) आहे.
३७द जयंतलौहित्य- हा कृष्णरात लौहित्याचा शिष्य असल्याचें जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांतील वंशावरून (५.४२,१) दिसतें.
३८निकोथक भायजात्य – (भायजाताचा वंशज). प्रतिथीचा शिष्य म्हणून ह्याचा वंशब्राह्मणांत उल्लेख आलेला आहे.
३९निगदपार्णवल्कि- पर्णवल्काचा वंशज. वंश ब्राह्मणावरून हा गिरिशर्मा आचार्याचा शिष्य दिसतो.
४०पथिन्- अयास्य आंगिरसाचा हा शिष्य असल्याचे बृहदारण्यकांतील  पहिल्या दोन वंशांवरून दिसतें.
४१पल्लिगुप्तलौहित्य- जैमिनीय उपनिषद्  ब्राह्मणांतील वंशांत (३.४२,१) श्यामजयंत लौहित्याचा शिष्य म्हणून ह्याचा उल्लेख आलेला आहे. हें नांव उघडपणें अलीकडील दिसतें. कारण पल्लि हा शब्द प्राचीन वाङ्मयांत आढळत नाहीं व लौहित्य कुलाचा या शिवायचा उल्लेख वैदिक कालानंतरच वाङ्मयांतच  आलेला आहे.
४२पाराशर्यायण- बृहदारण्यकांतील पहिल्या दोन वंशांत पाराशर्याचा शिष्य म्हणून ह्याचा उल्लेख आहे.
४३पौष्पिण्ड्य- सामविधान ब्राह्मणाच्या शेवटच्या वंशावरून हा जैमिनीचा शिष्य दिसतो.
४४प्रतिथिदेवतरथ- वंशब्राह्मणावरून हा देवतरस्  शावसायनाचा शिष्य दिसतो.
४५प्रातिपीय- शांखायन आरण्यकांत (१५.१) प्रतिवंशाचा एक शिष्य म्हणून ह्याचा उल्लेख आलेला आहे.
४६प्रातिवेश्य- शांखायन आरण्यकाच्या शेवटच्या वंशांत (१५.१) बृहद्दिवाचा शिष्य म्हणून ह्याचा उल्लेख आहे.
४७प्रौष्ठपादवारक्य- कंस वारकीचा शिष्य म्हणून जैमिनीय उपनिषद्  ब्राह्मणाच्या एका वंशांत (३.४१,१) ह्याचा उल्लेख आहे.
४८बभ्रुदैवावृध- पर्वत आणि नारद यांचा शिष्य म्हणून ऐतरेय ब्राह्मणांत (७.३४) ह्याचा उल्लेख आला आहे.
४९बृहस्पतिगुप्त शायस्थि - भवत्रात शायस्थीचा शिष्य म्हणून वंश ब्राह्मणांत याचा उल्लेख आहे.
५०ब्रह्मवृद्धि- मित्रवर्चस्  ह्याचा हा शिष्य असल्याचे वंशब्राह्मणांत उल्लेखिलें आहे.
५१महाशालजाबाल- हें एका अध्यापकाचें नांव आहे. याचा शतपथ ब्राह्मणांत दोनदां उल्लेख आला आहे. पहिल्यानें तो धीर शातपर्णेय ह्याला शिकवीत असतां, व दुस-यानें अश्वपतीपासून ज्ञान मिळविणा-या ब्राह्मणापैकी एक म्हणून (१०.६,१,१). ह्याच्या जोडीच्या छांदोग्यपनिषदांतील उता-यांत (५.२,१) प्राचीनशाल औपमन्यव हें नांव आढळतें. महाशाल हा शब्द विशेषणापेक्षां विशेष्य म्हणून समजणें अधिक युक्त होय. पीटर्सबर्गकोशांत हा विशेषण म्हणून मानला आहे.
