प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
जमीन
जमीन व तिचे प्रकार [ॠग्वेद]
१उर्वरा | द्वीप | मातरिभ्वरी |
कृषि | धन्वन् | ४मृद् |
२क्षेत्र | निम्र | संदिह (वल्मीकवपा) |
खात | निर्ॠति | ५सीता |
३खिल्य | प्रधन्या | सुक्षेत्रा |
तंत्र | फर्वर | सुक्षेत्रिया |
[तै.सं.] | ||
उदपुर | धरित्री | रोदसी |
उपयाम | ध्रुव | ८वपा (वारुळ) |
उर्वरा | पांसु | ९वल्क |
उर्वी | पृथ्वी | १०शर्करा (रेती) |
६ऊष | ७प्रदर | सिकता |
ॠक्षा | रसा | स्वधिचरणा |
देवयजनी | ||
[अथर्ववेद] | ||
उर्वरा | धन्वन् | भूमि |
ऊर्णम्रदा | ११ध्रुव | शर्करा |
ॠक्षाक | १२पांसु | सिकता |
कीलालोध्री |
१उर्वरा :- उर्वरा या शब्दाचा आणि क्षेत्र या शब्दाचा ॠग्वेदांत व नंतरच्या ग्रंथांत नांगरट जमीन असा अर्थ आहे. सुपीक जमीनीचा (अप्नस्वती) त्याचप्रमाणें पडीत जमीनीचा (आर्तना) हि उल्लेख ॠग्वेदांत आहे. कालव्यांच्या योगानें लागवड करीत असत असा स्पष्ट उल्लेख ॠग्वेद (७.४९,२) आणि अथर्ववेद (१.६,४) यांत केलेला आहे आणि खताच्या उपयोगासंबंधाचाहि (अथर्व. ३.१४,३) उल्लेख आहे. क्षेत्रें बरोबर मोजीत असत असें ॠग्वेदावरुन दिसतें. ही गोष्ट प्रत्येक मनुष्य नांगरण्या करितां जमीनीचा मालक असे असें दर्शवितें. ॠग्वेदांतील एका ॠचेवरुन (८.९१,५) या कल्पनेला पुष्टि मिळते. या ॠचेंत अपाला हिनें आपल्या बापाचें डोकें आणि त्याचें शेत यांचा एकत्र उल्लेख केला आहे. जसें डोकें तसेंच शेत ही खाजगी मालमत्ता असे असा या उल्लेखांतून अर्थ निघतो. यावरुन उर्वरासा, उर्वराजित, क्षेत्रासा (क्षेत्रें जिंकणारे) अशीं विशेषणें झालेलीं आहेत, उर्वरापति हें प्रथम मनुष्याचें विशेषण असून नंतर ते ईश्वराला लावलें असावें क्षेत्रें आणि मुलें यांचा उल्लेंख एकाच भावनेंनें केलेला आढळतो. तसेच शेतांचा जय जिंकणें (क्षेत्राणिसंजि) असाहि उल्लेख आढळतो. पिशेलचा तर्क असा आहे की नांगरलेल्या जमीनीसभोंवती गवताचा बांध असावा (खिल, खिल्य ह्या शब्दाचा अर्थ बांध असा असावा.) आणि बहुतकरुन ती बांधाची जमीन समाईक असावी असें वाटतें. एखाद्या समाजाच्या सर्व लोकांच्या समाईक मालकीची मालमत्ता किंवा अशा त-हेची लागवड पूर्वी असल्याबद्लचा उल्लेख वैदिक वाङ्मयांत आलेला नाही. जमीन खाजगी वैयक्तिक मालकीची असे हीच गोष्ट नंतरच्या वाङ्मयांत दिसतें. छांदोग्य उपनिषदाप्रमाणें वैयक्तिक संपत्तीमध्यें शेतें आणि घरें यांचाही समावेश होत असे (आयतनानि). ग्रीक पुराव्यावरुन देखील वैयक्तिक मालकी असे असेच सिद्ध होतें. वैयक्तिक मालकी कोणच्या त-हेची असे हे मात्र स्पष्ट समजत नाहीं. अविभक्त कुटुंबांतील मुख्य पुरुष आणि इतर मंडळी यांचा कायद्याच्या दृष्टीनें कोणचा संबंध असे हें कोठेंहि स्पष्ट केलेले नाही. या संबंधाचें कांही अनुमान मात्र बांधतां येतें (पितृ शब्द पहा). पुष्कळ वेळां एखादें कुटूंब जमीन वगैरेंची वांटणी न करितां अविभक्तच रहात असें. स्थावर मिळकतीचा वारसा कोणी घ्यावा याबद्लचे नियम गौतम, बौधायन व आपस्तंब या धर्मसूत्रांत सांपडतात; तत्पूर्वी सांपडत नाहीत. शतपथ ब्राह्मणांत (१३.६,२,१८) उपाध्यायांना जमीन दक्षिणा म्हणून देत असा उल्लेख आहे; परंतु या दानाचा निषेध केला आहे. यावरुन त्या वेळींहि जमीन ही वस्तू सहज देऊन टाकण्यासारखी मानली जात नसे असें दिसतें. तैत्तिरीय संहितेंत (३,१,९४,) मनूनें आपला पुत्र नाभानेदिष्ठ याला स्थावर मालमत्तेच्या वांटणीतून वगळलें तेव्हां त्या मुलाला जमिनीऐवजी गुरें मिळालीं ही गोष्ट महत्वाची आहे. गुरें ही पूर्वी धनाच्या ठिकाणी होती. भारतांतहि संपत्तीचा पाया पूर्वी गुरेंच होतीं, जमीन नव्हती हें स्पष्ट आहे. आयर्लंड, इटली, ग्रीस वगैरे देशांतहि हीच स्थिति होती, गुरें ही व्यक्तीना खजगी रितीनें वापरतां येत, व अशा प्रकारें ती वापरली जात. जमीन मात्र कोणाहि व्यक्तीनें आपल्या मंर्जीप्रमाणें कोणालाहि द्यावी अशी वहिवाट नव्हती; कुटुंबाचें किंवा जातीचें (समाजाचें) मत तरी निदान जमिनीच्या व्यवस्थेच्या बाबतींत घ्यावें लागे, असें दिसतें; परंतु ग्रंथांत या बाबतींत स्पष्ट वचनें नाहींत त्यामुळें भारतीय व इतर समाजांच्या तुलनेवरच या संबंधांतील अनुमान बांधावे लागतें.