५२यज्ञेषु- तैत्तिरीय ब्राह्मणांत (१.५,२;१) हें एका मनुष्याचें नांव आले आहे. यज्ञ करण्याची अगदी बरोबर वेळ ज्याला कळत  होती अशा मात्स्य नांवाच्या ह्याच्या पुरोहितानें ह्याला भरभराटीस आणलें.
५३वाजश्रवस्- बृहदारण्यकांतील शेवटच्या वंशावरून (माध्यंदिन ६.४,३३) हा जिव्हावत् बाध्योगाचा शिष्य दिसतो.
५४वामकक्षायण- शतपथ ब्राह्मणांत (१०.६,५;९) हा वात्स्याचा शिष्य असल्याचा व बृहदारण्यकांत (६.५,४ काण्वप्रत) शाण्डिल्याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे.
५५विचक्षणतांडय- हा गर्दभीमुखाचा शिष्य असल्याचें वंशब्राह्मणावरून दिसतें.
५६विदर्भिकौण्डिन्य- हा वत्सनपाताचा शिष्य असल्याचें बृहदारण्यकांतील पहिल्या दोन वंशांवरून दिसतें.
५७विपश्चितदृढजयंत लौहित्य- दक्ष जयंत लौहित्याचा शिष्य म्हणून जैमिनीय उपनिषद्  ब्राह्मणांत (३.४३,२) ह्याचा उल्लेख आहे.
५८विष्वक्सेन- सामविधान ब्राह्मणाच्या शेवटच्या वंशावरून हा नारदाचा शिष्य असल्याचे दिसतें.
५९वैपश्चितदार्ढजयन्तिगुप्त लौहित्य- हा वैपश्चित दार्ढजयन्ति दृढजयन्त लौहित्य याचा शिष्य असल्याचे जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांतील एका वंशावरून (३.४२,१) दिसतें.
६०वैपश्चितदार्ढ जयन्ति दृढजयंतलौहित्य- हा पिपश्चित दृढजयन्त लौहित्य याचा शिष्य असल्याचे जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांतील वंशावरून दिसतें.
६१शवस्- हा अग्निभु काश्यपाचा शिष्य असल्याचें वंशब्राह्मणावरून दिसतें.
६२शाकदासभाडितायन- विचक्षण ताण्डयाचा शिष्य म्हणून ह्याचें नांव वंशब्राह्मणांत आलें आहे.
६३शांखायन- कौषीतकी ब्राह्मणांत ह्याचा उल्लेख नाहीं, पण शांखायन आरण्यकांतील शेवटच्या वंशांत ह्याचें नांव असून ह्या आरण्यकाबद्दल गुणाख्याला प्रमाणभूत मानितात. श्रौतसूत्रांत शांखायनाचें नांव मुळीच आढळत नाहीं, परंतु आश्वलायन गृह्यसूत्र शांखायनाला आचार्य म्हणून मानितें. अलीकडील कालांत ही शाखा उत्तर गुजराथेंत पसरली. तैत्तिरीय प्रातिशाख्यांत कांडमायनाबरोबर शांखायनाचाहि उल्लेख आहे.
६४श्यामजयंत लौहित्य- ह्या आचार्याचा जयंत पाराशर्याचा शिष्य म्हणून जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणाच्या वंशात उल्लेख आहे. त्याच ठिकाणीं त्या नांवाच्या दुस-या एका मनुष्याचा मित्रभूतिलौहित्याचा शिष्य म्हणून उल्लेख आहे.
६५श्यामसुजयंत लौहित्य- ह्या आचार्याचा कृष्णधृति सात्यकीचा शिष्य म्हणून जैमिनीय उपनिषद्  ब्राह्मणांतील वंशांत (३.४२,१) उल्लेख आहे.
६६श्रवणदत्तकौहल- ह्या आचार्याचा सुशारद शांखायनाचा शिष्य म्हणून वंशब्राह्मणांत उल्लेख आहे.
६७सत्यकामजाबाल- छान्दोग्यांत श्रद्धा व तप हीं ब्रह्मोपासनाची अंगे आहेत हें दाखविण्याकरितां याची सुंदर कथा आली आहे ती अशी- जबाला नामक स्त्रीला सत्यकाम नांवाचा पुत्र होता तो आपल्या मातेला हांक
मारून म्हणाला, “आई, मी आचार्यगृही राहून ब्रह्मचर्य पालन करून अध्ययन करूं इच्छितो. तर माझें गोत्र कोमतें तें मला सांग” (गुरुजवळ गोत्र सांगणें अवश्य असें असें दिसतें) ती त्याला म्हणाली. “बाळा, तुझें गोत्र काय तें मला माहींत नाही. पतिगृही अतिथिअभ्यागतांदिकाच्या सेवेमध्ये व इतर कामांमध्यें मीं अत्यंत व्यग्र होते. शिवाय मी तरुण होतें तेव्हां तूं मला झाला,; म्हणून मी गोत्र विचारलें नाहीं. तूं झाल्याबरोबर तुझा पिता मरण पावला. म्हणून तुझें गोत्र काय तें मला माहीत नाहीं. मात्र माझें नांव जबाला आहे आणि तुझें नांव सत्यकाम आहे एवढेंच मला माहीत आहे. तेव्हां मी जबालेचा पुत्र सत्यकाम आहे असें आपल्या गुरूला सांग”. नंतर तो सत्यकाम गौतम हरिद्रुमत याजकडे जाऊन मोठया नम्रतेनें म्हणाला, “हे भगवन् , ब्रह्मचर्यानें आपल्याजवळ राहून अध्ययन करावें या हेतूने मी आपणाकडे आलो आहे”. तेव्हां गौतम म्हणाला, “बाळा तुझें गोत्र काय”? त्यावर त्यानें मातेनें सांगितलेले सत्य गौतमाला सांगितलें. तें ऐकून गौतम म्हणाला, तूं ब्राह्मणच आहेत. ब्राह्मणेत्तर असें सत्य भाषण करणार नाहीं. “तूं सत्यपासून परावृत्त झाला नाहीस म्हणून मी तुझें उपनयन करतों समिधा घेऊन ये”. या प्रमाणें त्याचें उपनयन केल्यांतर कृश व अशक्त अशा चारशें गाई गोठयांतून सोडून गौतमानें त्याला त्यांच्या मागे जाण्यांस सांगितले. त्या गाई अरण्याकडे नेतांना, यांच्या सहस्त्र गाई झाल्याखेरीज आपण परत येणार नाहीं, अशी त्यानें प्रतिज्ञा केली. नंतर तो वर्षभर गाईसह वनांत राहिला व तोर्पंत एक हजार गाई झाल्या. पुढें वायुदेवतेनें संचार केलेल्या एका ॠषभाने त्याला ब्रह्माचा चतुर्थांश म्हणजे काय हें सांगितलें; व दुसरा चवथा भाग अग्नि तुला सांगेल असे म्हटलें. नंतर तो आचार्यगृही येऊन त्यानें अग्नि प्रदीप्त करुन त्याची सेवा केली, व अग्नींने त्याला ब्रह्माच्या दुस-या चतुर्थाशाचें ज्ञान सांगितलें. पुढें सत्यकामानें आदिग्यरूपी हंसाची सेवा केली व त्यानें तिस-या पादाचे ज्ञान सांगितले. चवथा पाद प्राणरूपी मद्गू नांवाच्या जलचर प्राण्यानें सांगितला. नंतर तो आचार्यगृही आला. त्याचें मुखावलोकन गौतम म्हणाला, “बाळा, तूं ब्रह्मवेत्याप्रमाणें दिसतोस. तुला कोणी उपदेश केला?” सत्यकामानें उत्तर दिलें की मनुष्याहून इतर अशा देवतादिकांनीं मला उपदेश केला. आता माझी ज्ञान ऐकण्याची इच्छा असतांनां आपणच तें सांगू शकाल. आपल्या सारख्या इतर गुरूंकडून मी ज्ञान संपादन केलें. परंतु जी विद्या आचार्यांपासून ज्ञात होते तीच अत्यंक कल्याणकारक होते. हे ऐकून गौतम त्याला म्हणाला “तूं जे जाणलें आहेस त्याहून अधिक ज्ञान कांहीच उरलें नाहीं”.