२क्षेत्र.- 'शेत'. ॠग्वेदावरुन हा शब्द निरनिराळी आणि काळजीनें मोजलेलीं शेतें असत असें दर्शवितो. तरी कांही ठिकाणीं सामान्य नांगरलेली किंवा लागवड केलेली जमीन असा अर्थ आहे. अथर्ववेदांत आणि नंतरहि वरील दोन्ही अर्थ आले आहेत. ज्याप्रमाणें वास्तोष्पति प्रत्येक घरावर देखरेख करतो त्याप्रमाणें क्षेत्रस्यपति (शेताचा ईश्वर) ही प्रत्येक शेतावर देखरेख करणारी देवता आहे असा अर्थ घेतां येईल. या पुराव्यावरुन वैदिक काळांत व्यक्तीचीं निरनिराळी शेतें असण्याची वहिवाट होती असें अनुमान करणें बरोबर होईल.
३खिल, खिल्य.- एकच अर्थाचे दोन्ही शब्द आहेत. रॉथच्या मताप्रमाणें याचा अर्थ लागवड केलेल्या दोन जमिनीमधील पडित जमीन; परंतु ॠग्वेदांतील उता-यांत-ईश्वर भक्ताला अभिन्न खिल्यावर ठेवितो- (अभिन्ने खिल्येनिदधाति देवयुभ् ) हा अर्थ लागू पडत नाही असें तोच स्वत:कबूल करतो, आणि म्हणून 'अखिल्येभिन्ने' 'पडित, पट्टया नसलेली जमीन' असा पाठ तो कल्पितो. पिशेल म्हणतो की, खिल याचा अर्थ लोकांच्या ढोरांना चरण्यास राखलेली व ज्या मध्यें लागवड नसलेली अशीं मोठीं शेतें असा असावा. तथापि ओल्डेनबर्ग म्हणतो कीं लागवड केलेल्या शेतांमध्यें जी जमीन असते ती खिल असावी. रॉथच्या मतें ही खिल जमीन पडित असते परंतु ओल्डनबर्गचें तसें मत नाहीं. वैदिककाळांत लहान लहान निरनिराळी शेतें असत या गोष्टींशीं ओल्डेनबर्गचें मत जुळतें.
४सीता.- ॠग्वेद व मागून झालेले ग्रंथ ह्यांमध्यें तास (नांगरट) अशा अर्थानें हा शब्द आलेला आहे.
५मृद.- नंतरच्या संहितेंत आणि ब्राह्मणांत 'माती' या अर्थी. ब्राह्मणांत याचा मातीचा गोळा हा अर्थ सुद्धां निघतो. मैत्रायणी उपनिषदांत कुंभार या अर्थी मृत्पात्र आणि मृण्मय यांचाहि उल्लेख आलेला आहे. आणि थडग्याला मातीचें घर म्हटलें आहे.
६ऊष.- नंतर लिहिल्या गेलेल्या संहितेवरुन आणि ब्राह्मणांवरुन गुरांना योग्य अशी खारी जमीन असा ह्या शब्दाचा अर्थ आहे.
७प्रदर.- याचा अर्थ मागाहूनच्या संहिता व ब्राह्मणें यांत 'भेग' 'भूभंग' असा होतो.
८वपा.- मागाहून झालेल्या संहिता व ब्राह्मणें ग्रंथांत ह्याचा अर्थ वारुळ असा आहे.
९वल्क.- मागाहून झालेल्या संहिता व ब्राह्मण ग्रंथात वारुळ या अर्थानें हा शब्द आलेला आहे.
१०शर्करा.- स्त्रीलिंगी अनेकवचनी असा हा शब्द मागाहून झालेल्या संहिता ग्रंथांत व ब्राह्मण ग्रंथांत आला असून त्याचा अर्थ रेव किंवा वाळू असा आहे. अथर्व वेदांत शर्करा या शब्दाचा क्षुद्र पाषाणविशेष असा भाष्यकारानें अर्थ केला आहे.
११ध्रुव.- हें विशेषण दिव् =दिशा हिला लावलेलें असून या शब्दाचा अर्थ मनुष्याच्या पायाखालची जमीन असा हि आहे.
१२पांसु.- अथर्ववेद व मागाहूनचे ग्रंथ ह्यांमध्यें धूळ किंवा वाळू अशा अर्थानें अनेकवचनी प्रयोगांत हा शब्द सांपडतो. अद्भुत ब्राह्मणांत पुढें येणा-या अरिष्टांची सूचना देणारी जी चिन्हे दिलेली आहेत त्यांत पांसुवर्ष म्हणजे धुळीचा किंवा वाळूचा पाऊस याचा उल्लेख आला आहे. अशा प्रकारचा वाळूचा पाऊस हिंदुस्थानांत पुष्कळदां पडतो.