६८सत्ययज्ञपौलुषि- ह्या आचार्याचा उल्लेख शतपथांत (१०.६,१,१) आहे.  सत्तयज्ञपौलुषि एवढेंच नांव छांदोग्यात (५.११,१) आलें आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणांत (३.४०.२) हा पुलुप प्राचीन योग्य ह्याचा शिष्य असल्याचें उल्लेखिले आहे.
६९संवर्गजित्लामकायन- वंशब्राह्मणावरून हा शाकदासाचा शिष्य दिसतो.
७०सांकृत्य- बृहदारण्यकाच्या माध्यंदिनप्रतींतील पहिल्या दोन वंशांत पाराशर्याचा हा गुरू असल्याचा उल्लेख आहे असें मॅकडोनेल म्हणतो.
७१सातमश्वदेवरात- हा आचार्याचा विश्वामित्राचा शिष्य म्हणून शांखायन आरण्यकाच्या शेवटच्या वंशांत उल्लेख आहे.
७२सायकजानश्रुतेय- जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत (३.४०,२) या आचार्याचा अनुश्रुत काण्डवी याचा शिष्य म्हणून उल्लेख आहे.
७३सुदत्तपाराशर्य- जैमिनीय उपनिषद् ब्राह्मणांत (३.४.११;४.१७,१) ह्या आचार्याचा जनश्रुत वारक्याचा शिष्य म्हणून उल्लेख आहे.
७४सुप्रतीतऔलुंडय- वंशब्राह्मणांत, बृहस्पतिगुप्ताचा शिष्य म्हणून ह्याचा उल्लेख आहे.
७५सुमंत्रबाभ्र व गौतम- वंशब्राह्मणांत ह्या आचार्याचा शूष वाहनेय भारद्वाजचा शिष्य म्हणून उल्लेख आहे.
७६सुम्नयु- शांखायन आरण्यकांच्या वंशांत (१५.१) हा उद्दालकाचा शिष्य आल्याचा उल्लेख आहे.
७७सुयज्ञशांडिल्य- जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणांत (४.१७,१) कंस वारक्याचा शिष्य म्हणून याचा उल्लेख आहे  दुसरा सुयज्ञ शांखायन हा गृहसूत्रांचा कर्ता आहे.
७८सुशारदशालंकायन- वशब्राह्मणांत ह्या आचार्याचा ऊर्जयंति औपमन्यव याचा शिष्य म्हणून उल्लेख आहे.
७९सोमप्रातिवेश- शांखायन आरण्यकाच्या वंशांत ह्या आर्चायाचा प्रतिवेशाचा शिष्य म्हणून उल्लेख आहे.
८०सौकरायण- बृहदारण्यकाच्या काण्वप्रतीतील दुस-या वंशांत ह्या आचार्याचा काषायणाचा शिष्य म्हणून उल्लेख असून, माध्यंदिन प्रतींतील वंशांत त्रैवणि ह्याचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे.
८१हरितकश्यप- बृहदारण्यकाच्या शेवटच्या वंशावरून हा आचार्य कश्यप याचा शिष्य दिसतो.
८२हृत्स्वाशयआल्लकेय- जैमिनीय उपनिषद्  ब्राह्मणांतील वंशांत (३.४०,२) सोमशृष्म सात्ययज्ञि प्राचीन योग्य ह्याचा शिष्य म्हणून याचा उल्लेख आहे.